गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्यासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज मागविले

 


बुलढाणा दि.22 (जिमाका ): अनुसूचित जातीतील गटई काम (कातडी सोलणे तसेच त्यापासून चपला, जोडे तयार करणे) करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील गटई कामगारांसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षात पत्र्याचे स्टॉल उपलब्ध करून देण्याच्या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी 31 जुलै 2026 पर्यंत समाज कल्याण कार्यालय, बुलढाणा येथे प्रत्यक्ष अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी व अनुसूचित जातीतील असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 80 हजार रुपये, तर शहरी भागातील 1 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. उत्पन्नाचा तहसीलदारांनी दिलेला दाखला जोडणे बंधनकारक आहे. अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे.

याशिवाय, ज्या ठिकाणी स्टॉल उभारावयाचा आहे त्या जागेचा अधिकृत ताबा असल्याचे ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड अथवा स्वतःच्या मालकीचे कागदपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी दाखला आदी आवश्यक कागदपत्रांच्या छायाप्रती जोडाव्या लागतील.

विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलढाणा येथून विनामूल्य उपलब्ध होणार आहेत. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून 31 जुलै 2026 पर्यंत कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. उशीरा प्राप्त झालेले अथवा अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्जातील त्रुटींबाबत कार्यालयाकडून स्वतंत्र सूचना दिली जाणार नसल्याने अर्जदारांनी संपूर्ण व परिपूर्ण अर्ज सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या