Wednesday 29 April 2020

DIO BULDANA NEWS 29.4.2020

कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर
विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धान्य वाटपाचे दर व परिमाण जाहीर
बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत माहे मे 2020 चे नियतनातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धान्याचे वाटप दर व परिमाण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी गहू 20 किलो प्रतिकार्ड, तांदुळ प्रतिकार्ड 15 किलो व साखर 1 किलो प्रतिकार्ड परिमाण राहणार आहे. तसेच प्रतिकिलो गहू दर 2, तांदुळ 3 व साखर 20 रूपये किलो असणार आहे.
   त्याचप्रमाणे प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांसाठी गहू प्रतिव्यक्ती 3 किलो व तांदुळ प्रतिव्यक्ती 2 किलो परिमाण असेल. तर गहू प्रतिकिलो 2 रूपये व तांदुळ 3 रूपये किलो असणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत समाविष्ट न होणारे एपिएल (केशरी) शिधापत्रिका शेतकरी असलेल्या लाभार्थ्यांसाठी गहू प्रतिव्यक्ती 4 किलो व तांदुळ प्रतिव्यक्ती 1 किलो परिमाण आहे. दर गहू प्रतिकिलो 2 रूपये व तांदुळ 3 रूपये किलो राहणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय अन्नसुरक्षा व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेत समाविष्ट न होणाऱ्या शिधापत्रिकाधारक शेतकरी  लाभार्थ्यांसाठी  गहू 3 किलो प्रतिव्यक्ती व तांदुळ 2 किलो प्रतिव्यक्ती मिळणार आहे. याचा दर गहू 8 रूपये प्रतिकिलो व तांदुळ 12 रूपये प्रतिकिलो असणार आहे.
   प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत अंत्योदय योजनेतील व प्राधान्य कुटूंब योजनेतील प्रत्येक व्यक्तीस पाच किलो तांदुळ मोफत वितरीत करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी आपल्या लाभाच्या योजनेचा प्रकारानुसर धान्याची उचल करावी व दर द्यावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बेल्लाळे यांनी केले आहे.
***
जिल्ह्यातील दस्तऐवज नोंदणीचे कामास प्रारंभ
·        दुय्यम निबंधक कार्यालयात येताना नागरिकांनी शारिरीक अंतर ठेवावे
बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तऐवज नोंदणीचे कामकाज 20 मार्च पासून बंद करण्यात आले होते. मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये विशेष दक्षता घेवून दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तऐवज नोंदणीचे कामास 20 एप्रिल पासून प्रारंभ करण्यात आला आहे.
  दुय्यम निबंधक कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे. तसेच प्रवेशद्वारावर ठेवलेल्या हॅन्डवाशने हात स्वच्छ धुवावे. दस्तऐवजावर सही करताना प्रत्येक व्यक्तीने स्वत:चे पेन सोबत आणावे. एकच पेन वापरू नये. कार्यालयात येताना नोंदणी करावयाच्या दस्तऐवजा व्यतिरिक्त बॅग, पर्स आदी आत आणता येणार नाही. दस्त नोंदणी करताना येतांना अगोदर, दुय्यम निबंधक यांचेकडून दस्त नोंदणीचा दिनांक व वेळ निश्चित करून घेणे आवश्यक आहे. आरक्षीत केलेल्या वेळेवरच दस्त ऐवजाची नोंदणी करण्यात येईल. आरक्षीत वेळेच्या आधी कार्यालयात येवून गर्दी करता येणार आहे. आपले काम झाल्यानंतर कार्यालयात थांबता येणार नाही.
   कार्यालयात दुय्यम निबंधक यांनी आखून दिलेल्या कार्यालयीन शिस्तीचे व शारिरीक अंतराचे पालन करणे बंधनकारक आहे. लिव्ह अँड लायसन दस्ताची फिजीकल नोंदणी  जुलै 2020 अखेरपर्यंत बंद करण्यात येत आहे. याकरिता नागरिकांना ई- रजीस्ट्रेशन पर्याय उपलब्ध आहे. नोटीस ऑफ इन्टिमेशनचे फिजीकल फायलींग 20 मे पासून जुलै 2020 अखेरपर्यंत थांबविण्यात येणार आहे. अपवादात्मक परिस्थिती वगळून जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये जुन 2020 अखेरपर्यंत मृत्यूपत्र, वाटणीपत्र, हक्कसोड पत्र, नात्यातील बक्षीसपत्र, चुक दुरूस्ती पत्र या दस्तांची नोंदणी थांबविण्यात येत आहे. तसेच कार्यालयात कलम 57 अन्वये शोध थांबविण्यात येत आहे. दस्ताची किंवा सुचीची प्रमाणीत प्रत व मुल्यांकन अहवाल यासाठी कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज करता येणार नाही. अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवरील ऑनलाईन सेवेचा वापर करावा.
   तरी नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी  दुय्यम निबंधक कार्यालयास सहकार्य करावे, असे आवाहन सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी उमेश शिंदे यांनी केले आहे.
                                                                            **********  

कोरोना अलर्ट : जिल्हयात आज प्राप्त 16 रिपोर्ट ‘निगेटीव्ह
बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : जिल्ह्यात आज 29 एप्रिल रोजी 16 रिपोर्ट प्राप्त झाले. हे सर्व 16 रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण 24 रूग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळलेले असून त्यापैकी एक मृत आहे.  त्यापैकी 17  रूग्णांचे कोरोनासाठी दुसऱ्यांदा अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची संख्या 17 आहे, तर सध्या रूग्णालयात 6 रूग्ण उपचार घेत आहेत.   तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 47 आहेत. कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण 6 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 373 आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.
                                                            ******

No comments:

Post a Comment