Sunday 26 January 2020

सर्वतोपरी संपन्न जिल्हा करण्यासाठी शासन कटीबद्ध - पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे





  • पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा थाटात
  • कर्जमुक्ती योजनेतून 2 लक्ष 940 पात्र शेतकऱ्यांना 140.74 कोटीचा लाभ
  • जिल्हा मुख्यालयी तीन ठिकाणी शिव भोजन थाळी सुरू
  • अवैध गुटखा विक्रीतून जिल्ह्याला मुक्त करण्याचा निर्धार
  • शिष्यवृत्ती योजनांमधून 9 कोटी 40 लक्ष रूपये शिष्यवृत्तीचे वाटप
बुलडाणा, दि. 26 -  जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाचा निधी खेचून खर्ची घालण्यात येणार आहे. जिल्हा हा राज्यामध्ये सर्वच क्षेत्रात अग्रेसर रहावा, यासाठी प्रयत्न केल्या जाणार आहे. जिल्ह्याला सर्वतोपरी संपन्न जिल्हा करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतीपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.
    भारतीय प्रजासत्ताकाचा 70 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधीत करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, जि.प अध्यक्षा मनिषा पवार, उपाध्यक्ष कमलताई बुधवत, माजी आमदार विजयराज शिंदे,  नगराध्यक्षा श्रीमती नजमुन्नीसा मो. सज्जाद, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अप्पर जिल्हाधिकारी श्री. दुबे आदींसह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक यांची उपस्थिती होती.
    जिल्ह्यात काढणीच्या वेळी आलेल्या परतीच्या व अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले,  अशा हवालदील परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत आर्थिक मदत जाहीर केली. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात प्राप्त निधीपैकी 4 लक्ष 64 हजार 985 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 433 कोटी 49 लक्ष रूपयांच्या आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले आहे.  राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त नव्हे, तर चिंतामुक्त करण्यासाठी शासनाने 1 एप्रिल 2015 पासून ते 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत व्याजासह मुद्दल असलेले 2 लाख रूपये पिक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून जिल्ह्यात 2 लक्ष 940 लाभार्थी शेतकऱ्यांना 140.74 कोटी रूपये त्यांच्या थेट कर्ज खात्यात जमा होणार आहे. यामुळे बळीराजावरील कर्जाचे ओझे निश्चितच उतरणार आहे.
    ते पुढे म्हणाले, गरीब व आर्थिक दुर्बल घटकाला नाममात्र दहा रूपये दरात दर्जेदार जेवण मिळावे, यासाठी राज्य शासनाने शिव भोजन थाळी योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत बुलडाणा जिल्हा मुख्यालयी तीन ठिकाणी आजपासून शिव भोजन योजनेला सुरूवात करण्यात आली आहे.  जिल्ह्यात रोजगार हमी योजनेमधून सन 2019-20 मध्ये आतापर्यंत 62 हजार 200 व्यक्तींना रोजगार देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात रोहयो अंतर्गत 1312 कामे सुरू असून त्यावर 6 हजार 845 मजूरांची उपस्थिती आहे. मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्यासाठी राज्य शासन सिंदखेड राजा विकास आराखडा राबवित आहे. तसेच लोणार पर्यटन विकास आराखडाही राबविण्यात येत आहे.  पंतप्रधान आवास योजनेतंर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागात सन 2018-19 मध्ये 1 हजार 53 घरकूल पूर्ण करण्यात आली आहे. सद्य स्थितीत 3 हजार 989 घरकुलांचे काम मंजूर करण्यात आले आहे.  जिल्ह्यात  जिगांवसोबतच जिल्ह्यात अरकचेरी, चौंढी, आलेवाडी या लघु प्रकल्पांची कामे सुरू आहे. तसेच बोरखेडी, दुर्गबोरी, निम्न ज्ञानगंगा, दिग्रस लघु प्रकल्प पुर्ण करण्यात आले आहे. यामधून 3 हजार 541 हेक्टर सिंचन निर्माण झाले आहे.
     गुटखा बंदीचा निर्धार व्यक्त करताना पालकमंत्री म्हणाले, आरोग्यासाठी घातक असणारा गुटखा अवैधरित्या राज्यात विकल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यात 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत 17 लक्ष 96 हजार रूपये किमतीच्या प्रतिबंधीत गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात 3 लक्ष 51 हजार 917 कुटूंबांना वैयक्तिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  विविध मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचण येवू नये, म्हणून शिष्यवृत्ती योजनांमधून 9 कोटी 47 लक्ष रूपयांची शिष्यवृत्ती वितरीत करण्यात आली आहे. शासनाने महिलांना आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडता यावी, त्यांना निर्भिड वातावरणात तक्रार करता यावी, यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या महिला पोलीस पिडीत महिलेची तक्रार ऐकून तिचे सांत्वन करतील. दोषींवर कठोर कारवाई करून पिडीतेला न्याय देतील. माझ्या माता – भगिणींना सुरक्षीत वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध  असल्याचेही त्यांनी सांगितले.
     राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने आजपासून लोकशाही व सुशासन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. हा पंधरवडा 10 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.  लोकशाही प्रक्रियेतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्थान, अधिकार, जबाबदाऱ्या, कर्तव्य आणि त्यांच्या निवडणुकांचे गांभीर्य अधोरेखित व्हावे आणि लोकशाहीचा पाया मजबुत व्हावा, हा पंधरवाडा साजरा करण्यामागील मुख्य उद्देश असल्याचे ते म्हणाले.   
  कार्यक्रमाच्या सुरूवातीला पालकमंत्री यांनी परेड निरीक्षण केले. बुलडाणा पुरूष व महिला पोलीस दल, होमगार्ड पुरूष व महिला दल, वन रक्षक दल, पोलीस बँण्ड पथक तसेच शिघ्र कृती दल आदींनी मानवंदना दिली. यानंतर विविध विभागांच्या चित्ररथांचे सादरीकरण करण्यात आले.  विविध विद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी कराटे प्रात्याक्षिक, लेझीमचे सामुहिक संचलनाचे सादरीकरणह कार्यक्रमाप्रसंगी केले. कार्यक्रमाचे संचलन नरेंद्र लांजेवार व अंजली परांजपे यांनी केले. कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, समाज भूषण पुरस्कार प्राप्त,  विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी व नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
                                                                        ********
                                    प्रजासत्ताक दिनी पोलीस कवायत मैदानावर विविध पुरस्कारांचे वितरण
       बुलडाणा, दि. 26 : पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते आज 26 जानेवारी 2020 रोजी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पोलीस कवायत मैदानावर विविध पुरस्कार, आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले. सशस्त्र सेना ध्वजदिन 2018 चे उत्कृष्ट निधी संकलनाबाबत जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांना स्मृतिचन्ह देण्यात आले. पुलवामा व गडचिरोली येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटूंबियांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण यावेळी करण्यात आले. यामध्ये मलकापूर येथील शहीद जवान संजयसिंह राजपूत यांच्या पत्नी श्रीमती सुषमा राजपूत व आई श्रीमती जिजाबाई राजपूत, गोवर्धन नगर ता. लोणार येथील शहीद जवान नितीन राठोड यांच्या पत्नी श्रीमती वंदना राठोड व आई सौ. सावित्रीबाई राठोड, गडचिरोली येथे शहीद झालेले  सर्जेराव खार्डे रा. आळंद ता. दे.राजा यांच्या पत्नी श्रीमती स्वाती खार्डे व आई सौ कमलबाई खार्डे, तसेच मेहकर येथील शहीद जवान राजु गायकवाड यांच्या पत्नी श्रीमती भारती गायकवाड व आई सौ. आसराबाई गायकवाड यांना प्रत्येकी 4 लक्ष 53 हजार 29 रूपयांचा धनादेश देण्यात आला. जिल्हा पोलीस दलातर्फे नक्षलग्रस्त भागात खडतर व कठीण कर्तव्य बजाविल्याबाबत पो. नि गिरीष ताथोड, पो. कॉ प्रभाकर शिवणकर, संदीपसिंह राजपूत, अशोक गायकवाड, सुनील शेगोकार व मनोजकुमार  उमाळे यांना विशेष सेवा पदक देण्यात आले. तसेच पुरात जीव धोक्यात घालून मदत केल्याबद्दल पो. कॉ निवृत्ती सानप यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. त्याचप्रमाणे महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी कळी उमलताना प्रकल्प राबविल्याबाबत मुक्तेश्वर कुळकर्णी, कु. शिवगंगा सुरडकर, श्वेता भगत च सुरज खंडेराव यांना पारितोषिक वितरीत करण्यात आले.
   जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार राजेश्वर खंगार यांना, तर गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार वैभव लोढे यांना प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 2018 मध्ये राष्ट्रीय स्तरावर गेलेल्या शेगांव येथील गजानन महाराज इंग्रजी शाळेचे विद्यार्थी ओंकार सोमानी, राघव मुरारका व कृष्णा सोमानी यांचा गौरव करण्यात आला.  संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातंर्गत सन 2018-19 चे ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये विभागून प्रथम क्रमांक अजिसपूर ता. बुलडाणा व पांगरखेड ता. मेहकर यांना देण्यात आला. तसेच सावळी ता. बुलडाणा ग्रामपंचायतीला द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक वझर आघाव ता. लोणार यांना देण्यात आले. गुणानुक्रमे पुरस्कार वझर ता. खामगांवया ग्रा.पं ला प्रदान करण्यात आला. राज्यस्तर शालेय तेंग- सुडो  स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून दिल्ली येथील शालेय राष्ट्रीय स्पर्धेत वजन व वयोगटात देशातून तिसरा क्रमांक पटकाविणाऱ्या कु. मोहिनी समाधान राऊत व मार्गदर्शक किरण अंबुसकर यांचा गौरव करण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर काटा व फाईट या कराटे क्रीडा प्रकारात जिजाऊ ज्ञान मंदीर आणि कनिष्ठ महाविद्यालय, पळसखेड भट येथील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये भूषण सिरसाट, साद समीर खान, समर्थ देशमाने, आशिष दांडगे, शिवम उबाळे, प्रणव देशमाने, वेदांत खंडागळे यांचा समावेश आहे.  त्याचप्रमाणे शाळांना प्रथमोपचार पेटीचे वितरणही करण्यात आले.
                                                                                    ****


शिव भोजन थाळी योजनेला पालकमंत्री यांच्याहस्ते प्रारंभ
  • जिल्हा मुख्यालयी बस स्थानक, बाजार समिती व जिजामाता प्रेक्षागार मैदानाजवळ मिळणार थाळी
  • 10 रूपये नाममात्र दरात उपलब्ध
बुलडाणा, दि. 26 -  प्रजासत्ताक दिनी आज 26 जानेवारी रोजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते जिजामाता प्रेक्षागार मैदानाजवळील राजर्षी शाहू महाराज पतसंस्थाद्वारा संचलीत भोजनालयात शिव भोजन थाळी योजनेला प्रारंभ करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बेल्लाळे, अर्जुन बोरसे, विजय अंभोरे आदींची उपस्थिती होती.
   शिव भोजन थाळी योजनेची सुरूवात जिल्हा मुख्यालयी तीन ठिकाणी करण्यात आली. याव्यतिरिक्त बस स्थानक व कृषि उत्पन्न बाजार समितीचा यामध्ये समावेश आहे. शिव भोजन थाळी योजनेतंर्गत दुपारी 12 ते 2 या वेळेत नाममात्र 10 रूपये दरात थाळी मिळणार आहे. जेवणाचा दर्जा चांगला ठेवून स्वच्छता राखावी, अशा सूचना यावेळी पालकमंत्री यांनी केल्या. कार्यक्रमानंतर शिव भोजन थाळीचा आस्वादही मान्यवरांनी घेतला. याप्रसंगी संबंधित अधिकारी, भोजनालयाचे मालक, कर्मचारी उपस्थित होते.
                                                                        ******

No comments:

Post a Comment