विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेला वेग जिल्हाभर बीएलओंकडून घरोघरी पडताळणी; नागरिकांनी अचूक माहिती देण्याचे प्रशासनाचे आवाहन

 

 






बुलढाणा दि.6 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला वेग आला असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) जिल्हाभर घरोघरी भेट देऊन मतदारांची माहिती पडताळण्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने करत आहेत. गणना प्रपत्र भरून घेण्यासह पात्र मतदारांची माहिती अचूकपणे नोंदविण्यावर भर दिला जात आहे.

 

जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक आणि बीएलओ यांच्या समन्वयातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी विविध भागांना भेटी देऊन मोहिमेचा आढावा घेत असून आवश्यक त्या सूचना देत आहेत.

 

मोहिमेदरम्यान बीएलओ नागरिकांच्या घरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेत आहेत. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देत अचूक माहिती द्यावी तसेच प्रपत्रातील माहितीची खातरजमा करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

"मतदार यादी जितकी अचूक आणि अद्ययावत, तितकी लोकशाही अधिक सक्षम होते. त्यामुळे विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत प्रत्येक पात्र मतदाराने सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे," असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.

 

ज्या नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने माहिती सादर करावयाची आहे, त्यांच्यासाठी ईसीआयनेट (ECINET) ॲप तसेच https://voters.eci.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या माध्यमातूनही गणना प्रपत्र भरता येत असून आवश्यकतेनुसार संबंधित बीएलओ किंवा मतदार नोंदणी कार्यालयाकडून मार्गदर्शन मिळू शकते.

 

अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह मतदार यादी तयार करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची असल्याने प्रत्येक पात्र मतदाराने त्यात सक्रिय सहभाग नोंदवून लोकशाही प्रक्रियेला अधिक बळकटी द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

तलाव मासेमारी ठेक्यासाठी निविदा आमंत्रित