बुलढाण्यात विवाहपूर्व समुपदेशन केंद्र सुरू होणार; ७ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन * स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविले

 


बुलढाणा, दि. ३० (जिमाका): राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यात विवाहपूर्व संवाद (Pre-Marital Counseling Center) केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने केंद्र चालविण्यासाठी प्रशिक्षित समुपदेशक उपलब्ध करून विनामूल्य सेवा देण्यास इच्छुक स्वयंसेवी संस्थांकडून दि. ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

विवाहपूर्व समुपदेशन, कौटुंबिक संवाद आणि मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

वाढत्या कौटुंबिक वाद-विवादांना आळा घालणे, विवाहपूर्व परस्पर संवादाला प्रोत्साहन देणे तसेच सुदृढ व समंजस कौटुंबिक जीवनाची पायाभरणी करणे, हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. या केंद्रामार्फत विवाहेच्छुक युवक-युवती तसेच नवविवाहित जोडप्यांना तज्ज्ञांकडून विनामूल्य समुपदेशन सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

केंद्रासाठी आवश्यक जागा व मूलभूत साहित्य जिल्हा प्रशासनामार्फत उपलब्ध करून दिले जाणार असून, प्रशिक्षित समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ज्ञ स्वयंसेवी संस्थांनी उपलब्ध करून द्यावेत.

अर्ज करणाऱ्या संस्थांची निती आयोगाच्या पोर्टलवर आवश्यक नोंदणी तसेच इतर वैध नोंदणी असणे आवश्यक आहे. तसेच संस्थेकडे प्रशिक्षित व अनुभवी समुपदेशक अथवा मानसोपचारतज्ज्ञ उपलब्ध असावेत आणि कौटुंबिक, सामाजिक किंवा महिला सक्षमीकरण क्षेत्रात कामाचा अनुभव असावा.

इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज दि. ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जोशी डोळे यांच्या दवाखान्याजवळ, मुठे ले-आऊट, बुलढाणा येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या