Thursday 19 November 2020

DIO BULDANA NEWS 19.11.2020

 शिक्षक मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान

  • मतदान प्रक्रिया जाणून घेण्याचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 19 : अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाचे निवडणूकीचा कार्यकम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीत पात्र शिक्षक मतदारांनी मतदान करताना काळजी घ्यावी. मतदानाची प्रक्रिया  जाणून घ्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी भिकाजी घुगे यांनी केले आहे.

शिक्षक मतदारांनी असे करावे मतदान

केवळ आणि कवेळ मतपत्रिकेसोबत पुरवण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केचपेनच मत नोंदवावे. इतर कोणताही  पेन, पेन्सिल, बॉलपेनचा  वापरू नये. तुमच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील ‘पसंतीक्रम नोंदवावा’ या रकान्यात ‘1’ हा अंक लिहून मत नोंदवावे.  निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत. तितके पसंतीक्रम आपण मतपत्रिकेवर नोंदवू शकता. आपले पुढील पसंतीक्रम उर्वरित उमेदवारांसमोरील रकान्यात 2, 3, 4 आदीप्रमाणे आपल्या पसंतीप्रमाणे नोंदवू शकतात. एका उमेदवाराच्या नावा समोरील रकान्यात एकाच पसंतीक्रमाचा अंक नोंदवावा तो पसंतीचा क्रमांक इतर कोणत्याही उमेदवारासमोर नोंदवू नये.  पसंतीक्रम केवळ 1, 2, 3 अशा अंकामध्येच नोंदविण्यात यावेत. ते  एक, दोन व तीन अशा शब्दांमध्ये नोंदविण्यात येवू नयेत. पसंतीक्रम नोंदवितांना वापरावयाचे अंक हे भारतीय अंकाच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपात जसे 1, 2, 3 इत्यादी किंवा रोमन अंक स्वरूपात जसे I, II, III किंवा मराठी भाषेतील देवनागरी 1, 2, 3 या स्वरूपात नोंदवावे. मतपत्रिकेवर कोठेही आपली स्वाक्षरी, आद्याक्षरे, नाव किंवा अन्य कोणताही शब्द लिहू नये. तसेच मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नये. मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवतांना टिकमार्क बरोबरची खुण किंवा क्रॉसमार्क अशी खुण करू नये. अशी मतपत्रिका अवैध ठरेल. आपली मतपत्रिका वैध ठरावी याकरिता आपण पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. अन्य पसंतीक्रम नोंदवणे ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही.

                                                                        ******

 

 


शिक्षक मतदार संघ निवडणूकीत कोविड संसर्ग सुरक्षा उपायांचा अवलंब करावा

-         विभागीय आयुक्त पियुष सिंग

·        पोलींग एजंटची कोविड तपासणी आवश्यक

·        पोलींग बुथवरील कर्मचाऱ्यांची मतदानाच्या दोन दिवस आधी कोविड चाचणी करावी

·        प्रचार सभांना परवानगी नाही

 बुलडाणा,(जिमाका) दि. 19 : भारत निवडणूक आयोगाने अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक 2020 कार्यक्रम घोषित केला आहे. यानुसार दि. 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार असून, दि.  3 डिसेंबर 2020 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीला कोविड साथरोगाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे कोविड संसर्ग सुरक्षा उपाय योजनांचा अवलंब करून निवडणूक यशस्वीरित्या पार पाडावी, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी दिल्या आहेत.

     विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विभागीय आयुक्त बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) भिकाजी घुगे उपस्थित होते. 

            निवडणूकीसाठी आदर्श आचार संहीतेचे पालन करण्याचे सूचीत करीत विभागीय आयुक्त श्री. सिंग म्हणाले, मतदान केंद्रावर आरोग्य विभागाने आपली चमू ठेवावी. प्रत्येक मतदाराचे तापमान व ऑक्सीजन स्तर तपासण्यात यावे.  याठिकाणी लक्षणे असलेले रूग्ण आढळून आल्यास त्यांना विलगीकरण करावे. तसेच कोविड बाधीत मतदार, विलगीकरणात असलेले मतदारांना पोस्टल बॅलेट उपलब्ध करून द्यावे. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांनी पोलींग एजंट नेमताना त्यांची कोविड चाचणी करून घ्यावी. ही चाचणी मतदानाच्या दोन ते तीन दिवस आधी करावी. पोलींग एजंट हा शासकीय, निमशासकीय कर्मचारी नसावा, कुठल्या संस्थेचा पदाधिकारी नसावा. तो अमरावती शिक्षक मतदार संघातील रहीवासी असायला पाहिजे.  कोविडची बाधा नसलेले एजंटच नेमावे. मतदारांमध्ये सोशल डिस्टसिंग राहील, याबाबत व्यवस्था करावी.  तसेच पोलींग बुथवर कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची सुद्धा कोविड चाचणी करावी. मतदान केंद्राबाहेर कोविड जनजागृती, मतदान कसे करावे याबाबत फ्लेक्स लावण्यात यावेत. मतदान झाल्यानंतर मतदान कक्ष निर्जंतुकीकरण करून घ्यावेत.

   ते पुढे म्हणाले, या निवडणूकीत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार सभांना परवानगी नाही. सभेसाठी परवानगी मागण्यासाठी अर्ज आल्यास त्यांना परवानगी देवू नये. आचार संहीता भंगाच्या तक्रारी आल्यास त्यावर तातडीने कारवाई करावी. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर व्हील चेअर व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.  बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व संबंधीत विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  

                                                            ********************

शाळांमध्ये असलेल्या कोविड केअर सेंटरची दुसरीकडे व्यवस्था करावी

-          विभागीय आयुक्त पियुष सिंग

·        कोविड संसर्ग परिस्थिती आढावा बैठक

    बुलडाणा,(जिमाका) दि. 19 : राज्य शासनाच्या आदेशानुसार 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू होत आहे. तरी शाळांमध्ये अनेक ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर अशा शाळांमध्ये सद्यस्थितीत सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरची तातडीने दुसरीकडे व्यवस्था करावी. अशा शाळा निर्जंतुकीकरण करूनच सुरू कराव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी आज दिले.

     जिल्ह्यातील कोविड संसर्ग परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विभागीय आयुक्त बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) भिकाजी घुगे उपस्थित होते.

   ते पुढे म्हणाले, जागतिक स्तरावर कोविड साथरोगाची दुसरी लाट आली आहे. अनेक देशांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दुसरी लाट आल्यास उपाय योजनांचा आढावा घेत सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार व्हेटीलेटर बेड, ऑक्सीजन बेड, ऑक्सीजन पुरवठा, औषधांचा पुरवठा आदी पुरक व्यवस्था करण्यात यावी. यंत्रणांनी यासाठी सतर्क रहावे. पहिल्या लाटेतील अत्युच्च रूग्णसंख्येसाठी असलेली व्यवस्था व दुसऱ्या लाटेत अत्युच्च ठरण्याची शक्यता असलेली रूग्ण संख्या याबाबत तुलनात्मक बाबी तपासून यंत्रणा सज्ज ठेवावी.  

    क्षय रूग्ण, एचआयव्ही रूग्ण आदींची कोविड चाचणी करून घ्यावी. तसेच सारी आजाराच्या रूग्णांचीसुद्धा कोविडची चाचणी करावी. खाजगी डॉक्टरांना समन्वयातून त्यांच्याकडे सारीचे रूग्ण आल्यास त्यांची नोंदणी संबंधीत डॉक्टारांकडून आरोग्य यंत्रणकेडे करून घ्यावी. दुर्धर आजार असणारे रूग्णांची प्राधान्याने कोविड चाचणी करावी, अशा सूचनाही विभागीय आयुक्त यांनी दिल्या. यावेळी प्रयोगशाळा अहवाल तपासणी, तपासणी किट, औषधे आदींवर चर्चा करण्यात आली. बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व संबंधीत विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  

*********

 

 

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 531 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 54 पॉझिटिव्ह

•       31 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.19: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 585 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 531 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 54 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 41 व रॅपीड टेस्टमधील 13 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 309 तर रॅपिड टेस्टमधील 222 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 531 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव तालुका : पिं. राजा 1, हिंगणा 1, लाखनवाडा 1,  खामगांव शहर : 2, सिं. राजा शहर : 4, चिखली शहर : 8, चिखली तालुका : भोकर 1, बोरगांव काकडे 1, मोताळा तालुका : माकोडी 1, तिघ्रा 1, कोल्ही गवळी 1, मोताळा शहर : 2,  बुलडाणा शहर : 2,  नांदुरा शहर : 2, दे. राजा तालुका : जुमडा 2, दे. राजा शहर : 1, जळगांव जामोद शहर : 2, लोणार तालुका : चिंचोली सांगळे 3, किनगांव जट्टू 1,  लोणार शहर : 2,  सिं. राजा तालुका : जळपिंपळगांव 4,  महारखेड 1, दुसरबीड 1, मलकापूर तालुका : धरणगांव 2, मलकापूर शहर : 3, संग्रामपूर तालुका : करमोडा 1, शेगांव शहर : 3 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 54 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे बाळसमुद्र ता. सि.राजा येथील 74 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 31 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  मलकापूर : 1, चिखली : 12, मोताळा : 1, शेगांव : 2,  बुलडाणा : स्त्री रूग्णालय 3, अपंग विद्यालय 7, संग्रामपूर : 1, खामगांव : 1, नांदुरा : 1, मेहकर : 1, सिं. राजा : 1,

     तसेच आजपर्यंत 61890 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 10104 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 10104 आहे. 

  तसेच 2900 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 61890 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 10662 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 10104 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 425 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 133 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

*****



शिक्षक मतदारसंघ निवडणूक केंद्राची विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी केली पाहणी

  बुलडाणा,(जिमाका) दि.19: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी जिल्ह्यात 14 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक तालुका स्तरावर तहसिल कार्यालयात मतदान केंद्र देण्यात आले आहे. त्यापैकी बुलडाणा तहसिल कार्यालयातील मतदान केंद्राची आज 19 नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रावरील सुविधांची माहिती घेतली. तसेच व्यवस्थेबद्दल चर्चा केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे, उपविभागीय अधिकारी श्री. हांडे, तहसिलदार राहुल खंडारे आदी उपस्थित होते.

*********

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन

  बुलडाणा,(जिमाका) दि.19: जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात देशाच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरी करण्यात येते. त्यानिमित्ताने राष्ट्रीय एकात्मता दिनाची शपथही जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आली. यावेळी सहा. जिल्हा नियोजन अधिकारी श्री. वायाळ, तहसिलदार, आदींसह अन्य कर्मचारी उपस्थित होते. 


--

No comments:

Post a Comment