Wednesday 29 January 2020

DIO BULDANA NEWS 29.1.2020


शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करावे
  • 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत मुदत
 बुलडाणा, दि. 29 : क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्याची योजना कार्यान्वित आहे.  यामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अंतर्गत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, शिवछत्रपी राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.  सन 2018-19 या वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करावे.
            या पुरस्कारासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येतील.  संबंधितांनी ऑनलाईन अर्जामध्ये आपल्या कामगिरीच्या तपशिलासह www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या link वर अर्ज व संबंधित माहिती सादर करावी.  ऑनलाईन भरलेल्या अर्जाची एक प्रत स्वयंसाक्षांकीत प्रमणपत्रांसह अर्जदाराने संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत सादर करावे.  तसेच ऑफलाईनद्वारे अर्ज सादर करणाऱ्या अर्जदारांनी आपला अर्ज संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात 5 फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत.  याबाबत अधिक माहिती, पात्रतेचे निकष व नियमावल इ. माहितीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर शासन निर्णय 24 जानेवारी, 2020 चे अवलोकन करावे. जीवन गौरव पुरस्काराकरीता अर्ज मागविण्यात येत नसून अशा ज्येष्ठ क्रीडा महर्षीच माहिती नामांकनाद्वारे केंद्र शासनाचे पुरस्कारार्थी (महाराष्ट्रामधील) यांचेकडून तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी, विभागीय उपसंचालक हे संचालनालयास सादर करतील.  अधिक माहितीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय  पुणे, संबंधित विभागाचे विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवकसेवा, अथवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.  पुरस्कारासाठी विहीत मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  शेखर पाटील यांनी केले आहे.
                                                                                    *****
जिल्हास्तरीय बालमहोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा
 बुलडाणा, दि. 29 : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यावतीने बाल विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय अथवा स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी बालमहोत्सव शासकीय मुलांचे निरीक्षणगृह, शरद कला वाणिज्य महाविद्यालय, चिखली रोड, बुलडाणा येथे साजरा करण्यात आला.
  या महोत्सवात मुलांसाठी विविध खेळ, वर्क्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन 27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश साजीद आरीफ सय्यद, तर बाल न्याय मंडळाचे विशेष प्रमुख दंडाधिकारी अमोलकुमार देशपांडे, बाल कल्याण समिती अध्यक्षा श्रीमती कस्तुरे, बाल न्याय्य मंडळाच्या शरद कला महाविद्यालयाचे सचिव अजिंक्य पाटील, औरंगाबाद येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रमोद येंडोले, जिल्हा कोषागार अधिकारी श्री. बावस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, प्राचार्य, शिक्षकवृंद, महिला व बाल विकासचे अधिकारी  उपस्थित होते.
   सदर बाल महोत्सवात विभागाच्या संस्थांमधील तसेच इतर शाळेतील एकूण 400 बालके या कार्यक्रमात सहभागी होती. प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती बेबी सेानोने यांनी केले. तर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी मार्गदर्शन केले. संचलन प्रदीप सपकाळ यांनी व आभार प्रदर्शन श्रीमती खनपटे यांनी केले, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                                    ***
जिल्हाधिकारी कार्यालयात
3 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिन
  बुलडाणा, दि. 29 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन यावेळी सोमवार दि. 3 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे.  या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत. तसेच तालुका स्तरावर तहसील कार्यालयात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.
         जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे. अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनी संबंधीत नागरिकांनी उपस्थित राहून दोन प्रतींमध्ये आपली निवेदने जिल्हाधिकारी यांना सादर करावीत. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत.
तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल,  असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
********
बाल न्याय मंडळाच्या बैठकीचे 1 फेब्रुवारी रोजी जळगांव जामोद येथे आयोजन
  बुलडाणा, दि. 29 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील अधिकारान्वये राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील नियमानुसार मंडळाची फिरती बैठक आयोजित करण्यात येते. येत्या शनिवार, 2 फेब्रुवारी 2020 रोजी आशा पंचायत समिती सभागृह, जळगांव जामोद येथे मंडळाच्या फिरत्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मंडळासमोर त्या- त्या भागातील विधी संघर्षग्रस्त बालकांची प्रकरणे सुनावणीसाठी घेण्यात येणार आहे. तरी या बैठकीला संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शासकीय मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह अधिक्षक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        *******
आदिवासी विकास विभागातील कंत्राटी शिक्षक पदाच्या परीक्षेत बदल
  बुलडाणा, दि. 29 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय आश्रम शाळेवर शिक्षक/निर्देशक व कला कार्यानुभव शिक्षक पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी 24 ऑगस्ट 2019 जाहीरात नुसार अर्ज मागविण्यात आले होते. सदर पद भरतीकरीता जाहीरातमधील अट क्रमांक तीनमध्ये कंत्राटी कला कार्यानुभव व कंत्राटी संगणक शिक्षक / निर्देशक या पदासाठी लेखी परीक्षा ही 50 गुणांची, तोंडी परीक्षा ही 10 गुणांची आणि स्कील टेस्ट 15 गुणांची अशी एकूण परीक्षा 75 गुणांची घेण्याचे नमूद होते.
  त्यामध्ये निवड समितीने बदल करण्याचा निर्णय घेवून संगणक शिक्षक / निर्देशक या पदासाठी 100 प्रश्नांसाठी 200 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे. त्यामध्ये सामान्य ज्ञान 50 गुण, मराठी भाषा 50 गुण, इंग्रजी भाषा 50 गुण, अंकगणित 50 गुण तसेच कला / कार्यानुभव शिक्षक या पदासाठी 100 प्रश्नांना 200 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे. त्यामध्ये 70 प्रश्न कला विषयाशी निगडीत असतील, तर 30 प्रश्न सामान्य ज्ञानावर आधारीत असतील. अशाप्रकारे बदल करण्यात येत असून सर्व पात्र उमेदवारांनी अथवा परीक्षार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे प्रकल्प अधिकारी आर. बी हिवाळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

No comments:

Post a Comment