राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजनांसाठी २२ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव मागविले;शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी अर्ज करण्याचे आवाहन
बुलढाणा,दि.17(जिमाका)
: भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत राजा राममोहन रॉय ग्रंथालय
प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी (Matching) व असमान निधी (Non-Matching) योजनांअंतर्गत
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात
आले आहेत. या योजनांच्या माध्यमातून राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण
विकासासाठी विविध प्रकारचे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्या
माध्यमातून या योजना राबविण्यात येत असून इच्छुक ग्रंथालयांनी विहित नमुन्यात प्रस्ताव
सादर करावेत. अर्जाचा नमुना, नियम व अटी प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तेथून
अर्ज डाउनलोड करून भरता येणार आहे.
समान निधी योजनेअंतर्गत इमारत बांधकाम
व विस्तारासाठी कमाल २५ लाख रुपये अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. या योजनेव्यतिरिक्त
इतर समान निधी योजनांचा लाभ केंद्रीय स्तरावर दिला जात असल्याने त्या योजनांसाठी प्रस्ताव
सादर करू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
असमान निधी योजनांमध्ये ग्रंथालय सेवा
देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तारासाठी
अर्थसहाय्य, ‘ज्ञान कोपरा’ विकसित करण्यासाठी २.५० लाख रुपये, आधुनिकीकरणासाठी २ लाख
रुपये, महोत्सवी वर्षानिमित्त विशेष अर्थसहाय्य, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा,
प्रशिक्षण वर्ग व जनजागृती कार्यक्रमांसाठी अर्थसहाय्य तसेच ‘बालकोपरा’ स्थापन करण्यासाठी
कमाल ६.८० लाख रुपयांपर्यंत सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शासनमान्य
सार्वजनिक ग्रंथालयांनी आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी किंवा हिंदी भाषेत चार प्रतींमध्ये
प्रस्ताव संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे दि. २२ ऑगस्ट २०२६ पर्यंत सादर
करावेत. तसेच राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या ऑनलाइन प्रणालीद्वारेही प्रस्ताव
अपलोड करणे आवश्यक आहे.
यासंदर्भातील अधिक माहिती, नियम व अर्जाचा
नमुना प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आवश्यकतेनुसार संबंधित जिल्हा ग्रंथालय
अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment