जिल्हा कारागृहात 350 बंद्यांची क्षयरोग तपासणी; 100 दिवसांच्या क्षयरोगमुक्त भारत अभियानाला बळ
बुलढाणा दि.24 (जिमाका): राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात
येत असलेल्या 'क्षयरोगमुक्त भारत अभियान – 100 दिवस मोहीम' अंतर्गत बुलढाणा जिल्हा
कारागृहात बंद्यांसाठी विशेष क्षयरोग तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात आधुनिक डिजिटल एक्स-रे मशीनच्या साहाय्याने कारागृहातील एकूण 350 बंद्यांची
क्षयरोग तपासणी करण्यात आली.
जिल्हा कारागृह, बुलढाणा आणि जिल्हा क्षयरोग कार्यालय यांच्या
संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. 23 जुलै) हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी जिल्हा कारागृहाच्या अधीक्षक मेघा शंकर बाहेकर उपस्थित होत्या. जिल्हा
क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे यांनी बंद्यांना क्षयरोगाची लक्षणे, प्रतिबंध, वेळेत
निदान आणि उपचाराचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच क्षयरोगाविषयी असलेले
गैरसमज दूर करून उपचार पूर्ण करण्याचे आवाहन केले.
या शिबिरात आधुनिक डिजिटल एक्स-रे मशीनच्या साहाय्याने
कारागृहातील एकूण 350 बंद्यांची क्षयरोग तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान क्षयरोगाचा
संशय असलेल्या बंद्यांचे थुंकीचे नमुनेही प्रयोगशाळा तपासणीसाठी संकलित करण्यात आले.
या उपक्रमामुळे कारागृहातील बंद्यांमध्ये क्षयरोगाचे लवकर निदान होऊन आवश्यक उपचार
वेळेत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर
पडोळ, मिश्रक गोपाल खोंडे, कारागृह शिपाई चंद्रकांत महाले, वैभव राणे, हवालदार संजय
मदारकर तसेच जिल्हा क्षयरोग कार्यालयाच्या वैशाली पवार, राजेंद्र उघडे, राजेंद्र सुरडकर,
राजेंद्र राठोड, सिद्धेश्वर सोळंकी आणि सर्व कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य
केले.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी
कारागृहासारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारचे तपासणी व जनजागृती उपक्रम प्रभावी ठरत
असून, 'क्षयरोगमुक्त भारत' या संकल्पनेला बळकटी देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण
मानला जात आहे.
0000
Comments
Post a Comment