नायलॉन मांजाच्या वाहतूक व पुरवठ्यावर नियंत्रणासाठी परिवहन विभागाचे आवाहन वाहतूकदार, पार्सल सेवा व कुरिअर एजन्सींनी घ्यावी विशेष दक्षता

 


बुलढाणा, दि. 28 (जिमाका) : प्रतिबंधित सिंथेटिक (नायलॉन) मांजाची विक्री, उत्पादन, साठवण आणि वाहतूक रोखण्यासाठी परिवहन विभागाने राज्यभर प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने यासंदर्भात निर्देश जारी केले असून, राज्यातील सीमा तपासणी नाक्यांवरही विशेष निरीक्षण करण्यात येणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने प्रतिबंधित नायलॉन मांजाची निर्मिती, साठवण आणि पुरवठा रोखण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक वाहतूकदार, पार्सल सेवा आणि कुरिअर एजन्सींनी आपल्या स्तरावर बैठक घेऊन नायलॉन मांजाची वाहतूक होणार नाही, यासाठी आवश्यक दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संशयास्पद पार्सल व मालवाहतुकीची नियमित तपासणी करून प्रतिबंधित नायलॉन मांजाची वाहतूक आढळल्यास संबंधित प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असेही परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व वाहतूकदार, मालवाहतूक सेवा, पार्सल कार्यालये आणि कुरिअर एजन्सींना प्रतिबंधित नायलॉन मांजाची वाहतूक अथवा पुरवठा न करण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे काटेकोर पालन करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सहकार्य करावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

पतंगबाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजामुळे पक्षी, नागरिक तसेच दुचाकीस्वारांच्या जीवितास धोका निर्माण होण्याच्या घटना घडत असल्याने या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या