Monday 9 November 2020

DIO BULDANA NEWS 9.11.2020

 राज्य परिवहन महामंडळतर्फे

दिवाळी निमित्त जादा बसेस

बुलडाणा, (जिमाका) दि. 9 :  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बुलडाणा विभागातर्फे सन 2020 मध्ये दिवाळी निमित्त प्रवाशांच्या सेवा व सुविधेसाठी प्रत्येक आगारातून विविध मार्गावर दिवाळी जादा बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे.

   प्रवाशांना पुणे येथून येण्यासाठी दि. 11, 12 व 13 नोव्हेंबर 2020 रोजी खास बसेस व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच बुलडाणा ते पुणे जाण्यासाठी 15, 16 व 17 नोव्हेंबर 2020 रोजी खास बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रवाशी बांधवाना सुविधेसाठी शिवशाही बसेस तसेच साधारण सेवेच्या बुकिंगसाठी पुणे येथील नविन शिवाजी नगर, वाकडेवाडी (NSNGR) हा संकेतिक कोड देण्यात आलेला आहे. सदर बसेस या संगणकीय आरक्षणास उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

   संगणकीय आरक्षणाकरीता www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर प्रवाशांनी कोवीड- 19 संबंधी शासनाने दिलेल्या मार्गदर्शन सुचना व नियमांचे पालन करुन या सेवा व सुविधांचा प्रवशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक, राज्य परिवहन, बुलडाणा यांनी केले आहे.

दिवाळी निमित्ताने जादा बसेसचे नियोजन

  बुलडाणा आगार : यवतमाळ सकाळी 5.15 वाजता, पुसद सकाळी 7.30 वा, नागपूर सकाळी 5 वा, परतवाडा सकाळी 6.45 वा, बीड सकाळी 6 वा, नाशिक सकाळी 5 वा,  खामगांव आगार :  यवतमाळ सकाळी 7.30 वा, औरंगाबाद (सिडको) सकाळी 6 व 8 वा, दु. 1.30 वा, पुणे सकाळी 6.30 व 7.30 वा, अक्कलकोट सकाळी 6.30 वा, नांदेड सकाळी 6 वा,  जळगाव जामोद आगर :  अमरावती सकाळी 9 वा, यवतमाळ सकाळी 6.45, 8 वाजता, औरंगाबाद सकाळी 6 वा, दु. 3.30 वा,  चिखली आगार :  अमरावती सकाळी 6 वा, पुणे (चिंचवड) सकाळी 7 वा, औरंगाबाद (सिडको) सकाळी 10.30 वा, दु. 1.30 वा, 2.30 वा, 4 वा, अक्कलकोट सकाळी 6.30 वा, शिर्डी सकाळी 8 वा, मलकापूर आगार : यवतमाळ सकाळी 7.30 वा, पुणे (चिंचवड) सायं 5.30 वा, सकाळी 5.45 वा, मेहकर आगार : औरंगाबाद सकाळी 9.30 वा, स 7.30 वा, स 8.30 वा, नाशिक सकाळी 10 वा, शेगांव आगार : औरंगाबाद दु. 12.30 वा, सकाळी 6 वा, दु. 2.45 वा.  

 तरी प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

अनाथ प्रमाणपत्र वितरण पंधरवाडाचे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 9 :  महिला व बाल विकास विभागामार्फत जिल्ह्यातील अनाथ मुलांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी दि. 14 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवाडा साजरा केला जाणार आहे. पंधवाडयामध्ये ज्या मुलांचे आई वडिल हयात नसून त्यांचेकडे जातीचे प्रमाणपत्र नाही, अशा मुलांच्या बाबतीत त्यांनी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे दि. 14 ते 30 नोव्हेंबर 2020 या कालावधीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करावे.

  तसेच बालगृहात असलेल्या अनाथ मुलांच्या आई वडिल, नातेवाईकांचा शोध घेतल्या जाणार आहे. अनाथ मुलांना प्रमाणपत्रेही दिली जाणार आहेत. बाल न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अन्वये काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या अनाथ, निराधार बालकांना पोलीस, स्वयंसेवी संस्था, पालक यांचेकडून बाल कल्याण समितीमार्फत बालगृहामध्ये प्रवेश दिला जातो. 0 ते 18 वयोगटातील अशा मुलांना बालगृहामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, आरोग्य शिक्षण इत्यादी सुविधा पुरविल्या जातात. अनाथ मुलांना जात नक्की माहिती नसल्याने त्यांना कोणत्या एका विशिष्ट प्रवर्गात समाविष्ट करता येत नाही. विविध प्रकारचे दाखले मिळण्यास अडचणी येतात. जातीचा दाखलाही मिळू शकत नाही. या कारणाने अनाथ मुले शासनाच्या विविध योजना, नोकऱ्यांपासून वंचित राहत होती.  यामुळे शासनाने अशा मुलांना अनाथ प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.

  अनाथ प्रमाणपत्राकरिता शासन निर्णयानुसार खालील प्रमाणे अटी व शर्ति निश्चित करण्यात येत आहे. बालगृहातील व इतर अनाथ मुलांपैकी महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात येणारे अनाथ प्रमाणपत्र असणाऱ्या मुलांसाठीचे हे आरक्षण लागु राहील. ज्या मुलांच्या कागदपत्रावर कोणत्याही जातीचा उल्लेख नाही व त्याचे आईवडिल, काका काकू, आजी आजोबा, व चुलत भांवडे व इतर नातेवाईक यापैकी कोणाबाबतही माहिती उपलब्ध नाही. अशा मुलांनाच अनाथ आरक्षण लागू राहील. तसेच ज्या मुलांचे आई वडील हयात नसून त्यांचेकडे जातीचे प्रमाणपत्र नाही, अशा मुलांच्या बाबतीत त्यांनी संबंधीत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचेकडे अर्ज करणे आवश्यक आहे,  असे जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

0000000

कोरोना अलर्ट : प्राप्त 491 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 33 पॉझिटिव्ह

  • 83 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.9: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 524 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 491 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 33 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 29 व रॅपीड टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 454 तर रॅपिड टेस्टमधील 37 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 491 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 5, खामगांव तालुका : पळशी 1,  लाखनवाडा 1, वाकुड 1, घानेगांव 1, बुलडाणा शहर : 1, मोताळा शहर : 1, मोताळा तालुका : बोराखेडी 5, चावर्दा 2, थड 2, गिरोली 1, जयपूर 1, अटारी 1, सिं. राजा तालुका : रूम्हणा 2, शेगांव तालुका : गव्हाण 2, जवळा 2, लोणार तालुका : शारा 1, मेहकर शहर : 3 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 33 रूग्ण आढळले आहे. तसेच उपचारादरम्यान मोताळा येथील 42 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 83 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव : 26, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 17, अपंग विद्यालय 1, लोणार : 9, मोताळा : 10, दे. राजा : 11, मलकापूर : 4, सिं. राजा : 3, नांदुरा : 2.  

   तसेच आजपर्यंत 52991 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 9404 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 9404 आहे. 

  आज रोजी 4171 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 52991 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 9940 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 9404 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 405 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 131 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

**    


विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघ निवडणूकीत आदर्श आचारसंहीतेचे पालन करावे

-         जिल्हाधिकारी एस रामामूर्ती

·        कोविड संसर्ग नियमांचे पालन करावे

·        मतदारांची तापमान व ऑक्सीजन लेवल तपासणार

 बुलडाणा,(जिमाका) दि. 9 : भारत निवडणूक आयोगाने अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक 2020 कार्यक्रम घोषित केला आहे. यानुसार दि. 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार असून, दि.  3 डिसेंबर 2020 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तरी आदर्श आचार संहीतेचे कोटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना सहा्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिल्या आहेत.  विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे, निवासी उप जिल्हाधिकारी दिनेश गिते, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) भिकाजी घुगे उपस्थित होते.  

            निवडणूकीसाठी केाविड सुरक्षा विषयक सुचनांचे पालन करण्याचे सूचीत करीत जिल्हाधिकारी श्री. रामामूर्ती म्हणाले, मतदान केंद्रावर आरोग्य विभागने आपली चमू ठेवावी. प्रत्येक मतदाराचे तापमान व ऑक्सीजन स्तर तपासण्यात येणार आहे. मतदान साहित्यासोबत कर्मचाऱ्यांना मास्क, फेस शिल्ड, सॅनीटायझर, साबण आदींचा पुरवठा करण्यात यावा.

 यावेळी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे म्हणाले, या निवडणूकीत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार सभांना परवानगी नाही. त्यामुळे उमेदवारांना हाऊस टु हाऊस प्रचार करावा लागणार आहे. तसेच उमेदवारासोबत प्रचाराला पाच व्यक्तींना परवानगी आहे. मतदानावेळी मतदारांना मास्क लावणे बंधनकारक आहे. तसेच आरोग्य विभागाने मतदान केंद्रावरील प्रत्येक कर्मचाऱ्याची कोविड तपासणी करावी. जेणेकरून कुणीही कोरोना पॉझीटीव्ह कर्मचारी असणार नाही.

   नामनिर्देशन पत्र गुरूवार, दि. 12 नोव्हेंबर 2020 रोजीपर्यंत भरता येणार आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी शुक्रवार, दि. 13 नोव्हेंबर 2020 रोजी करण्यात येणार आहे. नामनिर्देशपत्र दाखल केलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मंगळवार, दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजीपर्यंत मागे घेता येणार आहे. या निवडणुकीसाठी मंगळवार, दि. 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर दि. 3 डिसेंबर 2020 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया सोमवार, दि. 7 डिसेंबर रोजी पुर्ण होणार आहे, असेही श्री घुगे यांनी सांगितले. बैठकीला नोडल अधिकारी, संबंधीत विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                                                                                ********************


No comments:

Post a Comment