साखरखेर्डा येथे अपर तहसीलदार कार्यालय प्रस्तावित; सूचना व हरकती मागविल्या

 


 

बुलढाणा दि.3 (जिमाका ): जिल्ह्यातील प्रशासकीय सेवा अधिक प्रभावी व नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने साखरखेर्डा येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन असून, या कार्यालयाच्या निर्मिती तसेच कार्यक्षेत्र निश्चितीबाबत नागरिकांकडून सूचना, हरकती व आक्षेप दि. 8 जुलैपर्यंत मागविण्यात आले आहेत. नागरिकांनी निर्धारित मुदतीत सूचना व हरकती सादर करून प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. २३ जून २०२६ रोजीच्या निर्देशानुसार नवीन कार्यालयांची मुख्यालये व कार्यक्षेत्र निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार साखरखेर्डा येथे अपर तहसीलदार कार्यालय प्रस्तावित करण्यात आले असून, या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात शेंदुर्जन व साखरखेर्डा या दोन महसूल मंडळांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.

 

या प्रस्तावानंतर सिंदखेडराजा तहसीलअंतर्गत कार्यरत असलेल्या मूळ तहसीलदार कार्यालयाकडे सिंदखेडराजा, सोनोषी, किनगाव राजा, दुसरबीड आणि मलकापूर पांग्रा ही पाच महसूल मंडळे राहणार आहेत. सध्या सिंदखेडराजा तहसीलअंतर्गत एकूण सात महसूल मंडळांचा समावेश असून, प्रस्तावित पुनर्रचनेनंतर त्यापैकी दोन मंडळे नव्या अपर तहसीलदार कार्यालयाकडे वर्ग करण्यात येणार आहेत.

 

प्रस्तावित अपर तहसीलदार कार्यालयाची निर्मिती अथवा कार्यक्षेत्र निश्चितीबाबत कोणाला काही सूचना, हरकती किंवा आक्षेप असल्यास ते लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत, म्हणजेच दि. ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत, संबंधितांनी आपल्या सूचना व हरकती उपविभागीय अधिकारी कार्यालय, सिंदखेडराजा येथे लेखी स्वरूपात सादर कराव्यात. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती अथवा आक्षेपांचा विचार केला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती