चारचाकी वाहन मासिक भाडेतत्त्वावर देण्यासाठी सिलबंद निविदा मागविल्या; ५ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 


बुलढाणा दि.31 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा कार्यालयाच्या दैनंदिन कार्यालयीन कामकाज व दौऱ्यांसाठी चालक व इंधनासह चारचाकी वाहन मासिक भाडेतत्त्वावर उपलब्ध करून घेण्यासाठी इच्छुक सेवा पुरवठादारांकडून सिलबंद निविदा मागविण्यात आल्या आहेत. संबंधित निविदा ५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यालयात सादर कराव्यात, असे आवाहन सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या शासन ज्ञापनानुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रास वाहन भाडेतत्त्वावर घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार कार्यालयातील गठित समितीने दरमहा ३ हजार किलोमीटरपर्यंत वापरासाठी चारचाकी वाहन भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे.

इच्छुक सेवा पुरवठादारांनी विहित नमुन्यातील दरपत्रकासह PUC, पॅनकार्ड, वाहन चालकाचा परवाना, विमा, आरसी बुक, टुर्स अँड ट्रॅव्हल्स नोंदणी प्रमाणपत्र व जीएसटी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. वाहन हे पहिल्या मालकीचे व पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीतील असावे. अलीकडे खरेदी केलेल्या वाहनांना प्राधान्य दिले जाणार आहे.

निवड झालेल्या सेवा पुरवठादाराने कार्यादेश मिळाल्यानंतर दोन दिवसांच्या आत चालकासह सुस्थितीतील वाहन उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. वाहनाची देखभाल, इंधन, वंगण, दुरुस्ती तसेच चालकाचे मानधन याची जबाबदारी सेवा पुरवठादाराची राहील. दौऱ्यादरम्यान लागणारा टोल कर मात्र मासिक भाड्यासोबत अदा करण्यात येणार आहे.

कार्यालयाकडून चालकाला ओव्हरटाईमचा कोणताही मोबदला देण्यात येणार नाही. वाहन २४ तास, सातही दिवस (24x7) उपलब्ध ठेवणे आवश्यक असून, प्रत्येक सेवा पुरवठादारास केवळ एकच दरपत्रक सादर करता येईल. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या निविदांचा विचार केला जाणार नसल्याचेही सहायक आयुक्त. ग. प्र. बिटोडे यांनी स्पष्ट केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या