Thursday 8 April 2021

DIO BULDANA NEWS 8.4.2021

केंद्रीय पथकाने घेतला कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढावा दोन सदस्यीय पथक बुलडाणा,(जिमाका) दि.8 : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग परिस्थिती आहे. वाढत्या रूग्णसंख्या व अनुषंगिक बाबींविषयी आढावा घेण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथक आज जिल्ह्यात दाखल झाले. कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढावा आज केंद्रीय पथकाने घेतला. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दोन सदस्यीय केंद्रीय पथकाने बैठक घेतली. बैठकीला केंद्रीय पथकातील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र नवी दिल्लीचे उपसंचालक डॉ. नवीन वर्मा, भुवनेश्वर आयुर्विज्ञान संस्थानमधील भूलतज्ज्ञ आंतर वैद्यकीय विभागातील सहा. प्राध्यापक डॉ दृष्टी सुंदरदास, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, अति. आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे आदी उपस्थित होते. त्यानंतर पथकाने जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे यांच्या कक्षात पुन्हा तालुकानिहाय कोरोना संसर्ग व उपाययोजनांचा आढावा घेतला. बैठकीत केंद्रीय पथकातील सदस्यांनी जिल्ह्यातील कोविड संसर्ग परिस्थिती, कोरोना मृत्यू दर, पॉझीटीव्हीटी दर, दररोज होत असलेल्या तपासण्या, कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग आदींची माहिती घेतली. तसेच कोविड नियंत्रणासाठी आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचप्रमाणे पथकातील सदस्यांनी कोविड लसीकरणाची माहिती घेतली. दररोज होणारे लसीकरण आदींची माहिती घेतली. लसीकरण सेंटर, तेथे असणाऱ्या सुविधा, कोविड रूग्णालयांमधील बेड, ऑक्सीजन बेड, आयसीयु युनीट, व्हेंटीलेटर आदींचा आढावाही पथकाने घेतला. तसेच ऑक्सीजनचा पुरवठा, औषधांचा पुरवठा आदींचा आढावा घेवून कोविड नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन, सामाजिक अंतर नियम, मास्क लावणे, गर्दी टाळे आदी नियमांच्या अंमलबजावणीसुद्धा माहिती पथकाने घेत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्ग परिस्थितीची माहिती दिली. बैठकीनंतर तालुक्यातील लसीकरण केंद्र, कोविड केअर सेंटर व शासकीय रूग्णालयांना पथकाने भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासमावेत आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ******* 5 गावांची तात्पुरती पूरक नळ योजना व 3 गावांसाठी नळ योजनांची विशेष दुरूस्ती मंजुर बुलडाणा,(जिमाका)दि. 8 : जि‍ल्हा परिषद बुलडाणा यांच्यावतीने पाणी टंचाई कृती अराखडा सन 2020-2021 मध्ये समाविष्ट असलेल्या सिंदखेड राजा, चिखली, खामगांव व मोताळा तालुक्यातील काही गावांसाठी तात्पुरती पूरक नळ येाजना व नळ योजनांची विशेष दुरूस्ती मंजूर करण्यात आली आहे. त्यामध्ये चिखली तालुक्यातील मेरा बु, खामगांव तालुक्यातील पाळा, मोताळा तालुक्यातील राजूर व सिं. राजा तालुक्यातील खैरव, सायाळा या गावांसाठी पाणी टंचाई नि‍वारणार्थ नळ योजनेची विशेष दुरूस्ती मंजुर करण्यात आली आहे. तसेच सिं. राजा तालुक्यातील लिंगा, आंबेवाडी व दरेगांव येथे नळ योजनांची विशेष दुरूस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहे. मंजूर तात्पुरत्या पूरक नळ योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर तात्पुरती पूरक नळ योजना किमान 3 वर्षासाठी कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील पाणी टंचाई विभागाने कळविले आहे. ********* सावरगांव माळ, सावळा व कोलारा गावासाठी पिण्याचे पाण्याचे टँकर मंजूर बुलडाणा, (जिमाका) दि. 8 : सिं. राजा तालुक्यातील सावरगांव माळ, बुलडाणा तालुक्यातील सावळा व चिखली तालुक्यातील कोलारा गावाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. सावरगांव माळ येथील लोकसंख्या 1920 असून सावळा येथील 797 आहे. तसेच कोलारा येथील लोकसंख्या 4995 आहे. सावरगांव माळ, सावळा व कोलारा गावाला अनुक्रमे टँकरद्वारे दररोज 40 हजार 475, 31 हजार 840, 1 लक्ष 79 हजार 100 लीटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी, सिं.राजा व बुलडाणा यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment