टीबीमुक्त बुलढाणासाठी सीईओ गुलाब खरात यांचा पुढाकार; सहा महिन्यांसाठी टीबी रुग्ण दत्तक
बुलढाणा, दि. ३१ (जिमाका): प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाला गती देत जिल्ह्यातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी कौतुकास्पद पुढाकार घेत एका टीबी रुग्णाला पुढील सहा महिन्यांसाठी दत्तक घेतले आहे. निक्षय मित्र म्हणून त्यांनी रुग्णाच्या पोषण आहाराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या 'निक्षय मित्र' (Ni-kshay Mitra) उपक्रमांतर्गत टीबी रुग्णांना औषधोपचारासोबत सकस व पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. याच अनुषंगाने श्री. खरात यांनी रुग्णाला पोषण आहाराचे किट सुपूर्द करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. एम. मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) शिवकर भारसाकळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा तसेच आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनकर खेडकर उपस्थित होते.
पोषण आहार किटमध्ये काय? : दत्तक कालावधीत दरमहा रुग्णाला देण्यात येणाऱ्या न्यूट्रिशन किटमध्ये गहू, ज्वारी, बाजरी, डाळ, खाद्यतेल तसेच दूध किंवा दूध पावडर यांचा समावेश करण्यात आला आहे. टीबी रुग्णांच्या उपचारांमध्ये पौष्टिक आहार महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी सांगितले की, टीबी हा केवळ आरोग्याचा विषय नसून सामाजिक जबाबदारीचाही भाग आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी, अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि उद्योजकांनी मोठ्या संख्येने निक्षय मित्र म्हणून पुढे यावे. प्रत्येक टीबी रुग्णाला पोषण आहार व मानसिक आधार मिळाल्यास बुलढाणा जिल्हा लवकरच टीबीमुक्त होईल.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या संवेदनशील आणि प्रेरणादायी पुढाकारामुळे जिल्ह्यातील इतर अधिकारी, संस्था व नागरिकांनाही 'निक्षय मित्र' म्हणून पुढे येण्याची प्रेरणा मिळत असून, टीबीमुक्त बुलढाणाच्या अभियानाला नवी बळकटी मिळाली आहे.
00000

Comments
Post a Comment