जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त खामगावात रोजगार मेळावा; १८९ उमेदवारांची प्राथमिक निवड

 





बुलढाणा, दि. 16 (जिमाका) : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर बुलढाणा, जिल्हा उद्योग केंद्र आणि जी.एस. कॉलेज खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खामगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात ४४६ उमेदवारांनी विविध कंपन्यांच्या पदांसाठी मुलाखती दिल्या असून त्यापैकी १८९ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी रोजगार मेळावा जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष संजय चेके, समन्वय सदस्य दिलीप शेटे, जी.एस. कॉलेजचे प्राचार्य डॉ. तळवणकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या रोजगार मेळाव्याला स्थानिक युवक-युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध आस्थापनांमधील उपलब्ध पदांसाठी उमेदवारांनी मुलाखती दिल्या. ४४६ उमेदवारांपैकी १८९ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी विविध शासकीय महामंडळांचे माहिती स्टॉल उभारण्यात आले होते. तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) आणि प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) याबाबत माहिती व नोंदणीसाठी विशेष मार्गदर्शन केंद्रही कार्यरत होते.

जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. रोजगार मेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन