सेवा संकल्पांतर्गत वरवट बकाल येथे ‘NCD तपासणी’द्वारे आरोग्याचा जागर भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांची आरोग्य तपासणी; आजार प्रतिबंधाबाबत जनजागृती
बुलढाणा, दि. २८ (जिमाका) : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भटक्या व विमुक्त जाती-जमातीतील नागरिकांना
विविध शासकीय आरोग्य सेवा व योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत
असलेल्या ‘सेवा संकल्प’ कार्यक्रमांतर्गत तहसील कार्यालय, वरवट बकाल येथे असंसर्गजन्य
आजार (NCD) तपासणी व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
या उपक्रमात उपस्थित नागरिकांची प्राथमिक
आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब, रक्तातील साखर, वजन, उंची तसेच BMI आदी
तपासण्या करण्यात आल्या. तपासणीदरम्यान आरोग्यविषयक तक्रारी अथवा जोखमीची लक्षणे आढळलेल्या
नागरिकांना आवश्यकतेनुसार पुढील तपासणी व उपचारासाठी संबंधित आरोग्य संस्थांकडे संदर्भित
करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान मधुमेह, उच्च रक्तदाब,
हृदयरोग व कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी नियमित आरोग्य तपासणीचे
महत्त्व नागरिकांना समजावून सांगण्यात आले. संतुलित आहार, नियमित व्यायाम, तंबाखू व
गुटखा सेवन टाळणे तसेच धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहण्याबाबत आरोग्य शिक्षण व
समुपदेशन करण्यात आले.
याशिवाय पात्र नागरिकांना उपलब्ध शासकीय
आरोग्य सेवा व विविध आरोग्य योजनांची माहिती देण्यात आली. आरोग्यविषयक समस्या असलेल्या
लाभार्थ्यांना पुढील उपचार, तपासण्या व आवश्यक आरोग्य सेवांबाबत मार्गदर्शन करण्यात
आले.
सेवा संकल्प कार्यक्रमाच्या माध्यमातून
आरोग्य सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासोबतच आजारांचे वेळीच निदान आणि
प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक सवयींबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला.
0000

Comments
Post a Comment