पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करा- जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे

 





           1 लाख 16 हजार 436 पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर

           49 हजार 047 शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण

बुलढाणा, दि. 31(जिमाका): राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध होणार असून पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी कर्जमुक्ती योजना संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात तसेच ऑनलाईनव्दारे, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तालुका सहाय्यक निबंधक/सहकार अधिकारी श्रेणी-1, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा समन्वयक, सर्व राष्ट्रीयकृत, ग्रामीण, खाजगी, सहकारी बँकेचे समन्वयक आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026' अंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.  या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 27 हजार 646 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. आतापर्यंत 1 लाख 16 हजार 436 पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यापैकी 49 हजार 047 शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाली असून 67 हजार 389 शेतकऱ्यांचे  ई-केवायसी प्रलंबित आहे. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.

योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्येही प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रत्येक पात्र लाभार्थ्याच्या कर्ज खात्याला विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. त्याआधारे ॲग्रीस्टॅकवरील नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांना आपल्या पात्रतेबाबत अथवा योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात काही तक्रार अथवा शंका असेल, त्यांनी  जिल्हास्तरीय समितीकडे तक्रार नोंदवावी. तसेच अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक ०२२-४९१५०८०२ वर  कार्यालयीन वेळेत संपर्क  साधावा.  शेतकऱ्यांनी काळजी करू नये, सर्व पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल असे जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी सांगितले.

विशेष सवलत (हेअर कट) : शेतकऱ्यांचे कर्जखाते अनुत्पादित (एनपीए) झाले असल्यास, नॅशनल बँकांना थकीत कालावधीच्या टप्प्यानुसार विशेष सवलत (हेअर कट) दिली जाणार आहे. त्याची तडजोड रक्कम पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.

 अनुत्पादक कर्जाचा दिनांक व तडजोडीची रक्कम : ३० सप्टेंबर २०२१ किंवा त्यापूर्वी  कर्जबाकीच्या ३५ टक्के, १ ऑक्टोंबर २०२१ ते ३० सप्टेंबर २०२२ - कर्जबाकीच्या ४५ टक्के, दि. १ ऑक्टोंबर २०२२ ते ३० सप्टेंबर २०२३ - कर्जबाकीच्या ५५ टक्के, १ ऑक्टोंबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ कर्जबाकीच्या ७० टक्के आणि  १ ऑक्टोंबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत कर्जबाकीच्या ८५ टक्के केली जाणार आहे. सदर विशेष सवलत हे नॅशनल बँकेना लागू राहणार आहे.

कर्जमुक्ती योजनेबाबत

गावपातळीवर प्रसिद्ध करण्यात आलेली यादी आणि योजनेच्या पोर्टलवरील शेतकऱ्यांच्या थकबाकीच्या रक्कमेत फरक असल्यास, योजनेच्या पोर्टलवरील थकबाकीची रक्कम ग्राह्य धरावी.

योजनेच्या पोर्टलवर दिसणारी शेतकऱ्यांच्या कर्जाची थकबाकीची रक्कम ३१ मार्च २०२६ रोजीची आहे. शासनाने दि. १ जुलै २०२६ रोजीच्या पत्रान्वये सर्व बँकांना दि. १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज आकारू नये, अशा सूचना दिल्या असून सर्व बँकांनी त्या मान्य असल्याचे लेखी कळविले आहे. त्यामुळे पोर्टलवर दिसणारी रक्कम मान्य असल्यास शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे.

आधार प्रमाणीकरण केल्यानंतर शेतकऱ्यांना प्रमाणीकरण यशस्वी झाल्याची पावती मिळेल. या पावतीमध्ये कर्जमुक्तीअंतर्गत मिळणाऱ्या लाभाच्या रकमेची माहिती उपलब्ध असेल.

  आधार प्रमाणीकरणानंतर शेतकऱ्यांच्या ३१ मार्च २०२६ रोजीच्या कर्जबाकीच्या अनुषंगाने मंजूर झालेली लाभाची रक्कम त्यांच्या कर्जखात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात येईल. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कर्ज बेबाकी प्रमाणपत्र देण्यात येईल.

कर्जमुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँकांच्या शाखा तसेच विविध कार्यकारी सेवा संस्थांमध्ये प्रसिद्ध करण्यात येतील.

कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना संबंधित बँकांमार्फत खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.

योजनेच्या पोर्टलवरील रक्कम अथवा कर्जासंदर्भातील इतर कोणताही तपशील शेतकऱ्यांना अमान्य असल्यास त्यांनी पोर्टलवर तक्रार नोंदवावी.

00000

Comments