राज्यांतर्गत पीकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज सुरू; शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन • तालुका ते राज्यस्तरावर बक्षिसांची संधी

 


बुलढाणा, दि. 28 (जिमाका) :  राज्यातील अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासह प्रगतशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत राज्यांतर्गत पीकस्पर्धा – खरीप हंगाम २०२६ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी यंदापासून प्रथमच स्वतंत्र ऑनलाइन अर्ज प्रणाली सुरू करण्यात आली असून, पात्र शेतकऱ्यांनी मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

यापूर्वी पीकस्पर्धेची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येत होती. मात्र, प्रशासनात पारदर्शकता, सुलभता आणि गतिमानता आणण्यासाठी यंदापासून ऑनलाइन अर्ज प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या ११ पिकांसाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर स्पर्धा होणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर जमीन असणे आणि ती स्वतः कसत असणे आवश्यक आहे. एका शेतकऱ्याला एका वेळी एका पिकासाठीच सहभाग घेता येईल. भात पिकासाठी किमान २० गुंठे, तर इतर पिकांसाठी ४० गुंठे क्षेत्रावर सलग लागवड असणे बंधनकारक आहे. अर्जासोबत फार्मर आयडी, प्रवेश शुल्क भरल्याची पावती, अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी जात प्रमाणपत्र तसेच बँक पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश सादर करावा लागणार आहे. प्रवेश शुल्क सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३०० रुपये, तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी १५० रुपये निश्चित करण्यात आले आहे. मूग आणि उडीद पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६, तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल पिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२६ ही अंतिम मुदत आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. तालुका स्तरावर प्रथम ५ हजार,  द्वितीय ३ हजार व तृतीय २ हजार रुपये, जिल्हा स्तरावर प्रथम १० हजार द्वितीय ७ हजार व तृतीय ५ हजार,  तर राज्य स्तरावर प्रथम ५० हजार, द्वितीय ४० हजार आणि तृतीय ३० हजार अशी बक्षिसे प्रदान केली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन "पीक स्पर्धा" या लिंकवर ऑनलाइन अर्ज करावा किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या