अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचनावर ९० टक्के अनुदान; जुलैअखेरपर्यंत विशेष मोहीम
बुलढाणा दि.7 (जिमाका): प्रधानमंत्री
राष्ट्रीय कृषी विकास योजना- प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित
जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यात १ ते
३१ जुलै २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे पात्र शेतकऱ्यांकडून
जास्तीत जास्त अर्ज प्राप्त करून घेण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.
या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती
व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अल्प व अत्यल्प भूधारक लाभार्थ्यांना मुख्यमंत्री शाश्वत
सिंचन योजनेतून २५ टक्के, तर इतर पात्र शेतकऱ्यांना ३० टक्के पुरक अनुदान देण्यात येणार
आहे. उर्वरित १० किंवा १५ टक्के अनुदान अनुक्रमे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन
योजना अथवा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून उपलब्ध होणार असून, एकूण ९० टक्क्यांपर्यंत
अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.
या विशेष मोहिमेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित
जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे
आवाहन कृषी विभागाने केले आहे. योजनेविषयी अधिक माहिती तसेच अर्ज प्रक्रियेसंदर्भात
संबंधित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी किंवा सहायक कृषी
अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोषकुमार
डाबरे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment