Thursday 31 March 2022

आला उन्हाळा.. तब्येत सांभाळा

आला उन्हाळा.. तब्येत सांभाळा

• उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्याचे नागरीकांना आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.31 : राज्यात मागील काही दिवसांपासून असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या लाटेपासून व उष्माघातापासून बचाव करण्याकरीता करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासनाने जनतेला आवाहन केले आहे. भारतीय हवामान खाते, नागपूर अंदाजानुसार 2 एप्रिल 2022 पर्यंत उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे.

   सर्वसाधारणपणे प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल मध्य, मे, जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रभाव जाणवत असतो. तसेच त्यामुळे मृत्यू होण्याची संभावना असते. मात्र जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा परिणाम आताच जाणवू लागला आहे. उष्माघाताचा परिणाम होऊ नये,यासाठी सर्व जनतेनी आतापासूनच जागृत राहीले पाहीजे, रुग्णांना तातडीने औषधोपचार मिळण्यासाठी अगोदरच तयारी करुन ठेवणे आवश्यक आहे.

 उष्माघातापासून बचावासाठी काय करावे : पुरेसे पाणी पित रहावे, तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे, केवळ हलक्या रंगाचे सुती कपड्यांचा वापर करावा, हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावे, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट व चपलाचा वापर करण्यात यावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी, उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. चक्कर येत असल्यास किंवा आजारी वाटल्यास त्वरित डॉक्टराकडे जावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी,  तोरणी, लिंबुपाणी, ताक आदींचा नियमित वापर करण्यात यावा.

 अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. गुरांना अथवा प्राण्यांना सावलीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घरे ठंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याचे वेळोवेळी स्नान करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये नियमित आराम करण्यात यावा. गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.  

काय करू नये :  शिळे अन्न खाणे टाळावे, तीव्र उन्हात मुख्यत: दुपरी 12 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे, लहान मुले व पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, बाहेर तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत. उनहाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी केले आहे.

                                                            *****

तृतीय पंथीय ओळख दिनानिमीत्त मतदार नोंदणीची विशेष शिबीरे

           बुलडाणा,(जिमाका) दि.31 : आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी ओळख दिन 31 मार्च रोजी जगभर साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य  साधून  महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणी साठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. ही शिबिरे 2 एप्रिल 2022 पर्यंत घेतली जाणार आहेत.

            तृतीय पंथीयांकडे मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची असलेली कमतरता लक्षात घेऊन भारत निवडणूक आयोगाने त्यांना कागदतत्रांबाबत सवलत देऊ केली आहे. तृतीय पंथीय 18 ते 21 वयोगटातील ज्यांच्याकडे वयाचा कोणताही पुरावा नसेल, तर त्यांच्या गुरू मॉ ने दिलेले प्रमाणपत्रही पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. तसेच 21 वर्षां वरील तृतीय पंथीयाने वयाचा पुरावा म्हणून स्वतःच वय सांगणारे प्रमाणपत्र दिल्यास अधिकृत मानले जाते. पत्त्याचा पुरावा म्हणून संबंधित व्यक्तीच्या सध्याच्या निवासस्थानी आलेले टपाल सुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. या कागदपत्रानुसार नोव्हेंबर 2021 मध्ये झालेल्या विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रमातंर्गत म्हणजे मतदार नोंदणीच्या माहिमेमध्ये राज्यभरातून मोठ्या प्रमाणात तृतीय पंथीयांची नोंदणी करून घेण्यात आली होती.

            महाराष्ट्रातील सर्व पात्र तृतीय पंथीय नागरीकांची मतदार यादीत नोंदणी करणे हे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे उद्दिष्ट आहे. तेव्हा यंदाच्या तृतीय पंथी ओळख दिनाच्या निमित्ताने तृतीय पंथीयांसाठी कार्यरत सामाजिक संस्थांनी आणि व्यक्तींनी या मोहिमेला सहकार्य करून अधिकाधिक तृतीय पंथीयांनी या विशेष सप्ताहात मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एस.रामामूर्ती व उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती गौरी सावंत बुलडाणा यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment