जागतिक कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास कार्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

 





बुलढाणा, दि. 13 (जिमाका) : जागतिक कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताह उपक्रमांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा येथे जीवनधारा बुलढाणा अर्बन ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान करून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहाय्यक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून रक्तदानाचे महत्त्व, सुरक्षित रक्तसाठ्याची गरज आणि समाजाप्रती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी याविषयी जनजागृती करण्यात आली.

रक्तदान शिबिरात कार्यालयातील सुमारे १५ ते २० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. रक्तदानामुळे अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, प्रसूतीदरम्यान रक्ताची गरज भासणाऱ्या माता तसेच थॅलेसेमिया व इतर गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मोठी मदत होते. त्यामुळे प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करून समाजहिताच्या या कार्यात सहभागी व्हावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

रक्तदान करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. उपस्थितांनी रक्तदान हा केवळ वैद्यकीय गरज भागविणारा उपक्रम नसून सामाजिक संवेदनशीलता आणि मानवतेचे प्रतीक असल्याचे मत व्यक्त केले. जीवनधारा बुलढाणा अर्बन ब्लड सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी व तज्ज्ञ कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलनाची प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध व सुरक्षित पद्धतीने पूर्ण केली. रक्तदात्यांची वैद्यकीय तपासणी, समुपदेशन आणि रक्तदानानंतर आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जीवनधारा बुलढाणा अर्बन ब्लड सेंटरचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कौशल्य विकासाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे असे उपक्रम समाजात सकारात्मक संदेश देणारे ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

तलाव मासेमारी ठेक्यासाठी निविदा आमंत्रित