PMFME व AIF योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा; समन्वयातून अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यावर भर

 





बुलढाणा, दि. 14 (जिमाका) : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजना आणि कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी, योजनांची माहिती तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे तसेच विविध विभागांमधील समन्वय अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने गुरुवारी (दि. 9) जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यशाळेत योजनांच्या अंमलबजावणीतील विविध पैलूंवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन करताना शेतकरी, महिला बचत गट आणि ग्रामीण उद्योजकांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यशाळेला कृषी विभाग, आत्मा, स्मार्ट प्रकल्प, महिला आर्थिक विकास महामंडळ, राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (SRLM), अग्रणी बँक तसेच PMFME योजनेशी संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, डीआरपी आणि विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन अंबादास खडसान (एचआरडी, पोकरा/आत्मा कार्यालय) यांनी केले. प्रारंभी कु. संजीवनी कणखर यांनी प्रस्ताविकातून PMFME आणि AIF योजनांची उद्दिष्टे, कार्यशाळेची आवश्यकता तसेच योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीय समन्वयाचे महत्त्व स्पष्ट केले.

राज्य प्रकल्प व्यवस्थापक अमोल चिद्रवार यांनी PMFME आणि AIF योजनेंतर्गत उपलब्ध आर्थिक सहाय्य, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, प्रकल्प मंजुरी, अनुदानाची रचना तसेच बँक कर्ज मंजुरीपर्यंतच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना अधिकाऱ्यांनी कोणती दक्षता घ्यावी, याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.

जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक कौशलेंद्र कुमार सिंह यांनी बँक कर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, वेळेत कर्ज मंजुरीसाठी आवश्यक बाबी तसेच बँका आणि शासकीय विभागांमधील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.

कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख अमोल झापे यांनी अन्न प्रक्रिया उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्ता नियंत्रण, एफएसएसएआय मानके, मूल्यवर्धन, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि विपणन यांसारख्या तांत्रिक विषयांवर मार्गदर्शन केले. उद्योग यशस्वी करण्यासाठी गुणवत्तेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

एसआरएलएमचे अविनाश वंदिले यांनी महिला बचत गटांच्या माध्यमातून उद्योजकता विकास, बीजभांडवल योजना, सामूहिक उद्योग उभारणी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी उपलब्ध संधींची माहिती दिली. तर महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी राजेश नागपुरे यांनी महिला स्वयंसहाय्यता गटांसाठी उपलब्ध शासकीय योजना, प्रशिक्षण, विपणन सुविधा आणि उद्योग उभारणीसाठी मिळणाऱ्या सहाय्याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत PMFME योजनेचे लाभार्थी वंधना टेकाळे आणि कोडूबा कोल्हे यांनी शासनाच्या योजनांच्या मदतीने उभारलेल्या उद्योगांचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला. उद्योग उभारणीतील आव्हाने, मिळालेले यश आणि योजनांमुळे झालेला विकास याबाबत त्यांनी सांगितलेल्या अनुभवामुळे उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना योजनांची प्रत्यक्ष परिणामकारकता समजली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी जिल्ह्यात अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन केले. स्थानिक कृषी उत्पादनांना मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती करणे आणि कृषी आधारित उद्योगांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. PMFME आणि AIF योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी स्मार्ट प्रकल्प व आत्मा कार्यालयाचे नोडल अधिकारी दीपक बुटे यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, बँक प्रतिनिधी, महिला बचत गटांचे प्रतिनिधी, लाभार्थी आणि आयोजकांचे आभार मानले. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यशाळेमुळे PMFME व AIF योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक विभागीय समन्वय अधिक मजबूत होण्यास मदत होणार असून, जिल्ह्यात अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना मिळून शेतकरी व ग्रामीण उद्योजकांना अधिकाधिक लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

तलाव मासेमारी ठेक्यासाठी निविदा आमंत्रित