अमडापूर येथे सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण; ‘कसं काय?’ मोहिमेअंतर्गत ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यावर भर
बुलढाणा, दि. ८ (जिमाका) : राज्य शासनाच्या 'माझे गाव
आरोग्य संपन्न गाव' अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या 'कसं काय?' मोहिमेच्या माध्यमातून
सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी चिखली तालुक्यातील
प्राथमिक आरोग्य केंद्र अमडापूर येथे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळाचे आयोजन करण्यात
आले. कार्यशाळेत आरोग्य विभागातील विविध स्तरांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आधुनिक
प्राथमिक आरोग्य सेवा व्यवस्थेचे प्रशिक्षण देऊन ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यावर
भर देण्यात आला.
नागरिकांना
गुणवत्तापूर्ण, सुलभ आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्य व कल्याण
केंद्रांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांची गुणवत्ता वाढविणे तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य
कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता.
जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव तसेच
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सरपाते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेत जिल्हा
प्रशिक्षण केंद्राचे डॉ. निलेश जाधव व वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय खरात यांच्यासह डॉ.
शिवानंद शिंगाडे, डॉ. संतोष सांगळे, डॉ. शैलेश खंडारे, डॉ. जीवन भारती, सुवर्णा बेलसरे,
स्वाती शेंद्रे, कविता खाडे, सुनिता जवंजाळ आणि सुलोचना पराड यांनी प्रशिक्षक म्हणून
मार्गदर्शन केले. यावेळी विविध जिल्हास्तरीय कार्यक्रम अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे
अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यशाळेत वैद्यकीय अधिकारी,
समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक आणि आशा समन्वयक
यांनी सहभाग नोंदविला. त्यांना सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा, राष्ट्रीय आरोग्य
कार्यक्रम, समुदाय आधारित आरोग्य सेवा, रुग्णाभिमुख सेवा वितरण, आरोग्य नोंद व्यवस्थापन
तसेच आरोग्य व कल्याण केंद्रांच्या कार्यक्षम कार्यपद्धतीबाबत सखोल प्रशिक्षण देण्यात
आले.
प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्ष
गृहभेटींवर विशेष भर देण्यात आला. उपकेंद्र स्तरावरील समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य
कर्मचारी, आशा कार्यकर्त्या आणि गटप्रवर्तक यांनी नागरिकांच्या घरी भेट देऊन प्राथमिक
आरोग्य सेवांअंतर्गत समाविष्ट असलेल्या १४ आरोग्य सेवांची माहिती संकलित करणे, अचूक
नोंदी ठेवणे तसेच आवश्यक लाभार्थींना तपासणी, उपचार आणि औषधोपचारासाठी प्राथमिक आरोग्य
केंद्रात पाठविणे, अशा सूचना देण्यात आल्या.
गृहभेटीदरम्यान आढळणाऱ्या रुग्णांच्या
गरजेनुसार आवश्यक औषधांचा वेळेत पुरवठा करून स्थानिक पातळीवरील उपचार व्यवस्था अधिक
सक्षम करण्याचे महत्त्वही प्रशिक्षणात अधोरेखित करण्यात आले. तसेच गटप्रवर्तकांनी १४
प्राथमिक आरोग्य सेवांच्या तपासणी सूचीच्या आधारे नियमित पर्यवेक्षण करणे ही प्रभावी
आरोग्य व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक बाब असल्याचे प्रशिक्षकांनी स्पष्ट केले.
कार्यशाळेतील तज्ज्ञांची सादरीकरणे,
चर्चासत्रे आणि प्रात्यक्षिकांना सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद
दिला. या प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक
दर्जेदार, लोकाभिमुख आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी होणार असून, त्यामुळे
आरोग्य विभागाचे मनुष्यबळ अधिक सक्षम होऊन सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवांच्या प्रभावी
अंमलबजावणीला अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
00000


Comments
Post a Comment