Wednesday 8 January 2020

‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेच्या नावाखाली जनतेची फसवणूक

‘वन नेशन  वन रेशन कार्ड’ योजनेच्या नावाखाली जनतेची फसवणूक
·        चिखली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
·        जनकल्याण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट निधी या नावाने करत होते फसवणूक
  बुलडाणा, दि.8 : वन नेशन वन रेशन कार्ड या प्रकल्पातंर्गत जनकल्याण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट निधी या नावाने सदस्यत्व देवून जनतेची फसवणूक होत असल्याचा प्रकार चिखली येथे समोर आला आहे. यासंदर्भात सामाजिक माध्यम व्हॉट्स ॲपवरून संदेशही प्रसारीत करण्यात आलेले आहे. या प्रकरणाची पुरवठा कार्यालयामार्फत सखोल चौकशी करण्यात आली. त्यानुसार शासनाची अशी कुठलीही योजना नसताना खोटी जाहीरात देवून जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी राजेश वाहूरवाघ, रा. जुने पोलीस चौकीजवळ, चिखली यांच्या विरूद्ध पोलीस स्टेशन, चिखली येथे गुन्हा दाखल करण्यता आला आहे.
  याप्रकरणी चिखली तहसिल कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी यांनी चिखली पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, वन नेशन वन रेशन कार्ड (स्मार्ट रेशन कार्ड) साठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात तालुकानिहाय केंद्राची नेमणूक करणे आहे. एका केंद्राला 25 हजार डाटा मिळणार असून प्रति कार्ड एन्ट्री 80 रूपये प्रमाणे देण्यात येईल. तसेच लॅपटॉप, स्कॅनरआणि सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात येईल व साहित्यासह कन्सल्टींग फी 5.50 लक्ष रूपये देण्यात येईल, अशी जाहीरात सामाजिक माध्यम व्हॉ्टस ॲपवरून करण्यात आल्याचे आढळून आले. या जाहीरातीत मोबाईल क्रमांक 9404443187 व वेब साईट www.jednidhi.com असे नमूद केले होते.
   या वेब साईटवरील प्रोफाईल तपासली असता डायरेक्टर राजेश जे वाहुरवाघ, जनकल्याण इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट निधी, जुन्या पोलीस चौकीजवळ, चिखली असा पत्ता आढळून आला. त्याचप्रमाणे सनद किशोर जैन, रा. भुसावळ रोड,  मुक्ताईनगर, जि. जळगांव यांच्याकडून 100 रूपये बॉण्ड पेपरवर वन नेशन वन रेशन कार्ड (स्मार्ट रेशन कार्ड) साठी केंद्राकरीता करारनामा केल्याचे निदर्शनास आले. अशाप्रकारची शासनाची कुठलीही योजना नसताना कागदपत्रांचे बनावटीकरण करून शासनाची योजना असल्याचे भासवून फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास आले.
      तरी अशाप्रकारे या योजनेसंदर्भात कुठलीही जाहीरात अथवा कागदपत्रे आढळून आल्यास तात्काळ जिल्हा पुरवठा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा तसेच संबंधित तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागास संपर्क करावा. जनतेने अशा कुठल्याही जाहीरातीला व त्यामधील भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.   
************
जल,वायु व गिर्यारोहण हे साहसी क्रीडा प्रकार आयोजीत करणा-या संस्थांची होणार नोंदणी
·        13 जानेवारी 2020 पर्यंत अंतिम मुदत
       बुलडाणा, दि. 8 :  जमिनीवरील साहसी क्रीडा, जल साहसी क्रीडा, हवाई साहसी क्रीडा प्रकाराचा वापर करून सशुल्क व जाहीरपणे आयोजीत केलेले सर्व उपक्रम गिर्यारोहण (प्रस्तरारोहण, स्कीईंग, स्नो बोर्डींग इ.) हवाई क्रीडा (पॅरासेलींग,हँग्लायडींग, पॅरा मोटरींग, पॅराग्लायडींग, स्काय डायविंग/पॅरा शुटींग, इ.) जल क्रीडा प्रकार (राफ्टींग, स्कुबा डायव्हींग इ.) या साहसी क्रीडा प्रकारातील कोणत्याही तंत्राचा वापर करून केलेले उपक्रम (उदा. गिर्यारोहणाच्या एखाद्या तांत्रीक बाबीचा स्वतंत्रपणे वापर करून केलेले पुढील उपक्रम- रॅपलिंग, वॉटर फॉल रॅपलिंग, व्हॅली क्रॉसींग, टायरोलीन ट्रॅव्हर्स, जायंट स्विंग इ.) इत्यादी साहसी क्रीडा प्रकार आयोजीत करणा-या संस्था, ज्या संस्थांची नोंदणी संस्था अधिनियम 1860 अन्वये  धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी झालेली/कंपनी कायदा 2013 च्या कलम 8 प्रमाणे ना नफा तत्वावर झाली आहे. अशा उपरोक्त कोणताही साहसी क्रीडा उपक्रम आयोजीत करणारी संस्था / किंवा व्यवसायीक संस्थांनी दि. 26 जूलै 2018 रोजीचे शासन निर्णयानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा येथे नोंदणी करणे आवश्यक आहे.
            तरी उपरोक्त प्रमाणे साहसी क्रीडा उपक्रम राबवित असलेल्या बुलडाणा जिल्हयातील संस्थांनी दि. 13 जानेवारी 2020 पर्यंत  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा येथे दि. 26 जूलै 2018 रोजीचे शासन निर्णयानुसार सर्व कागदपत्रे/ प्रमाणपत्रासह नोंदणी करीता अर्ज सादर करावा. या करीता शासनाने जिल्हास्तरावर सनियंत्रन समिती मा. जिल्हाधिकारी अध्यक्ष, जिल्हा क्रीडा अधिकारी सह सचिव, सबंधित महसूल विभागातील प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सदस्य सचिव व इतर सदस्य असलेली समिती गठित केली आहे. नोंदणी न करता जी संस्था उपरोक्त साहसी उपक्रमाचे आयोजन करत असेल तर तिच्या विरूध्द प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा समितीस राहील. तसेच अधिक माहिती व नियम अटीकरीता कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        ******
पशुपालक शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर वैरण बियाणे व खत वितरण
·        25 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करावे
बुलडाणा, दि. 8 : राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत सन 2019-20 मध्ये वैरण बियाणे व खते वितरण या करीता  जिल्हयामध्ये 100 टक्के अनुदानावर वैरण बियाणे व खते वितरण करण्यात येणार आहे. या  योजनेची अंमलबजावनी जिल्ह्यात करावयाची असुन त्यामध्ये प्रति पशुपालक अथवा शेतकरी यांच्या किमान 10 गुठ्ठे क्षेत्रफळावर वैरण उत्पादन घेण्यासाठी अनुदानाची मर्यादा 460 रूपये व कमाल मर्यादा 2 हेक्टरकरीता 4600 रूपये आहे.
   सदर योजनेतंर्गत 100 टक्के अनुदानावर मका , शुगर ग्रेज , ज्वारी (बहु कापणी) ,  नुट्रीफिड, (लसुन घास) बाजरी या वैरण बियाण्याचा पुरवठा पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अथवा पशुवैदयकिय संस्थामार्फत करण्यात येणार आहे.  चारा पिकाच्या लागवडीकरीता जमिनीची मशागत लागवड खर्च लाभार्थ्याला स्वत: करावयाची असुन बियाण्याची किंमत वगळुन उर्वरीत रक्कमेतुन लाभार्थ्याने युरीया खताची खरेदी करावी.  पेरणी नंतर आवश्यकते नुसार वेळोवेळी खत दयावे. खरेदी केलेल्या खताची रक्कम लाभार्थ्यांना डिबीटीव्दारे अदा करण्यात येईल. सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी योजनेच्या विहीत नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दिनांक 25 जानेवारी 2020 पर्यंत पशुधन विकास अधिकारी (वि), पंचायत समिती यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.पी.जी.बोरकर यांनी पशुपालक शेतकऱ्यांना प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                                    ******
खामगांव उपविभागातील 66 गावांमध्ये भूजल अधिनियम लागू
  • खामगांव तालुक्यातील 45 व शेगांव तालुक्यातील 21 गावांचा समावेश
बुलडाणा, दि.8 – खामगांव उपविभागातील खामगांव तालुक्यातील 45 व शेगांव तालुक्यातील 21 गावांमध्ये  उपविभागीय अधिकारी यांनी पाणीटंचाई घोषीत केली आहे.  सदर गावांमध्ये महाराष्ट्र भुजल विकास अधिनियम 2009 लागू करण्यात आला आहे. या अधिनियमानुसार अधिसूचित सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे 500 मिटरच्या अंतरामध्ये कोणतीही व्यक्ती, कोणत्याही प्रयोजनासाठी कोणत्याही विहीरीचे खोदकाम करणार नाही.
  भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने पुरविलेल्या माहितीच्या आधारे सार्वजनिक पिण्याच्या स्त्रोतांभोवती निश्चित व अधिसुचित केलेल्या प्रभाव क्षेत्रात कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रयोजनासाठी विहीरीचे खोदकाम करणार नाही. प्रभाव क्षेत्रामधील किंवा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून एक किलोमीटर अंतरामध्ये यापैकी जे अधिक असेल अशा क्षेत्रातील अशी विहीर तात्पुरती बंद करणे, भूजल काढण्यासाठी विहीत करण्याच्या दृष्टीने विनीयम करण्यात येईल. भूजल पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होईल अशी कोणतीही कृती कुणीही करणार नाही. या अधिनियमनातील विविध तरतुदींचा भंग झाल्यास दंड व शिक्षेकरीता संबंधित तहसिलदारांनी त्वरित अहवाल सादर करावयाचा आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे कायम व्यवस्थापन करण्यामध्ये आणि पाणी टंचाईच्या काळात स्त्रेातांचे संरक्षण करण्यासाठी पंचायत जिल्हा प्राधिकरणास मदत करेल, असे उपविभागीय अधिकारी खामगांव  यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                        ही आहेत गावे
खामगांव तालुका : लांजुड, पिंप्री देशमुख, किन्ही महादेव, चिखली बु, जळका तेली, शिराळा, निपाणा, चिखली खु, हिवरा खु, उमरा, आवार, बोरजवळा, शेलोडी, लोणी गुरव, वाकुड, गारडगाव, राहुड, पळशी खु, दापटी, हिवरा बु, चितोडा, घाणेगांव, अंबिकापूर, हिंगणा कारेगाव, खामगाव ग्रामीण, कुऱ्हा, जयपूर लांडे, ढोरपगांव, घाटपुरी, फत्तेपूर, नागझरी खु, श्रीधर नगर, झोडगा, पळशी बु, धदम, तांदुळवाडी, पारधी फाटा अंत्रज, बेलखेड, पोरज, माक्ता/कोक्ता, इवरा, नागझरी बु, कवडगांव, भंडारी व तरोडानाथ, शेगांव तालुका : हिंगणा वैजनाथ, घुई, उनारखेड, माटरगांव बु, जानुरी, तिंत्रव, तरोडा का, वरखेड बु, गव्हाण, वरूड, गायगाव बु, गायगांव खु, कनारखेड, टाकळी विरो, चिंचोली, सवर्णा, गौलखेड, कुरखेड, भोनगांव, आळसणा व जलंब.
******
नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित
·        15 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करावे
  बुलडाणा, दि. 8 - केंद्र शासनाचे महिला व बालविकास विभागाद्वारे समाजात महिला सशक्तीकरण, समाज व राष्ट्र निर्माण करण्याचे कामात उत्कृष्ट योगदान देणारी व्यक्ती, संस्था यांना दरवर्षी नारी शक्ती राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे. जागतिक महिला दिन 8 मार्च 2020 रोजी सदर पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे .  सदर पुरस्काराकरिता ऑनलाईन अर्ज अथवा आवेदन मागविण्यात येत आहे. तरी सदर पुरस्कारासाठी अर्ज www.nari shaktipurskar.wcd.gov.in या संकेतस्थळावर  उपलब्ध असून अर्ज भरण्याची अंतिम तारिख 15 जानेवारी 2020 आहे.
   या पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष व प्रशास्तीपत्र असून पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्जच स्वीकारल्या जाणार आहे. या पुरस्कारासाठी वैयक्तिक अर्ज करणाऱ्यांचे वय 1 नोव्हेंबर 2019 रोजी 25 वर्ष पुर्ण केलेले असावे. पुरस्कारासाठी संस्था आवेदन करीत असल्यास त्यास सामाजिक कार्याचा कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव असावा, अर्जदारास यापूर्वी मंत्रालयाने दिलेल्या स्त्री शक्ती पुरस्कारासह पुर्वीचा समान पुरस्कार प्राप्त असू नये, अर्जदारास ग्रामीण भागातील महिलांना सोयी- सवलती उपलब्ध करणे, तंत्रज्ञान, कला व संस्कृती, खेळ, महिला सुरक्षा, आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, जीवन कौशल्य, महिला सक्षमीकरणासाठी दिलेले योगदान याबाबतचा अनुभव असावा. राज्य अथवा केंद्र शासीत प्रदेशात बाल लैंगिक गुणोत्तर अचुकपणे सुधारणा करण्याचे काम करणाऱ्यांचा या पुरस्कारासाठी प्रथम प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये  केले आहे.
                                                                        ******
शेतकऱ्यांनी खाते आधार संलग्न करावे
-         जिल्हाधिकारी
  बुलडाणा, दि. 8 – महात्मा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर झाली आहे. या योजनेचा लाभ 30 सप्टेंबर 2019 पर्यंत 2 लाख रूपयापर्यंत  थकीत पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. तरी या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेत असलेल्या बँकेमध्ये जावून खात्याशी आधार क्रमांक संलग्न केलेला नसल्यास खात्याला आधार क्रमांक संलग्न करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी केले.
     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बँक प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. मेहेर, जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण आदींसह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
   आधार क्रमांक संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँकनिहाय प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सदर याद्या पाहून शेतकऱ्यांनी आपल्या नाव नसल्याची खात्री करून घ्यावी. यादीत नाव असल्यास तात्काळ संबंधित बँकेत संपर्क करून आधार क्रमांक द्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.
                                                            ******

No comments:

Post a Comment