Tuesday 6 April 2021

DIO BULDANA NEWS 6.4.2021

 


कंपन्यांशी चर्चा करून रेमडेसिवीरचे दर नियंत्रणात ठेवणार

 - पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे 

  • कोविड नियंत्रणावर लसीकरण हा प्रभावी उपाय
  • ऑक्सीजन पुरवठा, रेमडेसिवीरची उपलब्धतेचा घेतला आढावा
  • कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक

बुलडाणा, (जिमाका) दि 6 : कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणारे रेमडेसीविर इंजेक्शनचा पुरवठा जिल्ह्यात पर्याप्त ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत कंपन्यांशी चर्चा करून उत्पादनही वाढवायला लावले आहे. त्यामुळे या औषधाचा मागणीनुसार पुरवठा करणे शक्य होणार आहे. तसेच रेमडेसिवीर कंपन्यांशी चर्चा करून या औषधाचे दर नियंत्रणात ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातही वाढीव दराने या औषधाची विक्री होत असल्यास धाडी टाकून तपासण्या कराव्यात, अशा सूचना  राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी आज दिल्या.

    कोविड संसर्ग नियंत्रणाबाबत पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, सहायक आयुक्त (औषधे) अशोक बर्डे, औषध निरीक्षक गजानन घिरके,  आदी उपस्थित होते.

    रेमडेसिवीर औषधाची एमआरपी कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, औषधाची एमआरपी कमी करण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे. त्यानुसार एमआरपी कमी करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. कोरोनाची तपासणी बऱ्यापैकी होत आहे. त्यामुळे रूग्णसंख्या वाढत आहे. कोविडवर लसीकरण अत्यंत प्रभावी असून लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे. राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेतील सर्वांचे लसीकरण करून घ्यावे. लसीकरणाचा वेग बघता  लसींचा पर्याप्त साठा ठेवावा. त्यानुसार विभागाने नियोजन करावे. स्त्री रूग्णालयात नवीन 100 बेडची व्यवस्था करण्यात यावी. क्षयआरोग्यधाम येथे आयसीयु युनीट तयार करावे. द्रवयुक्त ऑक्सीजनची मागणी नोंदवून परिस्थितीनुरूप द्रवयुक्त ऑक्सीजनचा साठाही पुरेसा करून ठेवावा.

     यावेळी  पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी कोविडचा पॉझीटीव्हीटी दर, मृत्यू दर, लसीकरणाचे प्रमाण, ऑक्सीजनचा साठा व पुरवठा, रेमडेसिवीरचा साठा व पुरवठा आदींचा आढावा घेतला. यंत्रणांकडून अडचणी जाणून घेतल्या. बैठकीला संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

************

जिल्हयात ऑक्सीजन निर्मिती व रिफीलींग उद्योगासाठी पुढे यावे

  • अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन
  • परवाना देण्यासाठी विभाग तत्पर

बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : जिल्ह्यात एकुण ऑक्सीजनची मागणीनुसार पुरवठयाचे नियोजन प्रशासनामार्फत केले जात आहे.

जिल्ह्यासाठी मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा माऊली उद्योग,अकोला, मे. इसीस गॅसेस,जालना यांचेकडून निरंतर सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. सदर पुरवठा अखंडीतपणे सुरु राहण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी आरोग्य विभागाचया समन्वयाने काम करीत आहे.

        तसेच जिल्ह्यामध्ये ऑक्सीजनचे एकही उत्पादन व रिफीलर नाहीत जिल्ह्यात खाजगी व शासकीय हॉस्पीटलमध्ये आवश्यक असणारा मेडीकल ऑक्सीजन हा बाहेरुन जिल्ह्यामधून मागविण्यात येत आहे. कोव्हीड – 19 या विषाणुजन्य आजारात रुग्णाचे वाढते प्रमाण पाहता भविष्यात मेडीकल ऑक्सीजनची जास्त गरज भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियमित वेळीही ऑक्सीजनची शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांना गरज राहते. जिल्ह्यातील घाऊक औषध विक्रेता किंवा ज्यांना सदर व्यवसाय करावयाचा आहे, त्यांनी पुढे यावे. ऑक्सीजन निर्मिती किंवा रिफीलींगचा उद्योग जिल्ह्यातच निर्माण करावा. त्यासाठी  त्यांनी सदर कार्यालयातील सहायक आयुक्त औषधे अशोक बर्डे, औषध निरिक्षक गजानन प्रल्हाद घिरके, यांचेशी संपर्क साधावा.  जेणेकरुन असे व्यावसायीक पुढे आल्यास ऑक्सीजन उत्पादन, रिफीलींग तसेच घाऊक व्यवसाय करणाऱ्यांना कार्यालयातील अधिकारी परवाना मिळणेसाठी त्वरीत मदत करतील. अशा उद्योगांना परवाना देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग तत्पर आहे.  तसेच जिल्ह्यातील जागरुक नागरिकांनी रुग्णहिताच्या दृष्टीकोनातुन समोर येवून सामाजिक हित जोपासावे असे आवाहन सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषधे प्रशासन यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*********

गहू व मका खरेदी करण्यासाठी 14 खरेदी केंद्रांना मान्यता

• खरेदी करताना कोरोना सुरक्षा विषयक नियम पाळावेत

• नोंदणी सुरू; 30 एप्रिल पर्यंत करता येणार नोंदणी

बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : रब्बी हंगामातील ज्वारी, गहू व मका आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कमी किमतीत धान्य विकावे लागू नये व शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात 14 खरेदी केंद्र सुरू झाली असून येथे 30 एप्रिल 2021 पर्यंत विक्री करण्यासाठी नोंदणी करता येणार आहे. या खरेदी केंद्रांवर कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच कोरोना विषयक सुरक्षा नियम पाळावेत. हंगाम 2020-21 मध्ये आधार भूत किंमत योजनेतंर्गत केंद्र शासनाचे वतीने मका प्रति क्विंटल 1850 रूपये, ज्वारी प्रति क्विंटल 2620 रूपये, गूह 1975 प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात येणार आहे.

   नोंदणी करण्याकरीता शेतकऱ्यांनी आधार कार्ड, 7/12 ऑनलाईन पिकपेरासह, बँक पासबुकची आधार लिंक केलेली झेरॉक्स व मोबाईल क्रमांक आदींसह संबंधीत खरेदी केंद्रांवर जावून ऑनलाईन नोंदणी करावी.   कोविड रूग्णांची जिल्ह्यातील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नोंदणी करते वेळी केंद्रावर गर्दी करणे टाळावे, सॅनीटायर्झचा उपयोग करावा, तोंडावर मास्क वापरावे, सुरक्षित अंतर ठेवावे आदी बाबींचे पालन करावे. शेतकरी केंद्रावर नोंदणीसाठी अर्ज घेवून आल्यास सब एजंट संस्थांनी त्यांच्याकडून तात्काळ अर्ज घेवून शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करावी, ओ जिल्हा पणन अधिकारी यांनी कळविले आहे.

ही आहेत खरेदी केंद्र : तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती, बुलडाणा, दे.राजा, मेहकर, लोणार, मलकापूर,  शेगांव, खामगांव, जळगाव जामोद व संग्रामपूर, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी सुलतानपूर केंद्र साखरखेर्डा ता. सिं.राजा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था मर्या चिखली, माँ जिजाऊ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी दे. राजा केंद्र सिं. राजा, नांदुरा ॲग्रो  फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. नांदुरा केंद्र वाडी.   

*****

 


No comments:

Post a Comment