Thursday 29 April 2021

DIO BULDANA NEWS 29.4.2021

महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम साधे पणाने; सकाळी 8 वाजता ध्वजारोहण बुलडाणा,(जिमाका) दि.29 : महाराष्ट्र राज्य स्थापनेला 1 मे 2021 रोजी 61 वर्ष पुर्ण होत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार आहे. याबाबत शासनाने परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात एकाचवेळी सकाळी 8 वाजता केवळ ध्वजारोहण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष इतक्याच पदाधिकारी / अधिकारी यांना उपस्थित रहावयाचे आहे. कार्यक्रमादरम्यान कवायत, संचलन आयोजनास मनाई आहे. तरी जिल्हाधिकारी कार्यालयात येथेच ध्वजारोहण कार्यक्रम होणार असून जिल्ह्यात इतरत्र कोणत्याही कार्यालयामध्ये ध्वजारोहण समारंभ ठेवू नये, असे निवासी उपजिल्हाधिकारी भूषण अहीरे यांनी कळविले आहे. ******************* औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेबपोर्टलचे अनावरण बुलडाणा,(जिमाका) दि.29 : राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे अनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडले. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, नियोजन व वित्त राज्यमंत्री शंभुराजे देसाई, उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे, अपर मुख्य सचिव, केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाचे अधिकारी, उद्योग आयुक्त, अर्थ व सांख्यिकी संचालक आदी उपस्थित होते. महाराष्ट्र हे देशात औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पन्नामध्ये तसेच एकूण उत्पन्नामध्ये राज्याचा हिस्सा मोठा आहे. राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय उत्पन्न काढणे, राज्यातील औद्योगिक उत्पन्न काढणे, यासाठी नियोजन करण्याच्या उद्देशाने शासनास ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे. उद्योग जगत व या क्षेत्रातील संस्था यांना नेहमी याची आवश्यकता भासते. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील अर्थ व सांख्यिकी संचालनालय, उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यामधील निवडलेल्या 568 कारखान्यांकडून दरमहा विहीत कालावधीत माहिती या वेब पोर्टलवर नोंद करण्याची जबाबदारी उद्योग संचालनालयाच्या महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांचेवर सोपविण्यात आली आहे. माहितीवर संस्करण करून राज्याच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक अर्थ व सांख्यिकी संचालनालय प्रकाशित करणार आहे, असे जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री. आढाव यांनी कळविले आहे. --

No comments:

Post a Comment