चिखलीत 3 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान; शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी

 


बुलढाणा, दि. 28 (जिमाका) : सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न स्थानिक पातळीवर मार्गी लागावेत आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध व्हावा, या उद्देशाने चिखली तहसील कार्यालयामार्फत दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी ' छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे. मौनी बाबा संस्थान, चिखली येथे हे शिबिर होणार असून, चिखली तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विजय सवडे यांनी केले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात 'छत्रपती शिवाजी महाराज स्वावलंबन समाधान शिबीर' अंतर्गत महसूल, कृषी, ग्रामविकास, आरोग्य, पुरवठा, सामाजिक न्याय आणि इतर विविध विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

शिबिरात महिलांना शेतकरी दर्जा देण्यासाठी पत्रांचे वितरण, गावठाण स्वामित्व सनद वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, प्रशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमितीकरण, 'जिवंत सातबारा' मोहीम, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल योजनांचा लाभ, कुंभार समाजासाठी पारंपरिक व्यवसाय सवलती, शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क माफी आदी योजनांची माहिती व लाभ दिला जाणार आहे.

याशिवाय पीएम-किसान योजनेअंतर्गत लँड सिडिंग, डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ व फेरफार उतारे वितरण, AgriStack अंतर्गत Farmer ID नोंदणी, नवीन आधार नोंदणी व आधार अद्ययावत करणे, उत्पन्न, जात, नॉन-क्रीमीलेयर, अधिवास, राष्ट्रीयत्व, वय, शेतकरी व भूमिहीन दाखले देणे, मतदार ओळखपत्र सेवा, विशेष सहाय्य योजना, संजय गांधी निराधार योजनेतील आधार व्हॅलिडेशन, मोजणी शीट प्रत वाटप, नवीन रेशन कार्ड, रेशन कार्ड दुरुस्ती, ई-केवायसी, डिजिटल रेशन कार्ड, जॉबकार्ड, आभा कार्ड, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे लाभ, आरोग्य तपासणी व लसीकरण या सेवाही उपलब्ध राहणार आहेत.

तसेच महा-डीबीटी पोर्टलवरील फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण, कोल्ड स्टोरेज, शेडनेट, पॉलीहाऊस, सिंचन साधने, शेततळे आदी योजनांसाठी मार्गदर्शन व अर्ज प्रक्रिया, प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजना, ग्रामविकास विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना तसेच जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्रे यांच्याशी संबंधित सेवाही शिबिरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

चिखली तालुक्यातील नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या विशेष समाधान शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विजय सवडे यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या