मतदार पडताळणी अभियानात नागरिकांच्या सहकार्याचे आवाहन; हेल्पलाईन १९५० सुरू

 


जिल्ह्यात २९ जुलैपर्यंत घराघरांत जाऊन मतदार पडताळणी

 नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करण्याचे आवाहन

बुलढाणा,दि.16 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात बुलढाणा जिल्ह्याचा समावेश केला आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येत असून, मतदारांना आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत हेल्पलाईन क्रमांक १९५० सुरू करण्यात आला आहे.

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांर्तगत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घराघरांत जाऊन अंशतः भरलेले गणना पत्र (Enumeration Form) वितरित करीत असून, नागरिकांकडून ते भरून घेऊन जमा करत आहेत. या प्रक्रियेद्वारे मतदार यादीतील नोंदी अचूक व अद्ययावत करण्यात येणार आहेत.

मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक असणे तसेच १८ वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. या प्रक्रियेदरम्यान मतदारांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच विधानसभा मतदारसंघ स्तरावर मतदार सहाय्य केंद्र (Voter Help Desk) कार्यान्वित करण्यात आले आहे.

भारत निवडणूक आयोगाने तक्रार निवारणासाठी एनजीएसपी (National Grievance Service Portal) तसेच Book a Call with BLO ही सुविधा उपलब्ध करून दिली असून, मतदारांनी या सुविधांचा आवश्यकतेनुसार लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 विधानसभा मतदारसंघनिहाय संपर्क क्रमांक : मलकापूर (९०४९८४७१४९), बुलढाणा (८७८८६४६११८), चिखली (९१५६९९०८४४), सिंदखेड राजा (७०२८५७३६८१), मेहकर(अ.जा.) (०७२६८-२२४५२४), खामगाव (७२६३२५२१३७), जळगाव जामोद (०७२६६-२२४४२५) तसेच जिल्हास्तरीय हेल्पलाईन १९५० सुरु करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, बीएलओ घरोघरी भेट देत असताना त्यांना स्वतःची व कुटुंबातील सदस्यांची अचूक माहिती देऊन पूर्ण सहकार्य करावे, जेणेकरून मतदार यादी अधिक अचूक व त्रुटीमुक्त तयार होण्यास मदत होईल.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन