Wednesday 22 April 2020

संचारबंदी काळात अवैध मद्य विक्रीवर प्रशासनाची ‘टाच’


संचारबंदी काळात अवैध मद्य विक्रीवर प्रशासनाची ‘टाच’
·         जिल्ह्यात 77 गुन्हे; 57 आरोपींना अटक
·         9 लाख 71 हजार 521 रूपयांचा मुद्देमाल जप्त                                                               
बुलडाणा, दि. 22 (जिमाका) : कोरोना विषाणू संक्रमणाच्या कालावधीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद करण्यात आलेल्या आहेत. तसेच बारसुद्धा बंद आहेत. मात्र जिल्ह्यात अवैधरित्या मद्य विक्री, मद्य निर्मिती होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागास मिळाली. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक आदींवर प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. संचारबंदी काळात अशा्रपकारचे 77 गुन्हे दाखल करण्यात आली असून 57 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
   लॉकडाऊन कालावधी लागू झाल्यापासून 21 एप्रिल 2020 पर्यंत जिल्ह्यात अवैध मद्याबाबत 77 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.  त्यामध्ये हातभट्टी दारू 508 लीटर, मोहा सडवा रसायन 10309 लीटर, मोहाफुले 20 किलो, विदेशी मद्य 27.45 लीटर, बिअर 202.8 लीटर, देशी मद्य 105.22 लीटर, एक चारचाकी वाहन व 10 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली ओहत. अशाप्रकारे एकूण 9 लाख 71 हजार 521 रूपयांचा दारूबंदी गुन्ह्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
  ही  कारवाई जिल्ह्यातील भिलवाडा, देऊळघाट शिवार, डोंगरखंडाळा शिवार, सुंदरखेड, डोंगरशेवली, अंबाशी, शिरपूर शिवार, अमडापूर, पेठ शिवार, मेहकर फाटा, खरमोळा, लाडनापूर शिवार, खिरोडा व नागापूर शिवार, किन्ही महादेव गाव व शिवार, पारखेड, शेलूडी शिवार, खामगांव, चांदई शिवार, कोलारा, शेळगांव आटोळ शिवार, सावरखेड नजीक शिवार, पळसखेड दौलत शिवार, देऊळगांव घुबे शिवार, गायखेड व हरणखेड शिवार, कुऱ्हा गोतमारा शिवार, शेलापूर, बोराखेडी शिवार, धाड – करडी शिवार, रणथम शिवार, देवधाबा शिवार या जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कारवाई करण्यात आलेली आहे.
     ही कारवाई जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त मोहन वर्दे यांच्या सुचनेनुसार अधिक्षक बी.व्ही पटारे यांचे कालावधीत करण्यात आलेली आहे. या कारवाईत निरीक्षक जी. आर गावंडे, डि. आर शेवाळे, भरारी पथकाचे एस. डी चव्हाण, ए. आर आडळकर, दुय्यम निरीक्षक र.ना गावंडे, एन. के मावळे, वा. रा बरडे आणि यांचे पथकातील कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे, असे अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी कळविले आहे.
                                                                                                ******
पाणी टंचाई निवारणार्थ 30 विंधन विहीरी मंजूर
  • 26 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी घेणार विहीरी
बुलडाणा, दि‍.22 (जिमाका) - पाणीटंचाई निवारणार्थ  सिंदखेड राजा व बुलडाणा तालुक्यातील एकूण 26 गावांमध्ये विंधन विहीरी घेण्यास मंजूरात देण्यात येत आहे. विंधन विहीरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे.
   सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी बु, चांगेफळ, साठेगांव, बोराखेडी गंडे, पिंपरखेड बु, केशवशिवणी, वाकद जहाँगीर, खैरव, पिंपळगांव सोनारा, गुंज, दरेगांव, महारखेड,  राजेगांव, सायाळा, पांग्री काटे, मलकापूर पांग्रा या गावांसाठी एक विंधन विहीर मंजूर करण्यात आली आहे, तर  शेंदुर्जन,  साखरखेर्डा गावांसाठी दोन विंधन विहीरी मंजूर करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे बुलडाणा तालुक्यातील शिरपूर, पांगरी, भडगांव, चिखला, नागझरी खु, आमसरी या गावांसाठी एक विंधन विहीर आणि रायपूर गावासाठी 2 विंधन विहीरी मंजूर करण्यात आलेल्या आहेत. यामुळे या गावांमधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
                                                            ******

कोविड-१९ ला प्रतिबंध करण्‍यासाठी
माहिती आणि‍ प्रसारण मंत्रालयाच्‍या प्रादेशिक लोक संपर्क ब्‍युरोतर्फे पुढाकार
·         ऑनलाईन डिजीटल प्रचार सामुग्री तयार केली
·         फिरत्‍या ऑडियो अनाऊन्‍समेंट द्वारे ग्रामीण भागातून प्रचार अभियान
·         लॉकडाऊनच्‍या काळात शासनाच्‍या विविध योजनाबाबत जनतेच्‍या प्रतिक्रीया जाणून घेण्‍यासाठी विशेष प्रयत्‍न
बुलडाणा, दि‍.22 (जिमाका) - कोविड-१९ या साथरोगाच्या विविध मुदयाबाबत जनजागृती होण्‍यासाठी माहिती आणि‍ प्रसारण मंत्रालयाच्‍या महाराष्‍ट्र आणि गोवा विभागाच्‍या प्रादेशिक लोक संपर्क ब्‍युरोतर्फेविविध डिजीटल प्रचार साधनांची निर्मिती करण्‍यात येत आहे. यामध्‍ये वैयक्‍त‍िक स्‍वच्‍छता राखणेलॉकडाऊनच्‍या काळात घरामध्‍येच राहणेसार्वजनिक ठिकाणी योग्‍य सामाजिक अंतर (सोशल डिस्‍टन्सिंग) पाळणेशासनाच्‍या विविध सूचना व आदेश पाळणेआरोग्‍य सेतु अॅप डाऊनलोड करणेलॉकडाऊनमध्‍ये सुरु असलेल्‍या अत्‍यावश्‍यक सेवांची यादी देणेशारीरिक व मानसिक आरोग्‍य टिकवणे आणि अफवांना आळा बसवणे यांवर भर देण्‍यात येत आहे. ही सर्व प्रचार साधने प्रादेशिक लोक संपर्क ब्‍युरोच्‍या सोशल मिडीयांवर तसेच विभागाच्‍या सर्व कर्मचा-यांच्‍या वैयक्‍त‍िक संपर्क माध्‍यमांवर अपलोड करण्‍यात येत आहे. हे सर्व संदेश व्‍हॉटसअॅपच्‍या माध्‍यमातून दररोज जवळजवळ १३००० लोकांपर्यंत पोहोचवले जात आहेत.
फिरत्‍या ऑडियो अनाऊन्‍समेंटद्वारे जनजागृती अभियान
प्रादेशिक लोक संपर्क ब्‍युरोच्‍यावतीने ध्‍वनीमुद्रि‍त गीते व संदेशाद्वारे फिरत्‍या ऑटोरिक्‍शाटेम्‍पोमधून ऑडियो अनाऊन्‍समेंट सिस्‍टीमने जनजागृती अभियान राबविले. यामध्‍ये प्रामुख्‍याने कोविड-१९ चा प्रसार रोखण्‍यासाठी विविध प्रतिबंधात्‍मक उपायांवर गीत व संदेशाद्वारे जनजागृती केली.  हे अभियान बुलडाणा जिल्‍हयातही राबविण्‍यात आले. दिनांक ७ ते १४ एप्रिल दरम्‍यान या अभियानात एकुण २३ ऑटोरिक्‍शा/टेम्‍पो वरील १६ जिल्‍हयात सुमारे ७००० कि.मी अंतर कापून प्रचार करण्‍यात आला.
जनतेच्या सूचना व प्रतिक्रीया शासनास सादर
      लॉकडाऊनच्‍या काळात जनतेसाठी विविध सुविधा व लाभ शासनामार्फत जाहीर करण्‍यात आले. प्रादेशिक लोक संपर्क ब्‍युरो मार्फत सामान्‍य जनतेच्‍या सूचना व प्रतिक्र‍िया शासनास सादर करणे हे कार्य ही करते. या अभियानात ब्‍युरोमार्फत लॉकडाऊनच्‍या काळात ग्रामीण जनतेच्‍या हिताच्‍या शासनाच्‍या विविध योजनांविषयीच्‍या प्रतिक्र‍िया शासनास कळविण्‍यात आल्‍या. ब्‍युरो कोविड-19 बाबत केवळ शासनाच्‍या विविध योजनांचा प्रचार करीत नाही तर शासन व जनता यांच्‍यातील दुवा म्‍हणून सुध्‍दा काम करीत आहे. सुप्रिम कोर्टाच्‍या आदेशाने अफवा/चुकीची माहितीचा प्रसार रोखण्‍यासाठी भारत सरकारच्‍या प्रेस इन्‍फर्मेशन ब्‍युरो मध्‍ये स्‍थापन केलेल्‍या वस्‍तुस्थिती पडताळणी समिती प्रादेशिक लोक संपर्क ब्‍युरो सहाय करीत आहे. यासाठी जिल्‍हा प्रशासनाशी समन्‍वय साधण्‍यात येत आहे.
                                                                        ********

No comments:

Post a Comment