ऑनलाइन क्रीडा स्पर्धा सॉफ्टवेअरचे ३ ऑगस्टला प्रशिक्षण; जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक, संगणक चालक व क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थितीचे आवाहन

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 27 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्ह्यातील विविध एकविध खेळ संघटनांच्या तांत्रिक सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन सॉफ्टवेअर हाताळणीचे प्रशिक्षण सोमवार, ३ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरून रोड, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आले आहे.

सन २०२६-२७ या शैक्षणिक सत्रात तालुकास्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धांसाठी प्रवेश अर्ज ऑनलाइन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून स्वीकारले जाणार आहेत. या सॉफ्टवेअरची प्रभावी हाताळणी, स्पर्धांचे नियोजन आणि आयोजन सुलभ व्हावे, यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

प्रशिक्षणाचे दोन सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत मोताळा, मलकापूर, खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद आणि नांदुरा तालुक्यातील शिक्षक व प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण होणार आहे. तर दुपारी २ ते सायंकाळी ४ या वेळेत सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, चिखली, देऊळगाव राजा आणि बुलढाणा तालुक्यातील सहभागींसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळा, विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांतील क्रीडा शिक्षक, ऑनलाइन कामकाज पाहणारे संगणक चालक तसेच विविध खेळ संघटनांचे पदाधिकारी यांनी नियोजित वेळेनुसार मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या