राज्य पुरस्कृत योजनेतून शेतकऱ्यांना परदेश अभ्यास दौऱ्याची संधी; १७ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 


बुलढाणा, दि. ३० (जिमाका): राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना युरोप व चीनसह विविध देशांतील आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ व्हावा, यासाठी अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. १७ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक शेती, पीक उत्पादकता वाढ, सेंद्रिय शेती, फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, कृषी यांत्रिकीकरण, कृषी प्रक्रिया, निर्यात संधी आणि कृषी बाजार व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा आहे. योजनेसाठी अर्ज करणारा लाभार्थी स्वतः शेतकरी असणे आवश्यक असून त्याच्याकडे अॅग्रीस्टॅक Farmer ID, वैध पासपोर्ट आणि आधार कार्ड असणे बंधनकारक आहे. तसेच अर्जदाराचे वय किमान २५ वर्षे असावे, तो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा आणि यापूर्वी शासनाच्या आर्थिक सहाय्याने परदेश अभ्यास दौरा केलेला नसावा.

या योजने अंतर्गत शासनाकडून अभ्यास दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल २ लाख रुपये इतके अनुदान देण्यात येणार असून उर्वरित खर्च संबंधित शेतकऱ्याने करावयाचा आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावा. प्राप्त प्रस्तावांची जिल्हास्तरावर छाननी करून आवश्यकतेनुसार सोडत पद्धतीने निवड करण्यात येईल, तर अंतिम निवड राज्यस्तरीय समितीमार्फत केली जाईल.  अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

0000

Comments