बसस्थानक परिसरात २०० मीटर 'नो पार्किंग' नियमाची कठोर अंमलबजावणी; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन
बुलढाणा,
दि. ३१ (जिमाका) : बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडी रोखणे, प्रवाशांच्या
सुरक्षिततेची हमी देणे आणि अवैध प्रवासी वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने
आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बसस्थानकाच्या
२०० मीटर परिसरात 'नो पार्किंग' नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत असून, नियमांचे
उल्लंघन करणाऱ्यांवर संयुक्त पथकाद्वारे कठोर कारवाई केली जाणार आहे.
यासंदर्भात बुलढाणा एसटी आगारात पोलीस प्रशासन, प्रादेशिक
परिवहन विभाग (RTO), महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि खासगी प्रवासी वाहतूकदार
यांची संयुक्त जनजागृती व समन्वय बैठक पार पडली. बैठकीत कायद्याचे पालन, वाहतूक शिस्त
आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात
आला.
बैठकीला शहर पोलीस निरीक्षक संग्राम पाटील, वाहतूक शाखेचे
पोलीस निरीक्षक प्रताप भोस, उपपोलीस निरीक्षक भूषण पाटील, सहाय्यक वाहन निरीक्षक राधिका
चव्हाण, एसटी महामंडळाचे सुरक्षा व दक्षता अधिकारी जयंत कांडलकर तसेच आगार व्यवस्थापक
अमोल गडलिंग उपस्थित होते.
बैठकीत बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात कोणतेही खासगी अथवा
अवैध प्रवासी वाहन उभे करणे तसेच प्रवासी चढ-उतार करणे कायद्याने प्रतिबंधित असल्याचे
स्पष्ट करण्यात आले. या नियमाचा उद्देश कोणत्याही वाहतूकदारावर निर्बंध आणणे नसून,
बसस्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, अपघातांचा धोका कमी करणे आणि प्रवाशांना सुरक्षित
वातावरण उपलब्ध करून देणे हा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
उच्च न्यायालयाचे आदेश, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप
सरनाईक, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी (पोलीस उपमहानिरीक्षक) श्रीमती नारनवरे तसेच
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या निर्देशानुसार, प्रतिबंधित क्षेत्रात बेकायदेशीररीत्या
प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई, वाहन जप्ती
(Detain) तसेच अन्य कायदेशीर उपाययोजना करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला.
प्रशासनाने ही मोहीम कोणाविरुद्ध नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी,
कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि बसस्थानक परिसरात शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था
निर्माण करण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले. खासगी प्रवासी वाहतूकदार, वाहनचालक आणि त्यांच्या
संघटनांनी स्वयंस्फूर्तीने नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही
बैठकीत करण्यात आले. प्रवाशांची सुरक्षितता हीच सर्वोच्च जबाबदारी असून, सुरक्षित वाहतूक,
शिस्तबद्ध सेवा आणि कायद्याचा आदर हीच जबाबदार वाहतूक व्यवस्थेची खरी ओळख आहे, असा
एकमुखी संदेश बैठकीतून देण्यात आला.
00000

Comments
Post a Comment