जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त खामगावात १५ जुलैला पंडित दीनदयाल रोजगार मेळावा

 



 

बुलढाणा,दि.02 (जिमाका) : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, बुलढाणा आणि जी.एस. सायन्स, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हास्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या मेळाव्यात वन एशिया नेटवर्क इंडिया प्रा. लि., खामगाव, टॅलेंट क्रॉप सोल्युशन्स प्रा. लि., पुणे आणि आयटीएम एज्युटेक इंडिया लि., मुंबई यांसारख्या नामांकित खासगी कंपन्यांकडील विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत सामान्य रुग्णालय, खामगाव, १३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, खामगाव, बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, नगर परिषद खामगाव आणि शासकीय तंत्रनिकेतन, खामगाव येथे उपलब्ध कार्यप्रशिक्षणाच्या संधींसाठीही उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

 

मेळाव्यात सहभागी खासगी कंपन्या तसेच शासकीय व निमशासकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहून पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती घेणार आहेत. इयत्ता १० वी, १२ वी, आयटीआय, पदवीधर तसेच इतर पात्र महिला व पुरुष उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एकापेक्षा अधिक पदांसाठी मुलाखत देण्याची संधी उपलब्ध राहणार आहे.

 

इच्छुक उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, बायोडाटा व इतर आवश्यक प्रमाणपत्रांसह १५ जुलै रोजी सकाळी १० वाजता जी.एस. सायन्स, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, खामगाव येथे स्वखर्चाने उपस्थित राहून नोंदणी करावी आणि रोजगाराच्या या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.

 

मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी किंवा कोणतीही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा येथे (०७२६२) २४२३४२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी