उत्तरपूर्व भारत अभ्यास दौऱ्यासाठी बुलढाण्यातील युवक-युवतींना संधी; 20 जुलैपर्यंत नोंदणीचे आवाहन

 


 

बुलढाणा, दि. 16 (जिमाका) : उत्तरपूर्व क्षेत्र विकास मंत्रालयाच्यावतीने देशातील युवकांना उत्तरपूर्व भारतातील सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा अनुभवता यावा, तसेच राष्ट्रीय एकात्मता अधिक बळकट व्हावी या उद्देशाने "अष्टलक्ष्मी दर्शन युवा देवाणघेवाण कार्यक्रम (Youth Exchange Programme)" राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी बुलढाणा जिल्ह्यातील पात्र व इच्छुक युवक-युवतींनी दि. 20 जुलै 2026 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांनी केले आहे.

या कार्यक्रमांतर्गत देशातील 28 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील 15 ते 29 वर्षे वयोगटातील एकूण 1 हजार 280 विद्यार्थ्यांना उत्तरपूर्व भारतातील अग्रगण्य विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये 14 दिवसांच्या अभ्यास व अनुभव भेटीची संधी दिली जाणार आहे. या भेटीदरम्यान सहभागी युवक-युवतींसाठी 9 दिवसांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील आयोजित करण्यात येणार असून, त्यातून त्यांना शैक्षणिक, सांस्कृतिक व नेतृत्व विकासाचा अनुभव मिळणार आहे.

वित्तीय वर्ष 2026-27 मध्ये हा कार्यक्रम दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. पहिला टप्पा 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर 2026 आणि दुसरा टप्पा 1 नोव्हेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत आयोजित करण्यात येईल. महाराष्ट्र राज्यातून या कार्यक्रमासाठी दोन टप्प्यांमध्ये प्रत्येकी 10 युवक व 10 युवती, अशा एकूण 20 युवक-युवतींची निवड करण्यात येणार आहे. प्रत्येक महसूल विभागातून एक युवक व एक युवती यांची निवड होणार असून, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक युवक व एक युवती यांची नावे प्रस्तावित करण्यात येणार आहेत.

निवडीसाठी अर्ज करणारे युवक-युवती 15 ते 29 वर्षे वयोगटातील असावेत. तसेच शक्यतो पदवीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. याशिवाय युवा पुरस्कारार्थी, राष्ट्रीय छात्रसेना (NCC), राष्ट्रीय सेवा योजना (NSS), भारत स्काऊट्स अँड गाईड्समधील रोव्हर्स व रेंजर्स यांना निवड प्रक्रियेत विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.

इच्छुक युवक-युवतींनी दि. 20 जुलै 2026 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून नाव नोंदवावे तसेच परिशिष्ट-अ भरून आवश्यक माहिती सादर करावी. बुलढाणा जिल्ह्यातून निवड झालेल्या गुणवंत युवक व युवतींची नावे अमरावती विभागाकडे पाठविण्यात येणार असून, त्यातून विभागीय स्तरावर अंतिम निवड करून संचालनालयाकडे यादी सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांनी कळविले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन