'माझे गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियानाच्या अंमलबजावणीची राज्यस्तरीय पाहणी

 





राज्य समन्वयक अमोल पाटील यांची खामगाव तालुक्यातील विविध आरोग्य संस्थांना भेट; अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीचा घेतला आढावा

बुलढाणा, दि. २४ जुलै (जिमाका) : राज्य शासनाच्या 'माझे गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्य समन्वयक अमोल पाटील यांनी शुक्रवारी खामगाव तालुक्यातील विविध आरोग्य संस्थांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीदरम्यान आरोग्य सेवा, अभियानाची अंमलबजावणी आणि विविध आरोग्य निर्देशांकांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

दौऱ्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, खामगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र गणेशपूर, उपकेंद्र हिवरखेड, शहरी नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र, खामगाव तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, खामगाव येथे भेट देण्यात आली. संबंधित आरोग्य संस्थांमधील सेवा वितरण, नागरिकांसाठी राबविण्यात येणारे जनजागृती उपक्रम, नोंदवही व अभिलेख व्यवस्थापन, अभियानाचे नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची पाहणी करण्यात आली.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव तसेच संबंधित तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांशी संवाद साधत अभियान अधिक परिणामकारक करण्यासाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य सेवांची गुणवत्ता, सेवा वितरणातील सातत्य आणि गावपातळीवरील लोकसहभाग वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला.

पाहणीवेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश टापरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. तेलंग, डॉ. राठोड, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी राजेश धुताडमल, जिल्हा मूल्यांकन अधिकारी मोहम्मद मुदस्सीर, सांख्यिकी पर्यवेक्षक धनंजय पेखळे, आरोग्य पर्यवेक्षक सतीश इंगळे तसेच खामगाव तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी 'माझे गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावापर्यंत दर्जेदार, लोकाभिमुख, सर्वसमावेशक आणि सहज उपलब्ध आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या शासनाच्या उद्दिष्टाला बुलढाणा जिल्ह्यात प्रभावी गती मिळत असल्याचे अधोरेखित करण्यात आले. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा समन्वयाने कार्यरत असून नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या