जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; आठवडाभरात १०० हून अधिक क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वितरण

 



बुलढाणा, दि. 14 (जिमाका) : प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केलेल्या आवाहनाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अवघ्या आठवडाभरात १०० पेक्षा अधिक क्षयरुग्णांना 'निक्षय मित्र' उपक्रमातून पोषण आहार (फूड बास्केट) किटचे वितरण करण्यात आले आहे.

समाजातील विविध संस्था, स्वयंसेवी संघटना, लोकप्रतिनिधी, दानशूर व्यक्ती आणि नागरिकांनी पुढाकार घेत क्षयरुग्णांना दत्तक घेण्यास सुरुवात केली आहे. भारताला २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या वतीने 'प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत क्षयरुग्णांना नियमित औषधोपचारासोबतच सकस व पोषक आहार मिळणे आवश्यक असल्याने 'निक्षय मित्र' संकल्पना राबविण्यात येत आहे. यामध्ये इच्छुक व्यक्ती, संस्था किंवा उद्योगसमूह क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना दरमहा पोषण आहार उपलब्ध करून देतात.

जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, "क्षयरोग हा केवळ वैद्यकीय विषय नसून सामाजिक समस्याही आहे. योग्य उपचारांसोबत पोषणयुक्त आहार मिळाल्यास रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तो लवकर बरा होतो. जिल्ह्यातील एकही क्षयरुग्ण पोषणापासून वंचित राहू नये, यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घ्यावा. आपल्या छोट्याशा सहकार्यामुळे एका रुग्णाला नवजीवन मिळू शकते." इच्छुक नागरिकांनी निक्षय मित्र म्हणून नोंदणी करण्यासाठी जिल्हा क्षयरोग विभाग अथवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

अभियानाला मिळालेल्या प्रतिसादातून बुलढाणा येथील सहयोग ग्रुपने २५ क्षयरुग्णांना दत्तक घेत त्यांना पोषण आहार किटचे वितरण केले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे, उपजिल्हाधिकारी रुपेश खंडारे, नायब तहसीलदार नागेश खरात, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा श्रीधर गुट्टे, डॉ. राजेश्वर उबरहंडे, डॉ. आशिष खासबागे, डॉ. गणेश गायकवाड तसेच सहयोग ग्रुपचे कुणाल पैठणकर, भारत काटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याच अभियानांतर्गत मेहकर तालुक्यातील सुबोध युवक कल्याण मंडळ, डोणगाव यांनीही सामाजिक बांधिलकी जपत मे आणि जून महिन्यात उपचार घेत असलेल्या तालुक्यातील सर्व क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वितरण केले. या कार्यक्रमाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी, माजी जिल्हा परिषद सभापती सायलीताई सावजी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा श्रीधर गुट्टे, डोणगावचे सरपंच शिवचरण आखाडे, माजी सरपंच जुबेर खान, आत्माराम दांडगे, बंडू पांडव, डॉ. नकुल फुले, बबलू वाघमारे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

निक्षय मित्र अभियानाची वैशिष्ट्ये:

           समाजातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व उद्योगसमूहांना सहभागी होण्याचे आवाहन.

           क्षयरुग्णांना किमान सहा महिने ते कमाल तीन वर्षांपर्यंत दत्तक घेण्याची सुविधा.

           दरमहा डाळी, तृणधान्ये, खाद्यतेल व प्रथिनयुक्त अन्नपदार्थांचा पोषण आहार किट उपलब्ध.

           रुग्णाच्या इच्छेनुसार त्याची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्याची व्यवस्था.

जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांच्या पुढाकारामुळे बुलढाणा जिल्ह्यात निक्षय मित्र अभियानाला वेग मिळाला असून, शासन आणि समाज यांच्या संयुक्त सहभागातून क्षयरोगमुक्त जिल्ह्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

तलाव मासेमारी ठेक्यासाठी निविदा आमंत्रित