Friday 31 January 2020

DIO BULDANA NEWS 31.1.2020

जागतिक सुर्यनमस्कार दिवसाचे आज आयोजन
  • जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल मैदानावर होणार कार्यक्रम
   बुलडाणा, दि. 31 :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे आदेशान्वये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा व क्रीडा भारती यांचे संयुक्त विद्यमाने, सामुहिक सुर्य नमस्कार कार्यक्रमाचे आयोजन दि.1 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 7.45 ते 8.30 वाजता जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल मैदान येथे करण्यात येणार आहे.
      जागतीक सुर्यनमस्कार दिनाचे आयोजनासंदर्भात दि.30 जानेवारी 2020 रोजी जिजामाता प्रेक्षागार मैदानवरील कक्षात सभा पार पडली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ.श्रीराम पानझाडे,क्रीडा भारतीचे श्रीकृष्ण शेटे, सदानंद काणे, बाळ आयचीत, आरोग्य भारतीचे डॉ. राजेश्वर उबरहंडे, आर्ट ऑफ लिव्हींगचे  प्रशांत लहासे, बी.डी.सावळे, सौ.अंजली परांजपे, राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे, पी.आर.वानखडे तसेच योग संदर्भात काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
      जागतिक सुर्य नमस्कार दिनाच्या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तसेच सर्व लोकप्रतिनिधी, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी, जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी, एकविध खेळ संघटनांचे पदाधिकारी, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, पतंजली योग समिती, योग विद्या धाम, आर्ट ऑफ लिव्हींग, आरोग्य भारतीचे सर्व पदाधिकारी तसेच शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, औद्योगीक प्रशिक्षण संस्थांचे विद्यार्थी, समाजकार्य, आयुर्वेदीक महाविद्यालय, पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी वर्ग, क्रीडा मंडळे, शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी वर्ग, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व सर्व योगप्रेमी उपस्थित राहणार आहेत.
   तरी बुलडाणा शहरातील सर्व योगप्रेमी नागरीकांनी, खेळाडूंनी, अधिकारी, कर्मचारी यांनी जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलडाणा येथे सकाळी 7.45 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी  केले आहे.
******
धनगर समाजातील विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण मिळणार
  • इयत्ता पहिलीपासून ते 12 वी पर्यंतच्या शिक्षणाचा समावेश
   बुलडाणा, दि. 31 : राज्य शासनाने 6 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार विजाभज, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, इमाव व विमाप्र कल्याण विभागामार्फत धनगर समाजाच्या उत्थानासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. समाजातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण न घेतल्यामुळे मागे राहू नये, यासाठी शासनाने दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळण्याकरीता शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
   धनगर समाजातील विद्यार्थ्यांना दरवर्षी जवळच्या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत यामुळे शिक्षण घेता येणार आहे. इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता 12 वी पर्यंत या नामांकित शाळांमध्ये शिक्षण घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. भटक्या जमाती – क प्रवर्गातील विधवा, घटस्फोटीत, निराधार, परित्यक्त्या यांची मुले व दारिद्र्य रेषेखालील कुटूंबातील मुलांना यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालयाशी संपर्क साधावा. योजनेचा धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        *******

ज्ञानगंगा फॉरेस्ट मॅरोथॉन स्पर्धेनिमित्त बुलडाणा ते खामगांव मार्गावरील वाहतुकीत बदल
 बुलडाणा, दि. 31 : बुलडाणा अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी म. बुलडाणा ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर्स व रनबडीज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानगंगा फॉरेस्ट मॅरेथॉन स्पर्धा रविवार, दि. 2 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा बोरखेड फाटा ते बोथा खामगांव रस्त्याने आयोजीत आहे. या स्पर्धेनिमित्ताने 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 ते 11 या कालावधीत बुलडाणा-वरवंड-बोथा-खामगांव या रस्त्यावरील वातुकीस पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.  
    मुंबई पोलीस कायद्याचे कलम 33 अन्वये जिल्हाधिकारी यांनी  बुलडाणा-वरवंड-बोथा-खामगांव रस्त्यावरील वाहतूक दि. 2 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 5 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविली आहे. सध्याच्या प्रचलित मार्गानुसार  बुलडाणा-वरवंड- बोथा- खामगांव  या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्ग बुलडाणा-वरवंड-उंद्री- खामगांव, बुलडाणा-मोताळा-नांदुरा-खामगांव आणि बुलडाणा-मोताळा-तरवाडी-पिंपळगांव राजा-खामगांव या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 131 अन्वये उचित कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                                    *******
केंद्र शासन निवृत्ती वेतन धारकांच्या कायदेशीर वारसदारांनी कागदपत्रे सादर करावीत
  • 6 मार्च 2020 पर्यंत मुदत
 बुलडाणा, दि. 31 : सामान्य प्रशासन विभागाच्या 13 मार्च 2019 च्या शासन निर्णयाअन्वये राज्यातील केंद्र शासन स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतन धारकांना 1 जुन 2004 ते 31 जानेवारी 2019 पर्यंतची त्या –त्या वेळी देय असलेल्या दराने थकबाकी अदा करावयाची आहे. तरी जिल्ह्यातील जे केंद्र शासन निवृत्त वेतन धारक शासनाकडून अतिरिक्त 500 रूपये बँकेमार्फत परस्पर निवृत्तीवेतन घेतात. तसेच जे केंद्र शासन निवृत्ती वेतन धारक आज रोजी हयात नाहीत, अशा केंद्र शासन निवृत्ती वेतन धारकांच्या कायदेशीर वारसदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे कार्यालयीन वेळेत 6 मार्च 2020 पर्यंत कागद पत्रांसह अर्ज सादर करावा.
   या कागदपत्रांमध्ये केंद्र शासन निवृत्तीवेतन धारक यांचे हयातीचे प्रमाणपत्र, केंद्र शासन निवृत्ती वेतनधारक हयात नसतील, तर मृत्यू प्रमाणपत्र व त्यांचे कायदेशीर वारसदार असल्याचे प्रमाणपत्र, निवृत्तीवेतन मंजूरी आदेशाची प्रत, सदर निवृत्तीवेतन कधीपासून निवृत्तीवेतन घेत आहेत याबाबतचा पुरावा व दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक आदींचा समावेश आहे. तरी कागदपत्रांसह अर्ज सादर करून लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        ****
बाल न्याय मंडळाच्या बैठकीचे आज जळगांव जामोद येथे आयोजन
  बुलडाणा, दि. 31 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील अधिकारान्वये राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील नियमानुसार मंडळाची फिरती बैठक आयोजित करण्यात येते. येत्या शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 रोजी आशा पंचायत समिती सभागृह, जळगांव जामोद येथे मंडळाच्या फिरत्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मंडळासमोर त्या- त्या भागातील विधी संघर्षग्रस्त बालकांची प्रकरणे सुनावणीसाठी घेण्यात येणार आहे. तरी या बैठकीला संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शासकीय मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह अधिक्षक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                                    ******

No comments:

Post a Comment