महाडीबीटी २.० वर शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू; अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी तातडीने नोंदणी करावी
बुलढाणा दि.7 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नव्याने विकसित करण्यात आलेल्या महाडीबीटी २.० प्रणालीवर
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती व शिक्षण सहाय्य योजनांच्या
अर्ज नोंदणीस ६ जुलै २०२६ पासून सुरुवात झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज
भरावेत, तसेच महाविद्यालयांनीही प्रलंबित अर्जांवर तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन
समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.
या प्रणालीद्वारे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रीकोत्तर
शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच
व्यावसायिक अभ्यासक्रमांशी संलग्न वसतिगृहातील व वसतिगृहाबाहेरील विद्यार्थ्यांसाठी
निर्वाहभत्ता या योजनांसाठी नवीन (Fresh) तसेच नूतनीकरण (Renewal) अर्ज स्वीकारले जात
आहेत.
विद्यार्थ्यांनी महाडीबीटी २.० प्रणालीवर नवीन महाआयडी तयार करणे बंधनकारक
असून, स्वतःच्या आधार क्रमांकाचा वापर करूनच नोंदणी करावी लागणार आहे. तसेच आधार पोर्टलवरील
पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आणि बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.
जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणपत्रिका आदी आवश्यक
कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात तयार ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. नवीन तसेच नूतनीकरण
अर्जांसाठी महाआयडी किंवा आधार लॉगिन आवश्यक असून, पूर्वीचा युजर आयडी किंवा पासवर्ड
वापरण्याची गरज राहणार नाही.
महाविद्यालयांसाठीही नवीन कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. यानुसार
केवळ प्राचार्यांच्या लॉगिनद्वारेच प्रणालीचा वापर करता येणार असून, लिपिक लॉगिन बंद
करण्यात आले आहे. मागील युजर आयडी व नव्याने देण्यात आलेल्या डीफॉल्ट पासवर्डद्वारे
लॉगिन करून महाविद्यालयाचे प्रोफाइल अद्ययावत करणे तसेच पात्र विद्यार्थ्यांच्या प्रलंबित
अर्जांवर तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे.
समाज कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे की, पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून
वंचित राहू नयेत यासाठी सर्व महाविद्यालयांनी विशेष दक्षता घ्यावी. अर्जांवर वेळेत
कार्यवाही न झाल्यामुळे कोणताही मागासवर्गीय पात्र विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल्यास
संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरले जाईल.
जिल्ह्यातील
सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी त्यांच्या संस्थेत प्रवेश घेतलेल्या अनुसूचित
जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांची महाडीबीटी २.० प्रणालीवर शिष्यवृत्ती व इतर
योजनांसाठी अर्ज नोंदणी करून आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन समाज कल्याण
सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment