Monday 11 April 2022

DIO BULDANA NEWS 11.4.2022,1


                                               

रेशीम शेतीतून गवसला शाश्वत आर्थिक उत्पन्नाचा मार्ग..

·          नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत लीलाबाईंनी साकारला रेशीम शेती उद्योग

बुलडाणा, (जिमाका)  दि. 11 : कृषी विभागा मार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राबविली जाते.  तसेच कृषी विभागाकडून पूरक व्यवसाय करण्यासाठीही विविध योजना राबविल्या जातात. मात्र या योजनांचा लाभ घेवून आर्थिक उन्नती साधता येते, हे दाखवून दिले आहे, मेहकर तालुक्यातील चिंचाळा येथील लीलाबाई बाबुसिंग जाधव या महिला शेतकऱ्यानी.  पारंपारिक पिके घेवून शेती करणे परवडत नाही, असे म्हणणारे शेतकरी अनेक आहेत. मात्र रेशीम शेतीची वेगळी वाट निवडत उत्पन्नाचा शाश्वत मार्ग गवसणारे शेतकरीही आहेत. श्रीमती लिलाबाई जाधव यांनी हा मार्ग मिळवून दाखविला आहे.  

    जिल्ह्यातील 441 गावात ही योजना राबविली जात आहे. यामध्ये रेशीम शेती योजनेचा समावेश असून कृषी विभाग आणि जिल्हा रेशीम कार्यालय यांचे संयुक्त सहकार्याने ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत तुती रोपवाटिकातुती लागवड, रेशीम कीटक संगोपन गृह व संगोपन साहित्य या घटकांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.  चिंचाळा येथील श्रीमती लीलाबाई बाबुसिग जाधव यांनी कृषी पर्यवेक्षक श्री धांडेमेहकर यांचे मदतीने सन 2020-21 मध्ये या योजनेत सहभाग नोंदविला. तुती रोपे खरेदी व लागवडी बाबत मार्गदर्शन जिल्हा रेशीम कार्यालय यांचेकडून सु.प्र.फडके यांनी केले.

   त्यांनी चार महिन्यांच्या कालावधीत त्यांनी 1000 वर्ग फूट आकारमानाचे रेशीम कीटक संगोपन गृह बांधकाम केले. रेशीम कार्यालयकडून प्रशिक्षण घेतल्यावर  त्यांनी पहिली बॅच 200 अंडीपुंजची काढली.  माहे ऑगस्ट 2021 मध्ये रेशीम कीटक संगोपन घेण्यास सुरुवात केली. त्यांना गुळवे रेशीम चॉकी केंद्रबुलडाणा यांचेकडून बाल कीटकांचा पुरवठा करण्यात आला. त्यापासून त्यांना 202.49 किलो ग्रॅम कोष उत्पादन मिळाले. प्रति किलोग्रॅमचा 415 रूपये दर मिळाला. त्यापोटी 84033 रक्कम मिळाली. कमी कालावधीत केवळ 28 दिवसात चांगले उत्पन्न मिळाल्याने त्यांचा उत्साह वाढला.

   तुती लागवडीचे व्यवस्थापन करून खत, पाणी व मशागत त्यांनी केली. श्रीमती लिलाबाई यांनी 45 दिवसांनी दुसरी बॅच माहे ऑक्टोबर 2021 मध्ये 200 अंडीपुंज ची घेतली. त्यापासून त्यांना 112.47 कि. ग्रॅ. उत्पन्न मिळालेप्रति किलो 575 रूपये प्रमाणे जालना येथील रेशीम कोष बाजार मध्ये दर मिळाला. त्यापासून 64670 रूपये उत्पन्न मिळालेकमी खर्चात व कमी कालावधीत हे उत्पन्न पाहून त्यांना हा उद्योग शाश्वत उत्पन्न देणारा वाटला. एखाद्या पगारदारासारखा या उद्योगातून महिन्याला उत्पन्न त्यांना मिळत गेले. त्यांनी तिसरी बॅच 200 अंडीपुंज घेऊन माहे फेब्रुवारी 2022 मध्ये घेतली. त्यापासून 167.43 किलो कोष निर्मिती केली व प्रति किलो 755 रूपये भाव मिळून 126410 रूपये रक्कम मिळाली. एकूण वर्षभरात त्यांनी एक एकर तुती लागवडीच्या रेशीम कोषातून 2 लक्ष 75 हजार 113 रूपयांचे उत्पन्न मिळविले.

त्यांना तुती लागवडीचे 37 हजार 500 रूपये व संगोपन गृहाचे 1 लक्ष 26 हजार 479 रूपये अनुदान प्राप्त झाले आहे. त्यांनी आता स्व: खर्चाने अजून एक एकर लागवड वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.           कृषी पूरक व्यवसायात रेशीम शेती उद्योग हा शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न कमी कालावधीत मिळवून देणारा व्यवसाय आहे, हे खऱ्या अर्थाने श्रीमती लिलाबाई जाधव यांनी दाखवून दिले आहे.

                                                            ************

 


हिवरा आश्रम येथे जेष्ठ नागरीक मार्गदर्शन मेळावा उत्साहात

बुलडाणा, (जिमाका)  दि. 11 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती - सामाजिक समता कार्यक्रम निमित्त जेष्ठ नागरीक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन 9 एप्रिल रोजी स्वामी विवेकानंद आश्रम, हिवराआश्रम,ता.मेहकर येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहायक आयुक्त डॉ.अनिता राठोड तर प्रमुख उपस्थितीत सरपंच सौ. निर्मला मनोहर निन्हे, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन मिळे, डॉ.पुजा धांडे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकरराव पद आदी होते.

    कार्यक्रमाचे प्रमुख मागदर्शक डॉ. अनिता राठोड यांनी उपस्थित जेष्ठ नागरीक यांना मागदर्शनपर माहिती दिली. तदनंतर मान्यवरांच्या हस्ते उपस्थित जेष्ठ नागरीकांना दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या औषधींचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित जेष्ठ नागरीकांचे आरोग्य तपासणीही करण्यात आली.  मेळाव्यास जेष्ठ नागरीक बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

संचालन व आभार प्रदर्शन हिवरा आश्रम विद्यालयाचे प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांनी केले.

                                                                        ***********

                                   

 

गाय, म्हैस, कुक्कुट व शेळी पालन व्यवसायाचे प्रशिक्षणाचे आयोजन

• प्रवेश नोंदणी 21 एप्रिल पर्यंत करावी

बुलडाणा,(जिमाका) दि.11 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) द्वारा जिल्हा उद्योग केंद्र मार्फत उद्योग अथवा व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवतींसाठी बुलडाणा येथे गाय, शेळी व म्हैस पालन प्रशिक्षण  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण 21 ते 25 एप्रिल 2022 दरम्यान पाच दिवसांमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाकरीता प्रवेश नोंदणी दि. 21 एप्रिल 2022 पर्यत कार्यालयीन वेळेत प्रकल्प अधिकारी गणेश गुप्ता यांच्याकडे किंवा त्यांच्या मोबाईल क्रमांक 8275093201, 9011578854 वर करावी. तसेच उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, मलकापुर रोड, बुलडाणा येथे संपर्क करावा.

   प्रशिक्षणास भाग घेणारा उमेदवार किमान 5 वा वर्ग पास असणे आवश्यक असून त्याचे वय 18 ते 50 वर्षे असावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे. प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी तंत्रशुध्द प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करण्याचा आहे. सदर प्रशिक्षणात गाय, कुक्कुट, म्हैस पालनाचे तंत्र, गाय म्हसीचे प्रकार व त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन रोग व लक्षणे, खाद्य निर्मिती व चाऱ्याचे प्रकार, शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात मार्गदर्शन तज्ज्ञ व्यक्ती करणार आहे. तरी प्रशिक्षणासाठी प्रवेश नोंदणी करावी, असे आवाहन एसीईडी चे विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

                                                                        ***********

 


महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन

 बुलडाणा,(जिमाका) दि.11 : थोर समाजसुधारक, शेतकऱ्यांचे कैवारी आणि स्त्री शिक्षणाचे उद् गाते महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली.

                                                                                    *****

 

No comments:

Post a Comment