कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेसाठी २० जुलैपर्यंत विशेष अंमलबजावणी मोहीम; कृषी पायाभूत सुविधा उभारणीसाठी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
बुलढाणा,दि.02 (जिमाका) : कृषी
पायाभूत सुविधा उभारणीला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत
राबविण्यात येणाऱ्या कृषी पायाभूत सुविधा निधी (Agriculture Infrastructure
Fund-AIF) योजनेअंतर्गत राज्यात २० जुलै २०२६ पर्यंत विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात
येत आहे. या मोहिमेद्वारे पात्र शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था आणि
कृषी उद्योजकांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे.
आत्मनिर्भर
भारत अभियानांतर्गत ऑगस्ट २०२० मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेद्वारे पिक काढणीनंतरच्या
कृषी पायाभूत सुविधा तसेच सामुदायिक शेतीसाठी आवश्यक सुविधांच्या उभारणीसाठी सवलतीच्या
दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यामुळे शेतमालाची साठवणूक, प्रक्रिया, मूल्यवर्धन,
वाहतूक आणि विपणन व्यवस्था अधिक सक्षम होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत
होत आहे.
योजनेअंतर्गत
बँकांकडून मंजूर होणाऱ्या दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर तीन टक्के व्याज सवलत
तसेच क्रेडिट गॅरंटीची सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून दिली जाते. गोदामे, शीतगृहे
(कोल्ड स्टोरेज), पॅक हाऊस, ग्रेडिंग व सॉर्टिंग युनिट, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे,
कृषी लॉजिस्टिक्स, सायलो, रिपनिंग चेंबर, ई-मार्केट सुविधा, जैव-इनपुट उत्पादन युनिट,
कस्टम हायरिंग सेंटर आदी कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांना या योजनेत प्राधान्य देण्यात
आले आहे.
या
योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीओ), प्राथमिक कृषी पतसंस्था
(PACS), सहकारी संस्था, कृषी उद्योजक, स्टार्टअप्स, स्वयं सहाय्यता गट (SHGs) तसेच
कृषी क्षेत्रातील इतर पात्र संस्थांना घेता येणार आहे.
विशेष
मोहिमेदरम्यान जिल्हास्तरावर जनजागृती कार्यक्रम, शेतकरी मेळावे, कार्यशाळा, बँक समन्वय
बैठका आणि लाभार्थी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी
अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी, आत्मा (ATMA), कृषी विभाग किंवा जवळच्या
राष्ट्रीयीकृत अथवा अनुसूचित बँकेशी संपर्क साधावा.
पात्र
शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था आणि कृषी उद्योजकांनी कृषी पायाभूत
सुविधा उभारणीसाठी या योजनेचा लाभ घ्यावा व अर्ज https://agriinfra.dac.gov.in या संकेतस्थळावर
सादर करावेत, असे आवाहन कृषी संचालक, आत्मा, कृषी आयुक्तालय, पुणे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment