31 जुलैपर्यंत पीक विमा भरण्याचे आवाहन; नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना मिळणार आर्थिक संरक्षण बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची जिल्ह्यासाठी अधिकृत विमा कंपनी

 


बुलढाणा, दि. 27 (जिमाका): खरीप हंगाम 2026-27 साठी बुलढाणा जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून, यंदा बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची जिल्ह्यासाठी अधिकृत विमा कंपनी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ तसेच कीड-रोगांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी पीक विमा भरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

शेतकरी आपल्या जवळील कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC), महा-ई-सेवा केंद्र, बँक तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत NCIP पोर्टलद्वारे पीक विमा भरू शकतात. योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2026 ही अंतिम मुदत असून, त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे अंतिम दिवसाची वाट न पाहता वेळेत विमा भरून पिकांचे संरक्षण करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विमा भरताना किंवा पिकाच्या नुकसानीची माहिती नोंदविताना अडचण आल्यास संबंधित तालुक्यातील बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीचे तालुका समन्वयक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

जिल्हा व तालुका स्तरावर कंपनीचे प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले असून प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र समन्वयक उपलब्ध आहेत. पीकनिहाय शेतकरी हिस्सा (प्रति हेक्टर विमा हप्ता) सोयाबीन ₹1,250, कापूस – ₹1,300, तूर – ₹940, मुग – ₹75, उडीद – ₹67.50, मका – ₹100 प्रमाणे आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळविण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

0000

Comments