Friday 25 March 2022

DIO BULDANA NEWS 25.3.2022



 खरीप हंगामासाठी जिल्ह्याला 1.77 लाख मे. टन खताचे आवंटन मंजूर

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : खरीप हंगामामध्ये जिल्ह्याचे 7.32 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. सोयाबीन, तूर, कापूस, ऊस, ज्वारी, मका, मुग, उडीद आदी पिके जिल्ह्यात घेण्यात येतात. जिल्ह्याला खरीप हंगाम 2022 करीता कृषि आयुक्तालयाकडून 1.77 लाख मेट्रीक टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे.

  पुढील खरीप हंगाम दोन महिन्यावर आला असून खरीप पिकाची पेरणी झाल्यानंतर खताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. तसेच सध्या रशिया व युक्रेन या दोन देशांमधील युद्धामुळे खताची दरवाढ व रासायनिक खताची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात आजरोजी खत विक्रेत्यांकडे  युरीया 7468 मे. टन, डिएपी 1699 मे.टन,एमओपी 149 मे.टन, संयुक्त खते 7912 मे. टन, एसएसपी 19,470 मे.टन साठा उपलब्ध आहे. तरी शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी खरीप हंगाम 2022 साठी खते खरेदी करावी, असे आवाहन कृषि विकास अधिाकरी, जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी केले आहे.

                                                            *******  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत

अर्ज करण्यास 31 मार्च पर्यंत मुदतवाढ

बुलडाणा,(जिमाका) दि.25 : शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकलेल्या अनुसुचित जाती नव बौद्ध घटकातील इयता दहावी नंतरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व शैक्षणिक साहित्य स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थी विद्यार्थिनींना अर्ज करण्यासाठी दि. 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी दिली आहे.

    या योजनेअंतर्गत बुलडाणा नगर पालिका हद्दीपासुन 5 कि. मी. च्या परिसरात असलेली महाविद्यालये/ शैक्षणिक संस्थेत इयत्ता 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायीक तसेच बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत असलेल्या व मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या तथा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणुन, भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नीत बॅंक खात्यात थेट जमा करण्यात येते.

  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज स्विकारण्याबाबत 3 जानेवारी 2022 च्या शासन पत्रान्वये 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अजुनही सुरू असल्याने या योजनेतंर्गत लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बुलडाणा या कार्यालयास सादर करावे. हे अर्ज स्विकारण्यास दि. 31 मार्च 2022 पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. तरी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

                                                                                    ********

लोककलावंताची साथ..

शासकीय योजनांचा प्रचारातून लाभार्थ्यांना मदतीचा हात..

     बुलडाणा,(जिमाका) दि.25 : लोककलावंतांच्या पारंपारिक लोककलेतून सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालयांमार्फत विशेष कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात आला. लोक कलावंतांच्या साथीने शासकीय योजनांचा प्रचार – प्रसार करण्यात आला. योजनांच्या माहितीमुळे पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे निश्चितच या प्रचारातून शासकीय योजनांची माहिती झाल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळेल. जिल्ह्यात 63 गावांमध्ये लोकलावंताच्या माध्यमातून कलापथक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमांना प्रत्येक गावात गावकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

   स्थानिक भाषेतून शाहिरी, लोकगीत, पोवाडा, वासुदेव आदी पारंपारिक लोककलांच्या माध्यमातून गावकऱ्यांपर्यंत राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती जिल्हा माहिती कार्यालयामार्फत पोहचविण्यासाठी आली. गावकऱ्यांचे मनोरंजनात्मक पद्धतीने प्रबोधन करुन त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. जिल्ह्यात लोककला पथकांच्या माध्यमातून गावोगावी, खेडोपाडी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले.

   राज्य शासनाने दोन वर्षात विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी आणि ते शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावेत, हा या मोहिमेचा उद्देश होता.  गत दोन वर्षात महाविकास आघाडी शासनाने घेतलेले निर्णय, त्यांची अंमलबजावणी, विविध योजना, उपक्रम, कोरोना काळात राबविण्यात आलेले विविध उपक्रम, शिवभोजन थाळी, महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना, महिला व बाल विकास योजनेसाठी राखीव निधीची तरतूद, विद्यार्थी, शेतकरी बांधव, आरोग्यसेवा, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम आदी योजना व उपक्रमांची माहिती लोककला पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वत्र पोहोचवण्यात आली.

 लोककवी वामन कर्डक बहुउद्देशीय प्रतिष्ठाण, कृषिसमृद्धी मल्टीपर्पज फाऊंडेशन व श्री. संत सेना महाराज ग्रामविकास बहु. संस्था या लोककलापथकामार्फत जिल्ह्यात 63 प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कलापथकाच्या माध्यमातून विविधरंगी मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात आले.

     जिल्हा माहिती कार्यालयाचा लोककलापथकामार्फत शासकीय योजनांच्या प्रसिद्धीसाठी राबविण्यात आलेला उपक्रम स्पृहणी आहे.  लोककलेच्या माध्यमातून आमच्यासाठी शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती आम्हाला सोप्या भाषेत सांगण्यात आली. आता शासनाच्या कोणत्या योजना आहेत, ते समजल्यामुळे आम्ही या योजनांचा अवश्य लाभ घेणार आहे, अशा प्रतिक्रियाही उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.      

                                                                                    *********

No comments:

Post a Comment