Thursday 10 March 2022

DIO BULDANA NEWS 10.3.2022

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 297 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 07 पॉझिटिव्ह

  • 8 रूग्णांना मिळाला डिस्जार्ज

बुलडाणा, (जिमाका) दि. 10 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 304 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 297 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 07 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपीड चाचण्यांमधील 07 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 82 तर रॅपिड टेस्टमधील 215 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 297अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  बुलडाणा शहर : 4, परजिल्हा : गोरेगाव जि औरंगाबाद 1, पातुर 2,  अशाप्रकारे जिल्ह्यात 08 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती तीन रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 802467 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 98246 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 98246आहे.  आज रोजी  80 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 802467 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 98977 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 98246 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 43 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 688 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. 

                                                                        *****

प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2021-22

शेतात पिकांच झालेल्या नुकसानीबाबत विमा कंपनीला सूचना द्याव्यात

बुलडाणा, (जिमाका) दि. 10 : हवामानशास्त्र विभागाचे अंदाजानुसार राज्यात काही ठिकाणी गारपीट, अवेळी पाऊस होत आहे. त्यानुसार जिल्ह्यातही काही भागात अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळे प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सहभाग नोंदविलेल्या शेतकऱ्यांचे विमा संरक्षित क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, ढगफुटी किंवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग अशा घटनांमुळे रब्बी हंगामातील विमा संरक्षित गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, रब्बी कांदा या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

   याबाबत अधिसूचित महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीस घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत त्यांच्या विमा संरक्षित पिकांचे नुकसान झालेले असल्यास नुकसानीबाबत सूचना देणे आवश्यक असून, याबाबतची सूचना (intimation) आपल्या संबंधित विमा कंपनी यांना देण्यात यावी.

या पर्यायांचा करा वापर

क्रॉप इन्शुरन्स ॲप (Crop Insurance App), विमा कंपनी टोल फ्री क्रमांक, विमा कंपनीचा ई-मेल, विमा कंपनीचे तालुका स्तरीय कार्यालय, कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी कार्यालय,  ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा त्यामुळे नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत आपल्या विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाले असल्यास याबाबतची सूचना (intimation) नुकसान झालेल्या पिकाच्या फोटोसह आपल्या संबंधित विमा कंपनीकडे विहित कालमर्यादेत सादर करावी असे कृषि विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.   जिल्ह्यासाठी रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी नियुक्त असून कंपनीचा टोल फ्री क्रमांक 18001024088 आहे व ईमेल आयडी rgicl.pmfby@ relianceada.com आहे.

                                                                        *********

शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांचा कलापथक कार्यक्रमांमधून जागर..

बुलडाणा, (जिमाका) दि. 10 : विद्यमान शासनाला नुकतेच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत शासनाच्या या यशस्वी कारकीर्द येथील योजना खेडोपाडी व माणसात पोहोचण्यासाठी जिल्हा पातळीवरील तीन कलापथक 9 ते 17 मार्च दरम्यान गावांमध्ये योजनांचा जागर करणार आहेत. महिलांच्या विकास योजना, विद्यार्थी, शेतकऱ्यांच्या योजना ते लोकांच्या भाषेत लोक कलेच्या माध्यमातून सांगितल्यामुळे लोकांच्या पर्यंत पोहचतात. 

   कोविडमुळे मृत्यू झालेल्या कुटुंबाला शासनाने 50 हजार रुपये अर्थसहाय्यासह शिवभोजन थाळी, महात्मा जोतिराव फुले कर्ज मुक्ती योजना, अतिवृष्टीत झालेल्या पिकाची, शेत जमिनीची नुकसान भरपाई, महिलांच्या कल्याणासाठी राखीव निधी, विद्यार्थी, कास्तकार, दिव्यांगासाठीच्या योजना, रमाई आवास योजना, आवास योजना, पेय जल योजनांची माहिती लोककलेच्या माध्यमातून कलापथक कार्यक्रमांमधून लोकांपर्यंत पोचविण्यात येत आहेत. हे लोकलेचे कार्यक्रम जिल्ह्यातील 21 गावांमध्ये सर्वच तालुक्यात होत आहे.

    जिल्ह्यातील बाजारपेठा आणि मोठ्या गावात हा शासकीय योजनांचा जागर होत आहे. शासनाच्या योजना अत्यंत सोप्या भाषेत लोकलेच्या माध्यमातून पोहचतील. हाच उद्देश माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा आहे. त्या उद्देशाला धरून जिल्हा माहिती कार्यालय, बुलडाणा यांनी ह्या कलापथकांच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर जिल्ह्यात करण्यात येत आहे.

                                                                                                *******

डाटा एंट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज करावे; 14 मार्च अखेरची मुदत

  • मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 10 : मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासन पुरस्कृत निलक्रांती, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना व राज्य शासनामार्फत योजना राबविण्यात येतात. तसेच मत्स्यबीज उत्पादन, मत्स्योत्पादन, सर्वेक्षण आदी प्रादेशिक व जिल्हा स्तरावरील माहितीचे संकलन करून सदर संकलित माहिती, आकडेवारी ऑनलाईन उपलब्ध करण्यासाठी अमरावती प्रादेशिक, अमरावती, बुलडाणा, वाशिम, अकोला व यवतमाळ जिल्हा कार्यालय स्तरावर तात्पुरत्या स्वरूपात डाटा एंट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे.

   प्रत्येकी एक याप्रमाणे सहा पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.  उमदेवारांनी अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात किंवा ईमेल द्वारे जिल्ह्याचे सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांचेकडे सादर करून एक प्रत प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय, अमरावती विभाग कार्यालयास 14 मार्च 2022 पर्यंत सादर करावे. उमेदवारांची 16 मार्च 2022 रोजी सकाळी 11 वाजता प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय, अमरावती विभाग, अमरावती या कार्यालयात मुलाखत घेणार असून मुलाखतीस आवश्यक कागदपत्रांसह उमेदवारांनी उपस्थित रहावे.   पदांचा कालावधी 11 महिन्यांचा असणार आहे. मासिक वेतन 25 हजार रूपये, वय 15 मार्च रोजी 35 वर्षापेक्षा कमी असावे, पात्रता ही कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आहे. यामध्ये सांख्यिकी, संगणक व मत्स्यशास्त्र विषयात पदवीधर उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल. एमएससीआयटी प्रमाणपत्र, संगणकीय ज्ञान, इंग्रजी व मराठी दोन्हीमध्ये किमान 30 शब्द प्रति मिनीट टायपिंग असावी. मोठ्या प्रमाणावर डेटा प्रोसेसिंग आणि व्यवस्थापन क्षेत्रात, सरकारी क्षेत्रातील किमान एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असावा. या पदाला कोणतेही शासकीय भत्ते मिळणार नाही. मुलाखतीस उमेदवाराला स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल. उमेदवाराने बायोडेटा, छायाचित्राचा ओळखीचा पुरावा, पत्याचा अधिकृत पुरावा, जन्म दिनांक नमूद असलेला वयाचा पुरावा, पदवी प्रमाणपत्र, पदवी अभ्यासक्रमामध्ये सांख्यिकी व संगणक विषय असल्याबाबत दस्ताऐवज, एमएससीआयटी प्रमाणपत्र, अनुभवाचे पुरावे अर्जासोबत सादर करावे. सर्व दस्ताऐवज सर्व स्वयंसाक्षंकित करावे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, बुलडाणा प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, धाड रोड, बुलडाणा येथे, संपर्क क्रमांक 07262-242254 व ईमेल आयडी pmmsy. buldhana@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.

                                                            *********

औद्योगिक आस्थापनांसाठी रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम

  • औद्योगिक आस्थापनांनी लाभ घेण्याचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 10 : राज्यात जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात नांव नोंदविलेल्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकऱ्या मिळण्यासाठी सहाय्य व्हावे, म्हणून नियोजन मंडळाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना सन 1973-74 पासून शासनाने कार्यान्वित केली आहे. सदर योजना जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा या कार्यालयामार्फत राबविण्यात येते. सदर योजनेत सहभागी होण्यासाठी ज्या व्यक्तीचे वय 18 वर्ष पूर्ण असून किमान शिक्षण शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची परीक्षा उत्तीर्ण व्यक्ती महाराष्ट्र राज्याची स्थानिक रहीवाशी असली पाहीजे. तसेच सेवायोजन नोंदणी असणे आवश्यक आहे.

   या योजनेनुसार उमेदवारांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण कार्यक्रम, खाजगी आस्थापनात व शासनाच्या अंगीकृत व्यवसायात कार्यान्वित करण्यात येतो. या कार्यक्रमातंर्गत उद्योजकांनी अधिसुचित केलेल्या प्रशिक्षणासाठी इच्छुक सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना सहा महिन्याचे प्रशिक्षणासाठी पाठवणी करण्यात येते. उमेदवारांना विविक्षित व्यवसायातील / क्षेत्रातील

कौशल्य प्राप्त व्हावे, किंवा त्यांचे कसब वाढावे, जेणेकरून प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ते नियमित नोकरीत योग्य पगारावर नेमण्यासाठी उद्योजकांना सहज स्विकार्य व्हावे. हा या कार्यक्रमाचा मागचा उद्देश आहे.   तसेच सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी पगारी नोकरीच्या शोधात राहून निराश न होता, प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना हिमतीने स्वयंरोजगार सुरू करणे शक्य व्हावे, हा सुद्धा एक महत्वाचा उद्देश कार्यक्रमाचा आहे. प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना पदाच्या शैक्षणिक अर्हतेनुसार दरमहा (सहा महिने) 300 ते 1000 हजार रूपया पर्यंत विद्यावेतन देण्यात येते. सदर योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असून योजनेची देयकेसुध्दा ऑनलाईन जनरेट होतात.

   या योजनेचा लाभ घेण्याकरीता जिल्हयातील 25 च्या वर मनूष्यबळ कार्यरत असणाऱ्या आस्थापनांनी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नियोक्ता म्हणुन ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी केल्यानंतर नियोक्त्यांना युझर आयडी आणि पासवर्ड देण्यात येतो. सदर युझर आयडी आणि पासवर्ड चा वापर करून नियोक्ता त्यांचे लॉगीनमधून इ.पी.पी योजनेचा लाभ घेऊ शकतात.

   जिल्हयातील अधिकाधीक औद्योगिक आस्थापनांनी सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती. प्रांजली बारस्कर यांनी केले आहे. आस्थापना नोंदणी आणि रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमबाबत काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा सदर कार्यालयातील सचिन पवार, लिपीक टंकलेखक मो.क्र. 9552319696 वर संपर्क साधावा.

                                                            *****

जिल्ह्यात 16 ते 22 मार्च दरम्यान जलजागृती सप्ताहाचे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 10 : जिल्ह्यात 16 ते 22 मार्च 2022 दरम्यान जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सप्ताहादरम्यान जल जागृती, जलसाक्षरता करणारे कार्यक्रम होणार आहेत.

  सप्ताहाचे शुभारंभ  दि. 16 मार्च 2022 रोजी सकाळी 11 वाजता जलप्रतिज्ञेने करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, बुलडाणा येथे होणार आहे. जलजागृती सप्ताह साजरा करताना प्रशासनाच्या निर्देशानुसार कोविड प्रादुर्भाव नियंत्रणासाठी लागू असलेल्या निर्बंधाचे कोटकोरपणे पालन करण्यात येणार आहे. सप्ताहाचा समारोप 22 मार्च रोजी सकाळी 11 वाजता लघु पाटबंधारे विभागातच होणार आहे, असे पाटबंधारे विभागाने कळविले आहे.

**********

 

 

No comments:

Post a Comment