Friday 20 November 2020

DIO BULDANA NEWS 20.11.2020

 कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोनाळा यात्रा रद्द

  • मंदीराच्या आतील कार्यक्रमांना 10 व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी

  बुलडाणा,(जिमाका) दि.20: सोनाळा ता. संग्रामपूर येथे दरवर्षीप्रमाणे कार्तिक पौर्णिमेला संत सोनाजी महाराज यांची यात्रा आयोजित करण्यात येते.  या यात्रा महोत्सवात पालखी महोत्सव, संत सोनाजी महाराज यांचा रथ उत्सव, दहीहंडी कार्यक्रम, महाप्रसाद, विविध वस्तुंची दुकाने, आनंद मेळा आदी कार्यक्रमांचा समावेश असतो. कार्तिक पौर्णिमेला विविध गावांमधून येणाऱ्या पालख्या रात्री 8 वाजेसुमारास सोनाजी महाराज यांचे मंदीरात प्रवेश करतात. रात्री 11 वाजता सोनाजी महाराज यांची रथ मिरवणूक गावामधून काढण्यात येते. मात्र सद्यस्थितीत सोनाळा, टुनकी व बावनबीर या गावांमध्ये कोविड 19 संसर्गग्रस्त रूग्ण आहेत. वेगवेगळ्या गावांमधून 1 लाख लोकांची गर्दी यात्रेनिमित्ताने जमल्यास कोविड आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.

  कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाजार आणि यात्रा कायदा 1862 च्या कलम 4 अन्वये जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढु नये यादृष्टीने 30 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2020 या कालावधीत सोनाळा ता. संग्रामपूर येथील संत सोनाजी महाराज यात्रा महोत्सवाच्या अनुषंगाने मंदीराच्या आतील कार्यक्रमांना जास्तीत जास्त 10 व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी  दिली आहे. मात्र यात्रेदरम्यान पालखी महोत्सव, रथ उत्सव, दहीहंडी, महाप्रसाद, आनंद मेळावा व मोठ्या  प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी  दिलेली नाही.

  मंदीराच्या आत जास्तीत जास्त 10 भाविक उपस्थित राहतील, त्या सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक राहील. सदर व्यक्तींची थर्मल स्क्रिनींगद्वारे तपासणी करणे बंधनकारक असणार आहे. मंदीराचा परीसर वारंवार निर्जंतुकीकरण करावा. पुजारी व संस्थानचे कर्मचारी यांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावे. मंदीर परीसरात हात धुण्यासाठी पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी. शासनाच्या निर्देशांचे पालन कारावे. मंदीर परीसरात सोशल डिस्टसिंगचे पालन करावे. मास्क न वापरल्यास, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                                                **********

कोरोना अलर्ट : प्राप्त 1140 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 36 पॉझिटिव्ह

•       40 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.20: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1176 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1140 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 36 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 28 व रॅपीड टेस्टमधील 8 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 885 तर रॅपिड टेस्टमधील 255 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1140 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  खामगांव शहर : 3, सिं. राजा शहर : 2,  बुलडाणा शहर : 2,  नांदुरा शहर : 1,  दे. राजा शहर : 3, मोताळा शहर: 2,  जळगांव जामोद शहर : 4, लोणार शहर : 1,  मलकापूर शहर : 2, शेगांव शहर : 5, जळगांव जामोद तालुका: आसलगाव 1, भेंडवळ 1, खेर्डा बु. 1, नांदुरा तालुका: माळेगाव गोंड 3, मेहकर शहर: 1, मेहकर तालुका: भोसा 1, कळमेश्वर 1, चायगांव 1, मूळ पत्ता वाटेगाव जि. अकोला 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 36 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान अपंग  विद्यालय, बुलडाणा येथे शेलापूर ता. मोताळा येथील 63 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 40 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  मलकापूर : 3, चिखली : 2, शेगांव : 4,  बुलडाणा : 1, खामगांव : 5, नांदुरा :4, मेहकर : 1, सिं. राजा : 6, जळगांव जामोद : 8, दे. राजा : 6.

     तसेच आजपर्यंत 63030 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 10148 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 10148 आहे. 

  तसेच 5127 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 63030 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 10698 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 10148 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 416 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 134 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

***

शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज 30 नोव्हेंबरपूर्वी सादर करावे

  • पाटबंधारे विभागाचे आवाहन
  • रब्बी हंगाम 2020-21

  बुलडाणा,(जिमाका) दि.20: जिल्ह्यात सिंचन व्यवसथापनाकरीता 417.34 दलघमी म्हणजे 93.62 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. बिगर सिंचन आरक्षण, बाष्पीभवन व इतर व्यय वगळून उर्वरित पाणी साठ्यावर रब्बी हंगाम 2020-21 चे नियोजन करण्यात आले आहे. उपलब्ध पाण्याचा पुरेपूर व काटकसरीने वापर करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज 30 नोव्हेंबर 2020 पूर्वी सिंचन शाखा कार्यालयास सादर करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.  

  शेतकऱ्यांनी आपल्याकडील पाणीपट्टीची थकबाकी भरून अर्ज शाखा कार्यालयास द्यावे. अर्ज नमुना 7 मध्ये असावयास पाहिजे, अर्जाचे कोरे नमुने शाखाधिकारी कार्यालयास मोफत उपलब्ध आहेत. मागणी अर्ज करणारा स्वत: शेतीचा मालक असावा. मुळ अगर वहीदार असलेल्या शेतीसाठी मागणी अर्जाबरोबर मालकाचे संमतीपत्र जोडावे. पाणी अर्जावर मागणीचे क्षेत्र पिकवार स्पष्ट करावे. मागणी अर्जाची पुर्तता करण्याकरीता कालवा निरीक्षक / बिट प्रमुख यांचे सहकार्य घ्यावे. पुर्ण स्वरूपात भरलेला अर्ज दाखल करावा. पाणी पुरवठा रब्बी हंगाम 31 मार्च 2021 पर्यंत राहणार असून 1 एप्रिल 2021 नंतर उन्हाळी हंगाम सुरू होणार आहे.  

    बिनअर्ज बिगरपाळी पाणी घेणे हा दखलपात्र गुन्हा आहे. मंजूर अर्जात नोंदविलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त ओलीत केल्यास जास्तीच्या दराने आकारणी होईल. अनधिकृत पाणी वापराकरीता दंडनिहाय आकारणी होईल. पाणी बंद केल्यास नुकसानी करीता शेतकरी स्वतऱ्‍ जबाबदार राहतील. पाण्याची मागणी मित्र पिकांसाठी करू नये. मिश्र पिकांवर जास्त दर असलेल्या पिकाची आकरणी होईल. शेतातील पाटचाऱ्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने दुरूस्त करून पाणी पुरवठ्याच्या स्थितीत ठेवाव्यात. पेरणीच्या वेळा पाण्याच्या पाळीप्रमाणे साधाव्यात. जेणेकरून प्रत्येक पाळीमध्ये ठराविक दिवसांनी पाणी मिळेल. रात्र पाळीत दिलेल्या वेळात ओलीत करावे. पाण्याचा नास करू नये अन्यथा उचित कारवाई करण्यात येईल.

    पिकांचे क्षेत्र व विहीरीवरील ओलीताचे क्षेत्र सुरू ठेवावे. नियमानुसार मोटेचा दांड व पाटचारी यामध्ये कमीत कमी 8 फुटांचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी स्वत:चे शेतात पाणी पोहोचू शकेल याची खात्री करावी. त्यानुसार मागणीचे क्षेत्र नोंदवावे, अन्यथा यासंबधीची कोणतीही तक्रार ऐकल्या जाणार नाही. मागणी क्षेत्र मंजूर झाल्यानंतर मंजुरीचे क्षेत्रात पाणी देण्यात येईल. जर शेतकऱ्यांनी मंजुरीपेक्षा कमी क्षेत्रात पाणी घेतले तर मंजुर असलेल्या क्षेत्रावर पोकळ आकारणी होऊ शकते. कारण मंजूर क्षेत्रासाठी पाणी सोडण्यात येते. याबाबत  कास्तकारांनी नोंद घ्यावी, असे कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभाग यांनी प्रगटनाद्वारे कळविले आहे.

                                                            **********

 

No comments:

Post a Comment