ग्रामीण उद्योजकांसाठी 'ग्रामोद्योग भरारी पुरस्कार-२०२६'; २८ जुलैपर्यंत नामांकन अर्ज सादर करण्याचे आवाहन

 


बुलढाणा, दि. 21 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय "ग्रामोद्योग भरारी पुरस्कार-२०२६" साठी नामांकन अर्ज मागविण्यात आले आहेत. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विशेषतः ग्रामीण भागात यशस्वी उद्योग उभारून रोजगारनिर्मिती करणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्यासाठी ही पुरस्कार योजना राबविण्यात येत आहे.

पुरस्कार योजनेअंतर्गत प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन प्रमुख पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या काही उद्योजकांना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत शासनाच्या विविध योजनांद्वारे अर्थसहाय्य घेऊन यशस्वी उद्योग उभारणाऱ्या आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणाऱ्या उद्योजकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे, तसेच त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने ही पुरस्कार योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील ग्रामोद्योग क्षेत्राला अधिक चालना मिळावी आणि उद्योगवृद्धीस प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.

पुरस्कारासाठी नामांकन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक उद्योजकांनी मंडळाच्या www.mskvib.org या संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करावा किंवा जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, आशीर्वाद बिल्डिंग, मुट्टे ले-आऊट, शहीद जवान युद्ध स्मारकाजवळ, बुलढाणा येथून अर्ज प्राप्त करावा. पूर्ण भरलेले नामांकन अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि. २८ जुलै २०२६ पर्यंत जिल्हा कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या