Tuesday 7 January 2020

DIO BULDANA NEWS 7.1.2020

तालुका स्तरीय लोकशाही दिनाचे 20 जानेवारी रोजी आयोजन
  बुलडाणा, दि.7 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी तालुका स्तरीय लोकशाही दिन संबंधित तहसिल  कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या महिन्याचा तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, 20 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयात होणार आहे.  या दिवशी तहसीलदार व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत.
         जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे.
   अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत. तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही.
   तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात प्राधिकाऱ्यां-कडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल,  असे तहसीलदार यांनी कळविले आहे. 
                                                                                    **********
नांदुरा येथील मद्य विक्री दुकाने 8, 9 व 10 जानेवारी रोजी बंद
·        नांदुरा नगर परिषद पोटनिवडणूक निवडणूक
  बुलडाणा, दि.7 : राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार नांदुरा – 7 – ब नगर परिषदेच्या रिक्त सदस्य पदासाठी पोट निवडणूक होत आहे. या निवडणूकीच्या अनुषंगाने ज्या निर्वाचन क्षेत्रात नगर परिषदेची निवडणूक असेल त्या क्षेत्रातील सर्व देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने, परवानाकक्ष व बिअर शॉपी अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार मतदानाच्या अगोदरच्या दिवशी 8 जानेवारी, मतदानाचा दिवस 9 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत किंवा मतदान संपेपर्यंत आणि मतमोजणीचा दिवस 10 जानेवारी 2020 मतमोजणी संपेपर्यंत मद्य विक्री बंद असणार आहे.
   सदर बंदीचा आदेश जिल्हाधिकारी यांनी मुंबई दारूबंदी कायदा 1949 चे कलम 142 अन्वये  दिला आहे. तरी संबंधित सर्व अनुज्ञप्ती धारकांनी उपरोक्त नमूद दिवशी देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने, परवानाकक्ष व बिअरशॉपी अनुज्ञप्ती बंद ठेवावीत. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरूद्ध कठोर कार्यवाही करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                        *****

शेतकऱ्यांनी मनरेगामधून रेशीम शेती करून आर्थिक उन्नती साधावी
-         जिल्हाधिकारी
·        महा रेशीम अभियानातंर्गत रेशीम रथाचे उद्घाटन
  बुलडाणा, दि.7 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेतांमध्ये रेशीम शेती करावी. रेशीम विकास प्रकल्प राबवावा व आपली आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज केले.
  जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महारेशीम अभियानातंर्गत रेशीम शेतीची माहिती देण्यासाठी जिल्हाभर फिरविण्यात येणाऱ्या रेशीम रथाचे उद्घाटन हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अनिल माचेवाड, जिल्हा रेशीम विकास अधिकारी संजय धामणे, प्रकल्प अधिकारी सुनीलदत्त फडके, तांत्रिक सहायक भैरूलाल कुमावत, नरेंद्र साहू,  रोहयो विभागातील श्रीपाद कलंत्रे, श्री. श्रीवास्तव आदी उपस्थित होते.
  शासन निर्णयानुसार रेशीम शेतीची माहिती सर्व शेतकरी वर्गास होण्यासाठी प्रचार व प्रसार रेशीम रथाद्वारे जिल्हाभर करण्यात येणार आहे. या अभियायनात रेशीम शेती करण्यासाठी उत्सुक शेतकऱ्यांची नोंदणीही करण्यात येणार आहे. तसेच कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतंर्गत जिल्ह्यातील 441 गावांमध्ये रेशीम शेती विकास प्रकल्प राबविण्यासाठी प्रसिद्धी देण्यात येणार आहे.  या योजनेतून तुती रोप वाटीका, तुती लागवड, रेशीम किटक संगोपन साहित्य व संगोपन गृह यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.
  मनरेगातंर्गत या बाबींसाठी तीन वर्षामध्ये 2 लाख 95 हजार 150 रूपयांचे अनुदान कुशल व अकुशल स्वरूपात देण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्ती जास्त शेतकऱ्यांनी रेशीम योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
                                                            ******
विद्यावेतन मंजूर असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी खाते क्रमांक सादर करावे
·             आयटीआय खामगांव येथील प्रशिक्षणार्थी, 15 जानेवारी शेवटची मुदत
  बुलडाणा, दि.7 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगांव येथील ज्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रवेश सत्र ऑगस्ट 2016 पासून विद्यावेतन मंजूर करण्यात आले आहे, अशा सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी आपले खाते क्रमांकाची प्रत या आयटीआय खामगांव येथे सादर करावी. यासाठी शेवटची मुदत 15 जानेवारी 2020 आहे. तरी प्रशिक्षणार्थ्यांन आपली विद्यावेतनाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी बचत खाते क्रमांकाची प्रत आयटीआय येथे सादर करावी. सादर न केल्यास रक्कम शासन जमा करण्यात येईल. त्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांची कोणतीही तक्रार ग्राह्य धरल्या जाणार नाही, याची सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन खामगांव येथील आयटीआय चे प्राचार्य पी. के खुळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                                    *****

No comments:

Post a Comment