Tuesday 21 April 2020

DIO BULDANA NEWS 21.4.2020



खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मुबलक बियाणे, खते मिळण्यासाठी नियोजन करावे
                                                                               - पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
* खरीप हंगामपूर्व आढावा बैठक
* जिल्ह्यासाठी  1,75, 680 मेट्रीक खतांचे आवंटन मंजूर
* खरीपाचे 7 लक्ष 37 हजार 850 हेक्टरवर नियोजन
बुलडाणा, दि. 21 : खरीप हंगामाचे दिवस जवळ येत आहे. बळीराजा कोरोनाच्या संकटकाळातही शेतीच्या पूर्व मशागतीमध्ये व्यग्र्‍ आहे. यावर्षी दमदार पावसामुळे रब्बी हंगामात चांगले पीक आले, तसेच अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकेही घेतली. पुढील खरीप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक बियाणे, खतांचा पुरवठा व्हावा. कुठलीही कमतरता पडू नये, त्याप्रकारे नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.
   जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते.  याप्रसंगी व्यासपीठावर खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री डॉ. संजय रायमूलकर, राजेश एकडे, संजय गायकवाड, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन आदी उपस्थित होते.  सभागृहात  आमदार श्वेताताई महाले, आमदार ॲड आकाश फुंडकर,  विभागीय कृषि सहसंचालक श्री. नागरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक आदींची उपस्थिती होती.
   खरीप हंगामामध्ये कृषि विभागामार्फत कृषि निविष्ठा गावातच पोहचविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, कृषि विभगाने कृषि निविष्ठा गावातच पोहचविल्या पाहिजे. सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमतेची चाचणी घेण्यात यावी. त्यासाठी गावनिहाय कार्यक्रम आखावा, त्या पद्धतीने कार्यवाही करावी. तसेच शेतकरी उपयोगात आणत असलेले बिटी बियाण्यांचा अभ्यास करून शेतकऱ्यांना लागणारे बिटी बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे. सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीमाल विक्रीची व्यवस्था बळकट करावी. यासाठी कृषि विभागाने मोहिम राबवावी. गुणनियंत्रणासंदर्भात विभागाने जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथकांची स्थापना करावी. या पथकांकडून खते, बियाणे व किटकनाशक दुकानांची तपासणी करावी. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 15 जुनपर्यंत कृषि पतपुरवठा पूर्ण करण्यात यावा, असे निर्देशही पालकमंत्री यांनी दिले.
  ते पुढे म्हणाले, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतंर्गत उद्दिष्टपूर्ती करून फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. एकामिक फलोत्पादन कार्यक्रम, कृषि यांत्रिकीकरण, मृदा नमुने तपासणी लक्षांक आदी योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. खते, बियाणे, किटकनाशके याबाबत प्राप्त शेतकऱ्यांच्या तक्रारींवर तात्काळ कारवाई करावी. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मागेल त्याला शेततळे योजनेविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.
    खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना सिंचनाकरीता रात्रीसुद्धा विज उपलब्ध करून देण्यात यावी, अशी  मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी केली. बैठकीत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. नाईक यांनी माहिती दिली. ते म्हणाले, या खरीपात जिल्ह्यात सोयाबीन पिक 3 लक्ष हेक्टर, कापूस 2 लक्ष  21 हजार हेक्टर, तूर 78 हजार हेक्टर, उडीद 21 हजार 400 हेक्टर, मका 26 हजार, ज्वारी 8900 हेक्टर व इतर पिके 1950 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन आहे. अशाप्रकारे एकूण खरीप हंगामात जिल्ह्यात 7 लक्ष 37 हजार 850 हेक्टर लागवडीचे नियोजन आहे. जिल्ह्यासाठी 1 लक्ष 75 हजार 680 मेट्रीक टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. आज रोजी प्रत्यक्ष पुरवठा 35 हजार 294 मेट्रीक टन आहे. उर्वरित जुलै पर्यंत पूर्ण मिळणार आहे.
   अशी असणार बियाणे उपलब्धता : मका 4 हजार क्विंटल, तूर 5500 क्विंटल, मुग 2000 क्विंटल, कापूस पाकिटे 12 लक्ष 14 हजार, सोयाबीन 80 हजार क्विंटल.  
                                                                                    ***************

No comments:

Post a Comment