मधमाशी पालनासाठी ५० टक्के अनुदान; पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविले

 


बुलढाणा, दि. 27 (जिमाका) : उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यभर मधकेंद्र (मधमाशी पालन) योजना राबविण्यात येत असून, या योजनेसाठी पात्र व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, मधमाशी पालनासाठी आवश्यक साहित्यावर ५० टक्के अनुदान आणि उर्वरित ५० टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमीभावाने मध खरेदी तसेच विशेष तांत्रिक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय मधमाशांचे संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृतीही करण्यात येणार आहे. योजनेत वैयक्तिक मधपाळ, प्रगतीशील मधपाळ (केंद्रचालक) आणि नोंदणीकृत संस्था अशा तीन प्रवर्गांचा समावेश आहे. वैयक्तिक मधपाळांना १० मधपेट्यांचा लाभ दिला जाणार असून अर्जदार साक्षर, १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचा असावा. स्वतःची शेती असल्यास प्राधान्य दिले जाईल.

प्रगतीशील मधपाळ (केंद्रचालक) यांच्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण, वय २१ वर्षांपेक्षा अधिक, स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या नावावर अथवा भाडेतत्त्वावरील किमान एक एकर शेती असणे आवश्यक आहे. तसेच मधमाशी पालन, प्रजनन आणि मध उत्पादनाबाबत प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असणे गरजेचे आहे.

संस्थांसाठी संस्था नोंदणीकृत असणे, स्वतःच्या किंवा भाडेतत्त्वावरील किमान एक हजार चौरस फूट इमारत उपलब्ध असणे तसेच प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक सुविधा असणे बंधनकारक आहे. केंद्रचालकांनी मधपेट्या ५० टक्के अनुदानावर घेण्यासाठी उर्वरित ५० टक्के रक्कम प्रथम जिल्हा कार्यालयात जमा करणे आवश्यक राहील.

लाभार्थी निवडीनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्याबाबत मंडळास बंधपत्र देणे आवश्यक असून प्रशिक्षण मंडळामार्फत पूर्णपणे मोफत दिले जाईल. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहणार आहे.

योजनेचे अर्ज महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, बुलढाणा येथे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, आशिर्वाद बिल्डिंग, मुजे ले-आऊट, मलेरिया कार्यालयाजवळ, बुलढाणा येथे संपर्क साधावा, तसेच दूरध्वनी (०७२६२) २९९०७६, मोबाईल ९८२२५२८५३४, ७०५७८८७८८७, ९८८१९११०८४, ई-मेल : dviobuldhana@mskvib.org. किंवा मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाबळेश्वर, जि. सातारा येथेही संपर्क साधता येईल.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या