Friday 3 January 2020

DIO BULDANA NEWS 3.1.2020




महिलांनी अत्याचाराला तोंड देण्यासाठी ‘सायबर साक्षर’ व्हावे
-         जिल्हा पोलीस अधिक्षक
·        सायबर सेफ वुमेन कार्यक्रम थाटात
·        वैयक्तिक माहिती संरक्षीत ठेवून सामाजिक माध्यमांचा उपयोग करावा
  बुलडाणा, दि. 3 : महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. या वाढलेल्या घटनांमध्ये सायबर साक्षरतेचा अभाव हे एक मुख्य कारण असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या समाज माध्यमांचे युग आहे. सेकंदामध्ये माहिती जगभर व्हायरल होते. अशा परिस्थितीत  महिलांनी स्वत: वर ऑनलाईन, सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून अत्याचाराला तोंड  देण्यासाठी सायबर साक्षर व्हावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील – भुजबळ यांनी केले आहे.
      जिल्हा पोलीस दल, शैक्षणिक संस्था व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या विद्यमाने प्रभा भवन, पोलीस मुख्यालय येथे ‘सायबर सेफ वुमेन’ या मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला. त्यावळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर उप जिल्हाधिकारी (निवडणूक) गौरी सावंत, माजी जिल्हा सत्र न्यायाधीश अजय दिनोदे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. इंदूमती लहाने, सरकारी अभियोक्ता ॲड सोनाली सावजी उपस्थित होत्या.
   पोलीस प्रशासन महिला दक्षता समित्यांमार्फत पिडीत महिलांना न्याय देण्याचे काम करीत असल्याचे सांगत जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणाले, या समित्यांमार्फत अनेक पिडीत महिलांची प्रकरणे येतात. या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलीस स्टेशनला असलेल्या महिला समुपदेशन कक्षामार्फत संबंधीतांचे समुपदेशन करण्यात येते. तुटलेले संसार जोडण्याचे काम समुपदेशनातून झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येत नाही. महिला सुरक्षेच्यादृष्टीने पोलीस प्रशासनाने महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणी तक्रार निवारण पेट्या लावल्या आहेत. पिडीत महिलांनी या तक्रार पेट्यांमध्ये तक्रारी टाकून न्याय मिळवावा. यामध्ये नावही गुप्त ठेवण्यात येते. सदर पेट्या आठवड्यातून एक वेळ उघडल्या जातात.
  ते पुढे म्हणाले, जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात महिला सुरक्षेसाठी 1091 महिला हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनचा उपयोग महिलांनी तक्रारी करण्यासाठी करावा. तसेच 8698000011 या मोबाईल क्रमांकावरही तक्रार करता येते. जिल्हा पोलीस प्रशासनाने कळी उमलतांना उपक्रम सुरू केला. या उपक्रमातंर्गत वुमेन सेल्फ डिफेन्सचा कराटे प्रशिक्षणाचा कार्यक्रमही सुरू होणार आहे.  यामध्ये मास्टर ट्रेनर तयार करण्यात येवून हे मास्टर ट्रेनर मुली कळी उमलताना उपक्रमाचे ब्रँण्ड ॲम्बेसीडर असणार आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालय व शाळांमध्ये पोलीस दादा व पोलीस दिदी ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. महाविद्यालयीन मुली तक्रारी संबंधीत पेालीस दिदीकडे देवू शकतात.
  यावेळी उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांनी या युगात महिलांनी सजग राहून सुरक्षीत रहावे असे आवाहन केले. ॲड सोनाली सावजी म्हणाल्या, महिलांच्या विविध सुरक्षेसाठी कायदे आहेत. या कायद्याचा आधार महिलांनी घ्यावा. सायबर क्राईम विषयी माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चा उपयोग करावा. माजी जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. दिनोदे म्हणाले, या युगात केवळ मोबाईलचे सर्व फंक्शन माहित आहे म्हणून त्यामधील स्वत: तज्ज्ञ समजू नये. आयटी तज्ज्ञ ही सुरक्षीत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने सायबर साक्षर व्हावे.
    संचलन नरेंद्र लांजेवार यांनी, तर आभार प्रदर्शन सहायक पोलीस निरीक्षक मंगलाताई वाकडे यांनी केले.  कार्यक्रमाला पोलीस उपअधीक्षक बी. आर गिते, सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे,  पोलीस निरीक्षक श्रीमती कोरडे, एपीआय श्री. सानप, सायबर सेलचे पोहोकाँ ज्ञानेश्वर नागरे, पोलीस कर्मचारी राजु आडवे, पवन मखमले, कैलास ठोंबरे, संजय भुजबळ, योगेश सरोदे आदींसह पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.   
                                                                        ******
महाविद्यालय स्तरावर 8 हजार 614 शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित
  • महाविद्यालयांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज तपासून प्रस्ताव सादर करावे
  • 15 जानेवारी 2020 पर्यंत मुदत
   बुलडाणा, दि.3 : अनु जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क, व्यावसायिक पाठ्यक्रम संलग्न विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजनांसाठी www. mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. महाडिबीटी या संगणकीय प्रणालीवरील डॅशबोर्डचा 3 जानेवारी 2020 रोजी आढावा घेतला असता महाविद्यालय स्तरावर अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाचे 8 हजार 614 अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास या अर्जांवर मंजुरीची कोणतीही कार्यवाही करता आली नाही. अनुसूचित जाती, इमाव, विमाप्र व विजाभज प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये म्हणून महाडीबीटी पोर्टलवरील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत  15 जानेवारी 2020 पर्यंत देण्यात आली आहे. तेव्हा महाविद्यालय प्राचार्यांनी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परिक्षा शुल्क अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकाची सुचना विद्यार्थ्यांना लेखी कळवून सुचना महाविद्यालयाच्या सुचना फलकावर लावावी.
   महाविद्यालय प्राचार्य यांनी महाडीबीटी संगणकीय प्रणालीवरील विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्ज प्रचलित नियमानुसार तपासणी करुन पात्र अर्ज  तात्काळ सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, बुलडाणा  यांचेकडे मंजुरीसाठी ऑनलाईन सादर करावेत. तसेच भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण, परिक्षा शुल्क योजनेचा कोणताही अनुसूचित जाती, इमाव, विमाप्र, विजाभज प्रवर्गातील पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहील्यास त्यास सर्वस्वी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार राहतील, असे सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
                                                                                    *****

सावित्रीबाई फुले यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
      बुलडाणादि.3  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त आज 3 जानेवारी 2020 रोजी अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी  सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे,  निवासी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे, गौरी सावंत, भुषण अहीरे, श्री. माचेवाड आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment